द इटालियन जॉब (२००३) - चोरावर मोर
चार्ली क्रोकर आपल्या बुद्धीच्या जोरावर इटलीतील व्हेनिस शहरामधे ३५ मिलियन डॉलर किमतीच्या सोन्याची चोरी घडवून आणतो. बुद्धीच्या जोरावर अशासाठी की व्हेनिस नदीतील बोटींच्या वाहतुकीची गजबज व पोलिंसाचा ससेमिरा चुकवत, रक्ताचा एकही थेंब न सांडता ही चोरी केली जाते. चार्लीच्या ग्रुपमधील सर्वात वयस्क साथिदार जॉन ब्रिजर याच्या कारकिर्दीतील ही शेवटची चोरी असते.
आता आपलं उर्वरित आयुष्य आपल्या मुलीसोबत घालवण्याचा विचार तो चार्लीजवळ व्यक्त करतो. शिवाय तो चार्लीलाही हा सल्ला देतो की केवळ चोरी करण्यासाठी जगण्यापेक्षा एक चांगली मुलगी निवड आणि आपल्या सुखी आयुष्याला सुरूवात कर. दुर्दैवाने जॉनच्या ब्रिजरसाठी ही चोरी त्याच्या कारकिर्दीतीलच नव्हे, तर आयुष्यातीलही शेवटची चोरी ठरते. चार्लीच्याच ग्रुपमधील एक साथिदार फितुरी करतो. चोरी केलेलं सोनं जेव्हा चार्ली आपल्या ग्रुपसमवेत दुस-या ठिकाणी घेऊन असतो तेव्हा हा फितुर ते सोनं पळवतो आणि चोरावर मोर बनतो.
चार्ली आणि त्याचे इतर साथिदार फितुराने केलेल्या गोळीबारातून वाचतात पण त्यांना जॉनला गमवावंच लागतं. जॉनला आपल्या वडीलांच्या जागी मानणारा चार्ली जॉनच्या मृत्यूने पेटून उठतो. काहीही झालं तरी या फितुराला मी धडा शिकवणारच या हेतुने चार्ली त्या फितुराच्या मागावर निघतो. चोरीसाठी आवश्यक असलेल्या विविध कौशल्यांत पारंगत असे आपले साथिदार मित्र आणि प्रत्यक्ष जॉन ब्रिजरची मुलगी स्टेला यांची त्याला या कामी मदत मिळते.
सोनं परत मिळवण्यापेक्षाही विश्वासघात करून जॉनचा खून करणा-या आपल्या शत्रुला धडा शिकवणं, हे चार्लीचं मुख्य उद्दिष्ट असतं पण चोरावर मोर झालेल्या त्या फितुराच्या जवळ जाणं इतकं सोपं नाही हे चार्लीला काही दिवसांतच कळून येतं आणि मग पुन्हा त्याच्या डोक्यात चोरीच्या निरनिराळ्या कल्पना आकार घेऊन लागतात. त्यातून एक योजना आकाराला येतेही पण मधेच कुठेतरी माशी शिंकते. चार्लीला आपली योजना बदलावी लागते आणि मग सुरू होतो खेळ ऊनसावलीचा.
चित्रपटाची सर्वात जमेची बाजू म्हणजे पार्श्वसंगीत. चित्रपट सुरू होताना दिसणा-या नामावलीपासून ते चित्रपटाच्या शेवटच्या भागात असलेल्या पाठलागाच्या प्रसंगापर्यंत पार्श्वभूमीवर वाजत रहाणारं संगीत आपल्याला त्या प्रसंगाशी एकरूप व्हायला मदत करतं. संगीतकार जॉन पॉवेल यांनी प्रसंगानुरूप वाद्यांचा वापर करत दमदार असं संगीत या चित्रपटाला दिलं आहे. ट्रॉय केनेडी मार्टीन यांच्या कथेला, पटकथालेखक डोना आणि वायन पॉवर्स व दिग्दर्शक एफ. गॅरी ग्रे यांची उत्तम साथ लाभली आहे. मेमेन्टो आणि द डार्क नाईट सारख्या चित्रपटांचं दृश्यचित्रिकरण हाताळणा-या वॉली फिस्टर यांनी या चित्रपटाचं दृश्यचित्रीकरण सांभाळलं आहे. शेवटपर्यंत खुर्चिला खिळवून ठेवणारी, चित्तथरारक अशी पाठलागाची दृश्य आणि त्यासाठी वापरलेल्या बोटी, कार्स आणि हेलीकॉप्टर यांनी चित्रपट एकदम स्टायलीश झाला आहे. चित्रपटाचं संकलन इतकं सुंदररित्या केलं आहे की चित्रपट पहाताना कुठेच कंटाळा येणार नाही.
Comments
Post a Comment