Posts

Showing posts from 2010

फ्रोझन (२०१०) - थिजवणारा अनुभव

Image
फारसा रक्तपात न दाखवताही ज्या चित्रपटांतून थरार मनापर्यंत पोहोचतो, त्या चित्रपटांमधे फ्रोझनचं नाव घ्यावं असा हा चित्रपट नक्कीच आहे. कलाकारांच्या चेहेर्‍यावर जे भाव उमटतात, त्यातून भयानकतेचा परमोच्च बिंदू दाखवण्याचं कसब लेखक दिग्दर्शक अ‍ॅडम ग्रीनला नक्कीच साधलेलं आहे. ग्रीनला कथानकाच्या मर्यादाही माहित असाव्यात म्हणूनच त्यांनी अवाजवी कलाकारांचा भरणा न करता आवश्यक तेवढेच कलाकार घेऊन एक थरारपट बनवला आहे. तीन मित्र - पार्कर, जो आणि डॅन एका रविवारी स्किईंग साठी एका बर्फाळ डोंगरावर जातात व उंचावरून बांधलेल्या चेअरलिफ्टवरून ते तिघे परतत असताना चेअरलिफ्टवर कुणी नाही असा गैरसमज होऊन चेअरलिफ्टचं काम बंद केलं जातं आणि या तिघांना अधांतरी अडकून पडावं लागतं. हे अडकून पडणं एका रात्रीचं नसतं. स्किईंगसाठी हा डोंगर फक्त शनिवारी आणि रविवारीच उपलब्ध असतो. मधल्या दिवसांत तिथे कुणी येणार नसतं. म्हणजेच त्यांना आता पुढचे पाच दिवस, शुक्रवार येईपर्यंत त्याच चेअरलिफ्टवर अडकून रहावं लागणार किंवा स्वत:च सुटकेसाठी काहीतरी प्रयत्न करावे लागणार. बर्फाळ हवा, उंचावरची जागा याच्या जोडीला या त्रिकूटाला अडकल्या क्षणापास

सॉल्ट (२०१०) - अळणी गुप्तहेरकथा

Image
स्त्री गुप्तहेरांचा छळ होणं किंवा दुस-या देशासाठी काम करत असल्याचा (डबल एजंट) आरोप त्यांच्यावर येणं या गोष्टी आता ऐकायला काही नवीन वाटत नाहीत. काही तर सत्यकथा आहेत. मात्र त्या प्रत्येक कथेत त्या स्त्री गुप्तहेराचा एक सामान्य स्त्री ते कसलेली गुप्तहेर असा जो प्रवास आहे तो आपल्याला प्रभावित करतो. माताहारी हे त्याचं उत्तम उदाहरण. एव्हलीन सॉल्ट नावाची सी.आय.ए. एजंट आपलं काम चोखपणे बजावत असते. एका शास्त्रज्ञासोबत लग्न करून ती आनंदी आयुष्य जगत असतानाच तिच्यावर ती रशियन गुप्तहेर असल्याचा आळ येतो. रशियाच्या अध्यक्षांना मारण्याची कामगिरी सॉल्टवर सोपवलेली आहे, असं सी.आय.ए. ला कळतं. सॉल्ट तो आरोप नाकारून पळ काढते व आपल्या पतीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करते. मात्र सॉल्टच्या प्रत्येक कृतीने तिच्यावरील संशय वाढतच जातो. एका क्षणी सी.आय.ए. तिच्याजवळ पोहोचतेही मात्र त्याआधीच सॉल्टने आपलं काम चोख बजावलेलं असतं. पुढे सॉल्टच्या पतीची तिच्या डोळ्यांदेखत हत्या करण्यात येते पण त्यानंतरही सॉल्ट आपलं उद्दिष्ट लक्षात ठेवून पुढची कामगिरी पार पाडते. अ‍ॅंजेलिना जोली या चित्रपटात मेक अपमुळे थोडी वेगळी दिसत अस

द काउंटरफिटर्स (२००७) - हेराफेरी जगण्यासाठी

Image
सॉलोमन उर्फ सॅलीच्या ऐयाश जीवनक्रमात अडथळा येतो, तो त्याला अटक होते तेव्हा. अटक झाल्यावर त्याची रवानगी कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमधे करण्यात येते. कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमधल्या कैद्यापुढे दोनच पर्याय असत. सशक्त असेल तर सक्तमजुरी आणि आजारी असेल तर मृत्यू. आपल्यालाही यापैकी काहीतरी एक स्विकारणं भागच आहे हे सॉलोमनला माहित असतं. जगण्यासाठी त्याला तडजोड करावीच लागते. पण त्याच्या वाट्याला येते ती वेगळीच सक्तमजुरी. या मजुरीसाठी केवळ त्याच्या एकट्याचीच निवड केलेली नसते; त्याच्यासारखे आणखी काही तरबेज या कामासाठी निवडलेले असतात. सॉलोमनला प्रथमदर्शनी पहाताना तो एक निर्दय निर्ढावलेला गुन्हेगार वाटतो पण हळूहळू त्याच्या आतही एक माणूस आहे हे आपल्याला समजायला लागतं. बनावट नोटांच्या आजतागायत घडलेल्या जगातील सर्वात मोठ्या व्यवहाराची ही कहाणी आहे. याला ऑपरेशन बर्नहार्ड असंही म्हटलं जातं. या प्लॅनचा कर्ताधर्ता होता नाझींच्या सैन्यातील मेजर शुट्झटाफल स्टम्बॅनफ्युहर बर्नहार्ड क्रूगर. या मेजरने सॅक्सनहॉसेनच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमधून सुमारे १४२ अशा कैद्यांना वेठीला धरलं जे त्याच्यासाठी नकली नोटा बनवू शकतात. नकली नोट

विंटर्स बोन (२०१०) - त्यांच्या साम्राज्यात ती...

Image
परिस्थितीची अगतिकता एखाद्या स्त्रीला कुठल्या सीमेवर नेऊन पोहोचवेल हे काही सांगता येत नाही. आपल्याला झेपणार नाही असा धोका स्वत:हून पत्करणं हे ज्या व्यक्तीच्या नशीबी येतं त्या स्त्रीलाच त्या परिस्थितीची अगतिकता माहित असते. आणि जर अशा अगतिक अवस्थेमधील असलेली स्त्री ही अल्पवयीन असेल तर...? २०१० साली दोन चित्रपट प्रदर्शित झाले - ट्रू ग्रट आणि विंटर्स बोन. या दोन्ही चित्रपटांमधील एकमेव समांतर धागा म्हणजे अल्पवयीन मुलगी आणि तिचा पिता यांच्याशी संबंधित कथानक. ट्रू ग्रट मधील मॅटीला आपल्या पित्याच्या खुनाचा बदला घ्यायचा आहे. आपल्या वयाला न शोभतील असे युक्तीवाद करून, ती चुणचुणीत मुलगी पित्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी एका भाडोत्री मारेकर्‍याची मदत घेते. त्याच्या सोबतच्या प्रवासात तिला अनेक अडचणींचा व संकटांचा सामना करावा लागतो. "विंटर्स बोन" मधील री ला मात्र आपले वडील जिवंत आहेत की मेले आहेत हे सुद्धा माहित नाही. पण आपलं घर- डोक्यावरचं छप्पर वाचवण्यासाठी तिला काहीही करून त्यांना शोधावं लागणार आहे. त्यासाठी ती आपली मैत्रीण, नातेवाईक, वडीलांचे मित्र, शत्रू या सर्वांची मदत मागते पण तिच

माय बिग फॅट ग्रीक वेडींग (२००२) - ज्याचा शेवट गोड

Image
म्हटलं तर काहीच नाही, म्हटलं तर बरंच काही असलेला हा चित्रपट एकत्र कुटुंबपद्धतीमधे असणारे रूसवे फुगवे पण तरीही एकमेकांशी असणारी बांधिलकी यांचं सुरेख चित्र दाखवतो. एका ठिकाणी कुटुंबाचा रूढीवादीपणा आपल्याला हैराण करतो तर जेव्हा त्याच्यामागे आपल्याच जीवलगाचं भलं चिंतीलेलं दिसतं तेव्हा तो रूढीवादीपणा आवडून जातो. ग्रीक कुटुंबातील टॉला आता ३० वर्षांची झालीये पण तिच्या स्थूल बांध्यामुळे तिचं लग्न जमत नाही. पण आपलं लग्न न जमणं ही एकच समस्या टॉलाकडे नाहीये. टॉलाची मुख्य समस्या आहे ती आपल्या वडीलांचं ग्रीक संस्कृतीच्या प्रभावाखालचं अतिरेकी वागणं. अमेरिकेत राहूनही आपल्या मुलांची ग्रीक संस्कृतीची बांधिलकी रहावी म्हणून त्यांनी टॉलाला ग्रीक शिकायला पाठवलं. ग्रीक स्त्री म्हणजे कितीही शिकली तरी दोन-तीन मुलांना जन्म देऊन नव-याचं घर सांभाळणारी, थोडक्यात चूल आणि मूल परंपरेमधली स्त्री असा ते आजही विचार करतात. ग्रीक रीतीरिवाज, परंपरा ते सहजासहजी सोडायला तयार नाहीत. टॉलाला ते वारंवार या गोष्टीची जाणीव करून देत रहातात. तिला तिच्या मनाप्रमाणे आजपर्यंत काहीही करता आलेलं नाही. लग्न करून असंच वागायलादेखील टॉलाच

लीप इयर (२०१०) - प्रेमात पडायला मुहुर्ताची काय गरज?

Image
लीप इयर म्हणजे चार वर्षांनी एकदा फेब्रुवारी महिन्यात एक दिवस जादा देणारं वर्षं. पूर्वी स्त्रियांनी पुरूषांना लग्नासाठी मागणी घालण्याची पद्धत नव्हती, तेव्हा पाचव्या दशकात केव्हातरी आयर्लंड्मधे ही परंपरा सुरू झाली - लीप वर्षातील फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे २९ फेब्रुवारीला स्त्रीने पुरूषाला लग्नाची मागणी घालायची. १९२८ मधे तर स्कॉटलंडमधे असा कायदाच निघाला की लीप वर्षातील फेब्रुवारी महिन्याचा शेवटी लग्नोत्सुक स्त्री, तिच्या प्रियकराला किंवा तिच्या मनात भरलेल्या पुरूषाला लग्नाची मागणी घालू शकते. स्त्रीने पुरूषाला मागणी घालण्याचा हा हक्काचा दिवस आणि जर पुरूषाने या मागणीचा अव्हेर केला, तर त्याला दंड होत असे. हा दंड म्हणजे त्या स्त्रीला एक चुंबन किंवा एक महागडा पोशाख देणे या स्वरूपाचा असे. बोस्टनमधे काम करणा-या अ‍ॅनाचं जेरेमीवर प्रेम आहे. तो आज तिला लग्नाची मागणी घालेल असं वाटून ती त्याला भेटण्यासाठी खूप तयारी करून जाते पण प्रत्यक्षात जेरेमी तिला मागणी घालतच नाही. उलट त्याला काहीतरी महत्त्वाचं काम निघाल्याने ड्युबलिनला जावं लागतं. लग्नासाठी उत्सुक असलेली अ‍ॅना चार वर्षं झाल

व्हेन इन रोम (२०१०) – प्रेमात पडल्यावाचून रहाता येईल...?

Image
न्यू यॉर्कसारख्या मोठ्या शहरात काम करणारी बेथ आपल्या कामाशी इतकी एकरूप झालेली आहे की प्रेमासारखी गोष्ट तिच्या आयुष्यात आली. आपल्या बॉयफ्रेंडबरोबरचे संबंध तोडताना ती हे स्पष्टपणे सांगते की जेव्हा तिला तिच्या कामापेक्षाही जास्त महत्त्वाचा वाटेल असा कुणीतरी भेटेल, तेव्हा ती नक्की विवाहबद्ध होईल. बेथदेखील खऱ्या प्रेमासाठी आसुसलेली असते पण हे प्रेम आपल्याला कधीच मिळणार नाही, असं तिला वारंवार वाटतं. बहिणीच्या लग्नासाठी म्हणून ती रोमला जाते आणि नवरदेवाचा भाऊ निक तिला आवडतो पण त्याला दुस-याच एका स्त्रीच्या बाहुपाशात ती पहाते आणि तिला वाटतं की जगात खरं प्रेम अस्तित्वातच नसावं. शॅम्पेनच्या तिरिमिरीत बेथ फाउंटन ऑफ लव्ह मधे पाय सोडून बसते. या फाउंटनकडे न पहाता कॉईन टाकून जर प्रेमाची इच्छा केली तर ती फलद्रूप होते, अशी या फाउंटनची महती आहे. वारंवार प्रेमात अयशस्वी होणारी बेथ आपल्यासारख्याच प्रेमाची खोटी आस बाळगणा-या काही वेड्यांना मुक्त करायचं ठरवते आणि त्या फाउंटन ऑफ लव्ह मधील काही कॉईन्स चोरते. तिला वाटतं की ज्यांचे कॉईन्स तिने चोरलेत, ते लोक आता प्रेमभंगापासून वाचतील पण प्रत्यक्षात भलतंच घडत

शटर आयलन्ड (२०१०) - एक गढूळ वास्तव

Image
सर्वसामान्य माणसांसाठी धोकादायक असलेल्या मनोरूग्णांना शटर आयलन्ड या ठिकाणी एका मनोरूग्णालयात ठेवलं आहे. या रूग्णालयातून रेचल सलॅन्डो नावाची मनोरूग्ण स्त्री सर्वांच्या डोळ्यात धूळ फेकून पळ काढते आणि तिचा शोध घेण्यासाठी टेड डॅनिअल्स आणि चक ऑले या दोन मार्शल्सना पाचारण करण्यात आलेलं असतं. खरंतर चारही बाजूंनी समुद्र आणि उंच कडेकपा-यांतून अनवाणी पळ काढणं कुठल्याही मनोरूग्णाला अशक्यच असतं, हे मनोरूग्णालयाचे सुरक्षा अधिकारीही बोलून दाखवतात. रेचल मात्र तिथून पळ काढण्यात यशस्वी होते. शटर आयलन्डवर दाखल झाल्याक्षणापासूनच टेड डॅनिअल्सला तिथे काहीतरी गूढ घडत असल्याचा भास होत असतो. कदाचित त्याच्या दिवंगत पत्नीच्या मृत्यूला कारणीभूत असलेला ऍन्ड्र्यू लेडीस याच मनोरूग्णालयात दाखल असल्यामुळे असेल. रेचलच्या शोधासोबतच टेडीला ऍन्ड्र्यूला पहाण्याचीही उत्सुकता आहेच. आपल्या कामाला सुरूवात केल्यावर टेडला लक्षात येऊ लागतं की आपल्याला इथे काहीतरी गूढ घडतंय असं जे वाटतंय, ते खरं असावं. मनोरूग्णालयातील कर्मचारीच नव्हेत, तर पेशंट्ससुद्धा त्याच्यापासून काहीतरी लपवत आहेत, असं त्याला सारखं वाटत रहातं. डॉक्टर कॉली यां

निंजा अस्सासिन (२००९) - किल बिलशी नातं सांगणारी हिंसा

Image
अनाथालयात रवानगी झाल्यावर त्याला एक मारेकरी बनण्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिलं जातं. त्याच्यासारखी अनेक मुलं त्या अनाथालयात निंजा बनण्याचं प्रशिक्षण घेत असतात. त्यांना आपला भाऊ नि आश्रयकर्त्याला वडील समजायचं असतं, हे त्याला शिकवलं जातं. मारेक-याला हृदय नसतं, त्याने फक्त जीव घ्यायचा असतो हे त्याच्या मनावर बिंबवलं जातं. त्यासाठी खडतर परिश्रम आणि अपार वेदना यांना तो सामोरा जातो. पण मारेक-याला हृदय नसतं, हे काही त्याला शिकता येत नाही. तारूण्याच्या उंबरठ्यावर त्याचाचसारखी निंजा बनण्याचं प्रशिक्षण घेणारी "ती" त्याच्याही नकळत त्याच्या हृदयात आपलं स्थान निर्माण करते. मोठेपणी तो एक मारेकरी होतोही पण हृदयात जागा निर्माण करून गेलेल्या तिला तो विसरू शकत नाही. तिच्याचसारख्या आणखी एका तरूणीशी त्याची पुन्हा गाठभेठ होते पण अगदी निराळ्या परिस्थितीत. आपल्याच भावांशी आणि आश्रयकर्त्याशी वैर पत्करल्याची किंमत मोजणं त्याला भाग असतं. किल बिल च्या दुस-या भागात ज्या प्रकारचा हिंसाचार दाखवला आहे, अगदी तसाच हिंसाचार या संपूर्ण चित्रपटात ठायी ठायी भरलेला आहे. मात्र ’पुढे काय’ची उत्कंठा या चित्रपट

बॉईज डोन्ट क्राय (१९९९) - तिच्यातल्या 'त्या'ची घुसमट

Image
स्त्रीने पुरूषाची भूमिका साकारलेले चित्रपट कमी नाहीत. शी’ज द मॅन' या चित्रपटातील अमॅन्डा बायन्सने साकारलेला सबॅस्टीअन आणि त्याच चित्रपटातील कल्पनेवर आधारीत भारतीय हिंदी चित्रपट 'दिल बोले हडीप्पा' मधील रानी मुखर्जीने साकारलेला वीर ही अगदी ताजी उदाहरणं आहेत. मात्र भारतीय चित्रपटातील स्त्री भूमिका करताना काही निवडक अपवाद वगळता पुरूष कलाकार जो बिभत्सपणा दाखवतात किंवा स्त्री कलाकार पुरूषाची भूमिका करताना जे काही केविलवाणे प्रकार करतात, त्याच्या तुलनेत हिलरी स्वॅन्क ने साकारलेला ब्रॅन्डन कितीतरी प्रभावी वाटतो. ज्यांना हिलरी स्वॅन्क माहिती नसेल त्यांना तर ब्रॅन्डन हे पात्र मुळात स्त्री आहे, हे जोपर्यंत चित्रपटात त्याचा उल्लेख होत नाही, तो पर्यंत कळणारच नाही. जन्माने स्त्री असलेल्या परंतू मनाने पुरुष असलेल्या टीना ब्रॅन्डनची ही कथा. ब्रॅन्डन वृत्तीने पुरूष असल्याने त्याला स्त्रीयांमधे रस असतो. पण आपण स्त्रीसारखं दिसत राहिलो, तर कुठलीच स्त्री आपल्याकडे आकर्षित होणार नाही, हे ब्रॅन्डनच्या लक्षात येत म्हणून ब्रॅन्डन पुरूषासारखा रहायला लागतो. पुरूषासारखं वागणं, बोलणं, दिसणं शिवाय त्या

द टाईम ट्रॅव्हलर्स वाईफ (२००९) - इथे काळाची मर्यादा नाही

Image
तुम्ही तारूण्याच्या उंबरठ्यावर आहात आणि अचानक एक गोड लहान मुलगा तुम्हाला येऊन सांगू लागला की भविष्यात मीच तुझा नवरा होणार आहे, तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही कॉलेजच्या मित्रमैत्रीणींबरोबर हुल्लड करताहात आणि एक लहानशी मुलगी येऊन तुम्हाला ’बाबा’ अशी हाक मारेल, तर कशी अवस्था होईल तुमची? तुमचा जीवनसाथी, तुम्हाला आवडो अथवा न आवडो, सतत प्रवासच करत असेल आणि सहजीवनाऐवजी तुमच्या नशीबात एकटेपणाच जास्त आला तर? वयाच्या सहाव्या वर्षी हेन्‍री आपल्या आईबरोबर प्रवास करत असताना एका जबर अपघातात सापडतो. त्यातून तो वाचतो खरा पण त्याच्या नशीबी असं जगावेगळं आयुष्य जगण्याची वेळ येते. त्याच्या आयुष्यातील कुठल्याही काळात प्रवास करणं त्याला शक्य असतं. मात्र या देणगीसोबतच दोन कठीण समस्याही येतात. एक म्हणजे कुठल्या काळात प्रवास करावा, हे त्याला ठरवता येत नाही. स्वत:ला नको असतानादेखील हेन्री ला हा प्रवास करणं भाग पडतं. दुसरी कठीण समस्या म्हणजे कुठल्याही काळात प्रवास करताना हेन्‍री ला अंगावरच्या कपडयांनीशी प्रवास करता येत नाही. प्रत्येक वेळी प्रवास करताना तो ज्या काळातून आला आहे, त्याच काळात त्याला आपले कपडे सोडून

ट्वेन्टी वन (२००८) - मोजूनमापून जुगार

Image
बेन कॅम्पबेल हा अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता असलेला विद्यार्थी आहे. बोस्टनला रहाणा-या या विद्यार्थ्याचं स्वप्न आहे की स्वत:च्या बळावर हार्वर्ड स्कूल ऑफ मेडिकल सायन्सची शिष्यवृत्ती मिळवून डॉक्टर व्हायचं. ३ मिलियन डॉलर्सची आवश्यकता असते. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या बेनला साहजिकच हे शक्य नसतं. इतके पैसे गोळा करता करता आपल्याला चार-पाच वर्षं तरी सहज लागतीलच ही चिंता सतत त्याचं मन खात असते. बेन त्याच्या इतर दोन मित्रांसमवेत एक छोटं स्वयंचलीत चाक तयार करण्याच्या प्रोजेक्टवरही काम करत असतो पण या गोष्टीचाही उपयोग त्याला शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी होत नाही. पैसे कसे मिळवावेत याचा विचार करतच बेन गणिताच्या वर्गात बसलेला असतो. आपल्या कुशाग्र बुद्धीच्या जोरावर दिलेल्या व्यावहारीक उत्तराने तो प्राचार्य मिकी रोसा यांचं मन जिंकतो. पण प्राचार्य मिकी यांना बेनच्या बुद्धीमत्तेचा वापर वेगळ्याच कारणासाठी करायचा असतो. एके दिवशी बेन लायब्ररीमधे आपला अभ्यास करत असताना, त्याला एक मुलगा आपल्या मागोमाग यायला सांगतो. बेन त्याच्या मागोमाग जिथे पोहोचतो तिथे प्राचार्य मिकी रोसा हे काही खास व्यक्तींबरोबर उपस्थित अस

द इटालियन जॉब (२००३) - चोरावर मोर

चार्ली क्रोकर आपल्या बुद्धीच्या जोरावर इटलीतील व्हेनिस शहरामधे ३५ मिलियन डॉलर किमतीच्या सोन्याची चोरी घडवून आणतो. बुद्धीच्या जोरावर अशासाठी की व्हेनिस नदीतील बोटींच्या वाहतुकीची गजबज व पोलिंसाचा ससेमिरा चुकवत, रक्ताचा एकही थेंब न सांडता ही चोरी केली जाते. चार्लीच्या ग्रुपमधील सर्वात वयस्क साथिदार जॉन ब्रिजर याच्या कारकिर्दीतील ही शेवटची चोरी असते. आता आपलं उर्वरित आयुष्य आपल्या मुलीसोबत घालवण्याचा विचार तो चार्लीजवळ व्यक्त करतो. शिवाय तो चार्लीलाही हा सल्ला देतो की केवळ चोरी करण्यासाठी जगण्यापेक्षा एक चांगली मुलगी निवड आणि आपल्या सुखी आयुष्याला सुरूवात कर. दुर्दैवाने जॉनच्या ब्रिजरसाठी ही चोरी त्याच्या कारकिर्दीतीलच नव्हे, तर आयुष्यातीलही शेवटची चोरी ठरते. चार्लीच्याच ग्रुपमधील एक साथिदार फितुरी करतो. चोरी केलेलं सोनं जेव्हा चार्ली आपल्या ग्रुपसमवेत दुस-या ठिकाणी घेऊन असतो तेव्हा हा फितुर ते सोनं पळवतो आणि चोरावर मोर बनतो. चार्ली आणि त्याचे इतर साथिदार फितुराने केलेल्या गोळीबारातून वाचतात पण त्यांना जॉनला गमवावंच लागतं. जॉनला आपल्या वडीलांच्या जागी मानणारा चार्ली जॉनच्या मृत्यूने पे

गे-पर्र-ई (१९६२) - स्वप्न आणि सत्य यातील तफावत

Image
चित्रपट पाहून आपणही नटी बनू शकतो, असा समज बाळगून दररोज कित्येक तरूणी आपलं छोटंमोठं गाव, नातेवाईक यांना सोडून मायानगरीत दाखल होतात. त्यातील कित्येकजणींना आपलं स्वप्न पहिल्याच प्रयत्नात विसरून वास्तवाचे चटके सहन करत आयुष्य कंठावं लागतं. स्वत:च्या हट्टापायी घरी सोडलेलं म्हणून आईवडीलांना तोंड दाखवायची हिम्मत नाही आणि जे हवं ते करायचं सोडून, पोट भरण्यासाठी तिसरंच काहीतरी करावं लागतंय अशी दुरावस्था असलेल्या मुली शहरात कमी नाहीत. त्यातून एखादी मुलगी स्वाभिमानाने आपल्या अटींवरच या मायानगरीत तग धरून रहायचं म्हणत असेल, तर तिला काय सहन करावं लागेल, याची कल्पनाच न केलेली बरी. अशाच परिस्थितीशी साम्य असलेला प्राण्यांचा अॅनिमेशनपट म्हणजे गे पर्र-ई. म्युझेट नावाची फ्रान्समधील एका छोट्या गावात रहाणारी एक मांजरी. दिसायला खूप आकर्षक आणि चंचल पण तितकीच भोळी. जॉन टॉम नावाच्या बोक्याचं तिच्यावर मनापासून प्रेम आहे. तो तिच्यासाठी गाणी गातो पण आपलं प्रेम त्याने कधी तिच्यासमोर मोकळेपणी व्यक्त केलेलं नाही. जॉन टॉमचा मित्र रॉबस्पिअरला जॉनचं म्युझेटच्या मागे मागे फिरणं अजिबात आवडत नाही पण केवळ मित्रप्रेमाखातर तो

द नंबर ट्वेन्टी थ्री (२००७) - कल्पनेपलिकडचं भीषण सत्य

Image
सत्य समजून घेतल्यानंतरची घालमेल आणि अज्ञानातील सुख याची तुलना केली तर अज्ञानातील सुखाचीच अपेक्षा प्रत्येकजण करेल. पण जे माहित नाही, ते माहित करून घेणं हा मानवी स्वभाव आहे. त्या स्वभावधर्मानुसार वागल्यानंतर जे काही आपल्यासमोर येतं, त्याची तुलना केवळ वास्तव व अनभिज्ञता या दोन पारड्यांमधे करता येत नाही. घडून गेलेले वास्तव हे सत्य होतं व आपण त्यापासून अनभिज्ञ होतो ही वस्तूस्थिती स्विकारून समोर आलेली परिस्थिती नैतिक व अनैतिकतेच्या कसावर पारखून पहावी लागते. ही एक मोठी कसोटी आहे. या कसोटीवर पूर्ण उतरण्यासाठी आवश्यक असलेलं मनोबळ ज्याच्याकडे असतं, केवळ तोच सत्य जाणून घेण्यामागची उत्सुकता व अज्ञानातील सुख याची तुलना केल्यानंतर त्यातून सत्य स्विकारू शकतो. वॉल्टर स्पॅरो हा भटक्या कुत्र्यांना पकडणारा एक अधिकारी आहे. एके दिवशी एका कुत्र्याला पकडण्याच्या नादात, तो कुत्रा वॉल्टरच्या हाताला चावतो आणि पळून जातो. त्याच दिवशी वॉल्टरचा वाढदिवसही असतो. वाढदिवसाची भेट म्हणून वॉल्टरची पत्नी अगाथा, त्याला एक पुस्तक भेट देते. या पुस्तकाचं नाव आहे ’द नंबर ट्वेन्टी थ्री’. या पुस्तकाच्या लेखकाने तेवीस क्रमां

द ग्रीन माईल (१९९९) – अनंताचा प्रवास आणि अश्वत्थाम्याचं जगणं

Image
मृत्यूची शिक्षा ठोठावलेले कैदी ज्या तुरूंगात ठेवले जातात, त्या तुरूंगातील एका रांगेचा पॉल एजकोम्ब हा अधिकारी आहे. हा काळ आहे १९३० सालचा, जेव्हा कैद्यांना मृत्यूदंड देण्यासाठी इलेक्ट्रीक खुर्चीचा वापर केला जात असे. तुरूंगातील जमिनीवर बसवलेल्या फरशांच्या हिरव्या रंगावरून ह्या तुरूंगाला ग्रीन माईल असं म्हटलं जात असे. मृत्यूदंडासाठी आलेले कैदी काही दिवस त्या तुरूंगात राहत आणि त्यांच्या शिक्षेचा दिवस उगवला की ग्रीन माईलवरून चालत चालत आपल्या अनंताच्या प्रवासाला इलेक्ट्रीक खुर्चीच्या दिशेने निघून जात. या कैद्यांना पाहून पाहून पॉलची नजर इतकी निगरगट्ट झालीय की त्याचा दैव, नशीब या गोष्टींवर विश्वासच राहिलेला नाही. कैद्याच्या मृत्यूदंडाच्या एक दिवस अगोदर मृत्यूच्या शिक्षेची तालीम करणंही आता त्याच्या अंगवळणी पडलं आहे. पण एक दिवस एक कैदी त्याच्या तुरूंगात येतो आणि पॉलचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन साफ बदलून जातो. जॉन कॉफी हा अवाढव्य शरीर असलेला एक काळा कैदी पॉलच्या तुरूंगात दाखल होतो. त्याला दोन लहान मुलींच्या बलात्कार व खून प्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा झालेली असते. खरं तर जॉनला पाहूनच तुरूंगाती

द डेव्हिल वेअर्स प्राडा (२००६) – पर्याय निवडण्याचं स्वातंत्र्य

Image
अ‍ॅन्ड्रीया सॅक्स ही एक साधीसुधी रहाणारी पण तल्लख बुद्धीची पत्रकार असते. एक उत्तम पत्रकार होणं, हे तिचं ध्येय असतं. चांगल्या ठिकाणी नोकरी मिळावी म्हणून तिचे प्रयत्न सुरु असतात. तशातच तिला संधी मिळते, ती ’रनवे’ सारख्या प्रसिद्ध फॅशन मॅगझिनसाठी वार्ताहर म्हणून काम करण्याची. पण प्रत्यक्षात तिला निराळंच काम करावं लागतं. अ‍ॅन्ड्रीयाने जर एक वर्ष ’रनवे’ची कार्यकारी संचालक (एक्झिक्युटीव्ह) मिरांडा प्रिस्ले हीची दुय्यम सहाय्यक म्हणून काम केलं, तर ’रनवे’मधे वार्ताहर म्हणून अ‍ॅन्ड्रीयाचं भविष्य उज्ज्वल आहे, असं अ‍ॅन्ड्रीयाला सांगितलं जातं. ज्या नोकरीसाठी मुली वाट्टेल ते करायला तयार होतात, ती नोकरी अ‍ॅन्ड्रीयाला सहजगत्या मिळून जाते. अ‍ॅन्ड्रीया या नोकरीकडे फक्त एक चांगली संधी म्हणून पहात असते. एकदा का तिच्या प्रोफाईलवर ’रनवे’मधे मिरांडासाठी काम केलं असल्याचा रेकॉर्ड आला, की इतर ठिकाणी तिला नोकरी मिळण्यासाठी फार कष्ट करावे लागले नसते. पण लवकरच अ‍ॅन्ड्रीयाच्या लक्षात येतं की ’रनवे’मधे काम करायचं असेल, तर छान कपडे, छान केशभूषा असणं आवश्यक आहे. त्याहूनही आवश्यक आणि कठीण आहे, ते म्हणजे मिरांडा प्र

सिंडरेला मॅन (२००५) - परिकथा वाटावी अशी एका बॉक्सरची सत्यकथा!

Image
जेम्स जे. ब्रॅडॉक, एक प्रतिथयश बॉक्सर. आपल्या बॉक्सिंगच्या कौशल्यावर त्याने खूप नाव कमावलंय. त्याच्या आयुष्यात कशाचीही कमतरता नाहीये. सुंदर पत्नी, गोजिरवाणी मुलं, पैसा, प्रसिद्धी. जे जे माणसाला आपल्या आयुष्यात असावं असं वाटतं, ती प्रत्येक गोष्ट आहे जेम्सकडे. १९२८ सालचा सर्वोत्कृष्ट मुष्टीयोद्धा आहे तो. पण जर सगळं आहे तसंच सुरळीत चालू राहिलं असतं, तर दैव कशाला म्हटलं असतं बरं! १९२९ ते १९३३, ग्रेट डिप्रेशनचा काळ! दुस-या महायुद्धाची चाहूल लागत होती. जागतिक अर्थव्यवस्था पूर्णत: कोलमडून गेलेली. जेम्सचं पूर्वीचं वैभव, दिमाख पार धुळीला मिळालंय. पण फक्त जेम्सच नाही तर त्याच्यासारख्या कित्येकांनी स्टॉक मार्केट मधे गुंतवलेले आपले पैसे गमावल्याने त्यांच्यावर ही वेळ आलीय. कित्येकजण बेकार झालेत. कित्येकजण आपलं घर, कुटुंब सोडून परागंदा झालेत. कित्येकजण काम मागत फिरतायंत. कित्येकांनी निदान आपल्या मुलांना तरी दोन वेळ पोटभर जेवता यावं म्हणून काही सधन घरांमधे आश्रयासाठी पाठवलंय. पण जेम्स मात्र आपल्या मोठ्या मुलाला वचन देतो की काहीही झालं तरी तो आपल्या मुलांना स्वत:पासून वेगळं करणार नाही. अधूनमधून म

थ्री इडियट्स (२००९) – ऑल इज वेल

Image
थ्री इडियट्स म्हणजे कोपरखळ्या मारत विनोदाच्या अंगाने आपल्याला वास्तवाचं दर्शन घडवणारा चित्रपट! चित्रपटात इंजिनिअरिंगची पार्श्वभूमी केवळ कथानकासाठी वापरली आहे. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना येणा-या अडचणी हल्ली सर्वच क्षेत्रातील विद्यार्थ्यांना भेडसावत आहेत. डेडलाईन्स, व्यवसायिक स्पर्धांसारखी आव्हानं, आणि कौटुंबिक जबाबदा-या यांचा ताळमेळ बसवताना माणसातील जिवनेच्छा पार कोमेजून जाते. त्यातच जर करिअर म्हणून निवडलेलं क्षेत्र आपल्यावर लादलं गेलेलं असेल, तर होणारी मनाची घुसमट कुणाला सांगता न येण्यासारखी! राजू रस्तोगी, फरहान कुरेशी आणि रणछोडदास श्यामलदास चांचड उर्फ रॅंचो या इंजिनिअरींग कॉलेजमधे शिकणा-या तीन मित्रांची ही कथा. हे तिघे एकमेकांचे घट्ट मित्र असतात. पण शेवटच्या वर्षी इंजिनिअरिंगची डिग्री मिळाल्यावर रॅंचो कुणाचाही निरोप तडकाफडकी निघून जातो. तो कुठे जातो, काय करतो हे कुणालाच कळत नाही. हवेत विरल्यासारखा तो पाच वर्षे गायब असतोआणि एक दिवस असा उगवतो, जेव्हा राजू आणि फरहान रॅंचोला शोधण्यासाठी आपली कामं सोडून धावतात. रॅंचोला शोधण्याच्या प्रवासात या तीन मित्रांची कथा आपल्यासमोर तुकडयातुकड्

मेमोअर्स ऑफ अ गेइशा (२००५) - तिच्या आठवणींचा प्रवास

Image
चेहे-यावर रंगरंगोटी केल्यावर खरा चेहेरा ओळखू न येण्याइतपत बदलला असला, तरी मनावर तशी रंगरंगोटी करता येत नाही. नदी ज्याप्रमाणे आपला रस्ता शोधत शोधत समुद्राला जाऊन मिळते, स्त्रीही त्याचप्रमाणे आपल्या प्रेमाच्या शोधात असते. एकदा का तिला तिचं प्रेम सापडलं की तिचा शोध संपतो आणि सुरू होतो प्रवास त्या प्रेमाच्या प्राप्तीसाठी. अशाच प्रवासाची कहाणी आहे - मेमोअर्स ऑफ अ गेइशा. मासेमारीवर उदरनिर्वाह भागविणा-या कोळ्याच्या दोन मुली तात्सु आणि चियो ह्या जपानच्या क्योटो शहरामधील गेइशा गृहाला विकल्या जातात. तात्सु ही मोठी बहीण आणि हुबेहुब आईसारखे डोळे घेऊन जन्माला आलेली चियो ही धाकटी बहीण. तात्सुमधे गेइशा बनण्याचे मुलभूत गुणच नसतात त्यामुळे तीची रवानगी वेश्यागृहात होते आणि नऊ वर्षाच्या चियोला गेइशा गृहात छोटी मोठी कामं करावी लागतात. चियो लहानपणापासूनच देखणी असल्याने गेइशा गृहाची प्रमुख गेइशा हात्सुमोमो हिचा तिच्यावर विशेष राग असतो. गेइशागृहातील पम्पकीन नावाची एक मुलगी चियोला सांभाळून घेत असते. चियोची आणि तिची मैत्री जमते पण बहीणीपासून ताटातूट झाल्यामुळे चियोच्या डोक्यात वारंवार आपल्या बहीणीला भे

नटरंग उभा, ललकारी नभा, स्वरताल जाहले दंग! (२००९)

Image
’एका कलाकाराच्या आयुष्याचा तमाशा’, या चार शब्दांमधे नटरंगची कथा सामावलेली आहे. आयुष्यभर कलेसाठी दिलेलं योगदान म्हणून एखाद्या ज्येष्ठवयीन कलाकाराला जेव्हा ’जीवनगौरव पुरस्कार’ सारखा सन्मान लाभतो, तेव्हा तिथे टाळ्या वाजवणारे असंख्य हात उपस्थित असतात. त्यातल्या कित्येक हातांना त्या कलाकाराचं नेमकं योगदान किती आणि काय, हेही ठाऊक नसतं. कलेसाठी केलेल्या खडतर तपश्चर्येचा साक्षिदार असतो, तो त्या पुरस्काराचा मानकरी कलाकार आणि ज्यांनी त्याची तपश्चर्या अगदी जवळून पाहिली आहे, असे त्याचे सोबती. कागलगावचा गुणवंत वृत्तीने मल्ल पण हाडाचा कलाकार आहे. व्यायाम करून आपल्या शरीराचा मर्दानी बाज राखणारा हा गुणा, मनाने मात्र कवी आहे, उत्तम अभिनेता आहे. दिवसभर दुस-याच्या शेतावर राबून, आपल्या कुटुंबासाठी मजूरी करताना, संध्याकाळी मात्र फडावरची घुमणारी ढोलकी त्याला साद घालीत असते. गुणाला कलेचं अभिजात अंग आहे. तो उत्तम कवनं करू शकतो, त्यामुळे त्याच्यासाठी लावणी म्हणजे नुसती फडावर नाचणारी बाई नाही. तमाशा म्हणजे त्याच्यासाठी गीत, नृत्य, संगीत आणि सौंदर्य याची रेलचेल असलेला असा दरबार आहे. पण नुसती कला पाहून नि कला