लीप इयर (२०१०) - प्रेमात पडायला मुहुर्ताची काय गरज?

लीप इयर म्हणजे चार वर्षांनी एकदा फेब्रुवारी महिन्यात एक दिवस जादा देणारं वर्षं. पूर्वी स्त्रियांनी पुरूषांना लग्नासाठी मागणी घालण्याची पद्धत नव्हती, तेव्हा पाचव्या दशकात केव्हातरी आयर्लंड्मधे ही परंपरा सुरू झाली - लीप वर्षातील फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे २९ फेब्रुवारीला स्त्रीने पुरूषाला लग्नाची मागणी घालायची. १९२८ मधे तर स्कॉटलंडमधे असा कायदाच निघाला की लीप वर्षातील फेब्रुवारी महिन्याचा शेवटी लग्नोत्सुक स्त्री, तिच्या प्रियकराला किंवा तिच्या मनात भरलेल्या पुरूषाला लग्नाची मागणी घालू शकते. स्त्रीने पुरूषाला मागणी घालण्याचा हा हक्काचा दिवस आणि जर पुरूषाने या मागणीचा अव्हेर केला, तर त्याला दंड होत असे. हा दंड म्हणजे त्या स्त्रीला एक चुंबन किंवा एक महागडा पोशाख देणे या स्वरूपाचा असे.

बोस्टनमधे काम करणा-या अ‍ॅनाचं जेरेमीवर प्रेम आहे. तो आज तिला लग्नाची मागणी घालेल असं वाटून ती त्याला भेटण्यासाठी खूप तयारी करून जाते पण प्रत्यक्षात जेरेमी तिला मागणी घालतच नाही. उलट त्याला काहीतरी महत्त्वाचं काम निघाल्याने ड्युबलिनला जावं लागतं. लग्नासाठी उत्सुक असलेली अ‍ॅना चार वर्षं झाली तरी जेरेमी आपल्याला लग्नाची मागणी घालत नाही म्हणून खट्टू होते. पण नंतर तिला लीप इयरच्या आयरिश परंपरेबद्दल कळतं. मग ती विचार करते की "जर जेरेमी मला मागणी घालत नसेल, तर मीच त्याला मागणी का घालू नये?" जेरेमी असतो ड्युबलिनमधे म्हणजे आयर्लंडमधे, जिथे ही लीप इयरची परंपरा अस्तित्वात आली. मग उत्साहाने अ‍ॅना जेरेमीला भेटण्यासाठी ड्युबलिनला जायला निघते पण अ‍ॅना तिच्या इच्छित स्थळी पोहोचण्यामधे वारंवार अडचणी येतात. त्या अडचणींवर अ‍ॅना कशी मात करते? शेवटी ती जेरेमीला लग्नाची मागणी घालते का? जेरेमी लग्नासाठी तयार होतो का? या प्रश्नांची उत्तर पहाण्यासाठी लीप इयर अवश्य पहा.

थोडासा चोरी चोरी, थोडासा प्यार तो होनाही था आणि आयर्लंडचं निसर्गसौंदर्य यांचं अप्रतिम मिश्रण या चित्रपटात आहे. चित्रपटाची नायिका एमी अ‍ॅडम्स खरंच इतकी सुंदर आहे की आयर्लंडच्या निसर्गसौंदर्याचा प्रभाव तिच्यावर आहे, हे कळत नाही पण ती बेहद्द सुंदर दिसते, तितकाच सुंदर अभिनय करते. अ‍ॅना भर पावसातून बोटीने प्रवास करत आयर्लंडमधे पोहोचते, तेव्हा सर्व वातावरण पावसाळी झालेलं दाखवलं आहे. तो ओलसर गारवा प्रेक्षकालाही जाणवावा इतक्या प्रभावीपणे चित्रीत केला गेला आहे, तितकाच प्रभावी उबदारपणा अ‍ॅना ज्या हॉटेलमधे शिरते तिथल्या वातावरणात जाणवतो. ठायी ठायी वा, सुंदर, मस्त असे उद्गार आपल्या तोंडातून निघतच रहावेत इतक्या मुक्तपणे आयर्लंडचा निसर्ग आपल्यासमोर पसरलेला असतो. इथला बाडबिस्तरा आवरून कुणी कायमचं आयर्लंडला स्थायिक झालं तर नवल वाटू नये.

व्हेन इन रोम आणि लीप इयर हे दोन्ही रोमॅंटिक कॉमेडी असलेले चित्रपट. दोन्ही चित्रपटात नायिका आपल्या ख-या प्रेमाच्या दिशेने प्रवास करते. दोन्ही चित्रपटात सुखांत आहे. एक चित्रपट तुम्हाला प्रेमात पडण्यासाठी बोलावत रहातो आणि एक चित्रपटामुळे तुम्ही प्रेमात कधी पडलात हेही कळत नाही.

Comments