मेमोअर्स ऑफ अ गेइशा (२००५) - तिच्या आठवणींचा प्रवास

चेहे-यावर रंगरंगोटी केल्यावर खरा चेहेरा ओळखू न येण्याइतपत बदलला असला, तरी मनावर तशी रंगरंगोटी करता येत नाही. नदी ज्याप्रमाणे आपला रस्ता शोधत शोधत समुद्राला जाऊन मिळते, स्त्रीही त्याचप्रमाणे आपल्या प्रेमाच्या शोधात असते. एकदा का तिला तिचं प्रेम सापडलं की तिचा शोध संपतो आणि सुरू होतो प्रवास त्या प्रेमाच्या प्राप्तीसाठी. अशाच प्रवासाची कहाणी आहे - मेमोअर्स ऑफ अ गेइशा.

मासेमारीवर उदरनिर्वाह भागविणा-या कोळ्याच्या दोन मुली तात्सु आणि चियो ह्या जपानच्या क्योटो शहरामधील गेइशा गृहाला विकल्या जातात. तात्सु ही मोठी बहीण आणि हुबेहुब आईसारखे डोळे घेऊन जन्माला आलेली चियो ही धाकटी बहीण. तात्सुमधे गेइशा बनण्याचे मुलभूत गुणच नसतात त्यामुळे तीची रवानगी वेश्यागृहात होते आणि नऊ वर्षाच्या चियोला गेइशा गृहात छोटी मोठी कामं करावी लागतात. चियो लहानपणापासूनच देखणी असल्याने गेइशा गृहाची प्रमुख गेइशा हात्सुमोमो हिचा तिच्यावर विशेष राग असतो.

गेइशागृहातील पम्पकीन नावाची एक मुलगी चियोला सांभाळून घेत असते. चियोची आणि तिची मैत्री जमते पण बहीणीपासून ताटातूट झाल्यामुळे चियोच्या डोक्यात वारंवार आपल्या बहीणीला भेटण्याचे विचार रेंगाळत असतात. अचानक तिची आणि बहिणीची गाठभेट होते आणि दोघी त्या वस्तीतून पळून जायचं ठरवतात. पण इथे चियोचं दुर्दैव आड येतं. तात्सु पळून जाण्यात यशस्वी होते, तर लहानग्या चियोला मिळते आपल्या आईवडिलांच्या निधनाची आणि बहिणीच्या पळून जाण्याची बातमी. आता गेइशागृह हेच तिचं घर आणि त्याची चालक नित्ता ओकियो हीच तिची आई, हे चियोच्या मनावर ठसवलं जातं. चियोने पळुन जाण्याची योजना आखल्यामुळे, आता तिला गेइशा न बनता फक्त घरकाम करणारी नोकर म्हणूनच गेइशागृहात रहावं लागेल, अशी शिक्षा फर्मावली जाते. त्यात हात्सुमोमोही या ना त्या कारणाने चियोवर आपला राग काढत असते.

या सर्वाला कंटाळलेली व हताश झालेली छोटी चियो एका लाकडी पुलावर बसून अश्रू ढाळत असतानाच तिची भेट होते एका धनिकाशी, ज्याला ती चेअरमन म्हणते. चेअरमन तिची विचारपूस करतो, तिला धीर देतो. लहानग्या चियोच्या मनात प्रेमाची पहिली पालवी फुटते ती इथेच. चेअरमनने तिला खाऊसाठी दिलेले सर्व पैसे ती प्रार्थनेत देऊन टाकते आणि देवाकडे मागणं मागते की, “मला गेइशा बनव व चेअरमनची आणि माझी पुन्हा गाठभेट घडू दे.” त्याप्रसंगानंतर चिओ प्रत्येक क्षण फक्त चेअरमनची गेइशा बनता यावं म्हणून जगते.

चियोच्या प्रयत्नांना फळ येतं. चियो पंधरा वर्षांची होते आणि हात्सुमोमोची प्रतिस्पर्धी ममेहा एके दिवशी चियोची मालकीण नित्ता ओकियोला येऊन भेटते. चियोला गेइशा बनविण्याची सर्व जबाबदारी ममेहा स्वत:वर घेते. चियो गेइशा बनण्यासाठी आवश्यक असलेल्या कला आणि कौशल्य आत्मसात करते. ज्या दिवशी चियो गेइशा म्हणून पूर्णपणे तयार होते, त्यादिवशी तिची नाव बदलून सायुरी असं ठेवण्यात येतं.

सायुरी बनलेल्या चियोची एका पार्टीमधे चेअरमनशी भेट होते. त्याचवेळी हात्सुमोमो तिथे येऊन सायुरीचं मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न करते पण सायुरी हार मानत नाही. हळूहळू सायुरी शहरातील नामांकित गेइशा बनते. ती कुमारिका असल्याने तिच्या सहवासासाठी वाट्टेल ती किंमत मोजायला धनिक तयार असतात. आपली पुरूषाच्या सहवासातील पहिली रात्र चेअरमनच्या सहवासात असावी असं तिला मनापासून वाटत असतं पण तसं घडत नाही.

गेइशागृहाची मालकीण नित्ता ओकियो हिच्या मनात सायुरीची मैत्रीण पम्पकीन हिला दत्तक घेऊन गेइशागृहाची भावी मालकीण बनविण्याची इच्छा असते पण सायुरीच्या गेइशा बनण्यामुळे सर्व चित्रच पालटून जातं. पम्पकीन म्हणजे हात्सुमोमोच्या हातातील बाहुलं आहे हे नित्ता ओकियोला कळून चुकतं आणि दत्तक घेण्यासाठी सायुरीची निवड केली जाते. हात्सुमोमो आता आपला मत्सर दाबून ठेवू शकत नाही. पण शेवटी हात्सुमोमोला गेइशागृह सोडून जावं लागतं. आता सायुरी बनते गेइशागृहाची भावी मालकीण नित्ता सायुरी.

गेइशा बनल्यानंतर आता तरी आपल्याला चेअरमनचा सहवास लाभेल, हे स्वप्न बाळगणा-या सायुरीच्या स्वप्नांचा चुराडा होतो, तो दुस-या महायुद्धाच्या आघाताने. अमेरिकेने जपानवर केलेला हल्ला पचवता पचवता अनेक जपानी नागरिकांना आपल्या दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत पडते. सायुरीलाही आपला गेइशाव्यवसाय सोडून कापड रंगवण्याचं काम करावं लागतं. परिस्थितीचे चटके सहन करता करता आपण गेइशा आहोत, हेही सायुरी विसरलेली असते.

पण गेइशाच्या सहवासाचा आनंद घेणारे रसिक मात्र गेइशांना विसरलेले नसतात. नोबु सान हा गेइशाकडे कधीही ढुंकून न पहाणारा चेअरमनचा व्यवसायिक भागिदार. पण सायुरीच्या सौंदर्याने त्यालाही वेडं केलेलं असतं. तो पुन्हा एकदा सायुरीला गेइशा बनण्यासाठी आवाहन करतो. युद्धानंतर जपानमधे व्यवसायासाठी आलेल्या अमेरिकन व्यावसायिकांना खूष करण्यासाठी त्याला सायुरीची गरज असते. सायुरी आपली गुरु ममेहा हिच्याकडे मदतीसाठी जाते. ममेहाच्या मदतीने सायुरी पुन्हा एकदा गेइशा बनते. मात्र नोबु सानची सायुरीबद्दलची अभिलाषा आणखीनच बळावलेली असते. पण सायुरीचं मन मात्र चेअरमनच्या सहवासासाठी आतुर असतं. पण असं काही घडतं की सायुरीला चेअरमनच्या आठवणी आपल्या मनातच लपवून ठेवाव्या लागतात. महायुद्धात आपला जीव वाचवणारा उपकारकर्ता म्हणून सायुरी मन मारून नोबु सानला आपला सहवास देण्यासाठी तयार होते आणि त्याचवेळी तिचा प्रियकर चेअरमन तिच्यासमोर येऊन उभा ठाकतो.

ऑस्करसहित इतरही अनेक पुरस्कारांचा मानकरी ठरलेल्या ह्या चित्रपटाला रॉब मार्शल यांचं दिग्दर्शन लाभलं आहे. चियो उर्फ सायुरीच्या भूमिकेत झियी झॅन्ग हिने सुंदर अभिनय केला आहे. चेअरमन समोर आल्यावर होणारी जीवाची घालमेल तिने सुंदर दाखवली आहे. चित्रपटातील शेवटच्या दृश्यात तिचा चेहरा कमालीचा बोलका वाटतो. चेअरमन झालेल्या केन वॅटनबेच्या अभिनयाला फारसा वाव मिळालेला नाही पण एक प्रगल्भ व्यवसायिक चेअरमन त्यांनी सुरेख रंगवला आहे. मिशेल योहने ममेहाच्या भूमिकेत एक शांत व समजूतदार गेइशा उभी केली आहे. गॉन्ग ली ने साकारलेली मत्सरी हात्सुमोमो अस्सल वाटते. छोट्या चियोच्या भूमिकेत सुझुका ओह्गो गोड दिसली आहे व तिने तितकाच उत्तम अभिनयही केला आहे.

गेइशा म्हणजे पुरूषांना आकर्षित करणारी, पुरूषांना रिझवणारी स्त्री. पण तिच्या मनात काय आहे, कुणाला ठाऊक असतं? आर्थर गोल्डन यांच्या मेमोअर्स ऑफ अ गेइशा या कादंबरीवर बेतलेला हा चित्रपट एका स्त्रीच्या अंतरंगाचं जवळून दर्शन घडवतो.

जपानमधे गेइशा बनण्याची परंपरा फार जुनी आहे. गेइशा बनण्यासाठी मुलीला लहानपणासून प्रशिक्षित केलं जातं. नृत्य, संगीत यामधील निपुणतेसोबतच शिष्टाचार, पुरुषांना रिझवणारं वागणं-बोलणं हे सर्व गेइशा बनण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षणाचा भाग आहेत. एखाद्या मुलीने गेइशा बनण्याचं संपूर्ण प्रशिक्षण घेतल्यावरही ती लगेचच गेइशा बनत नाही. तिला अधी ’मायको’ म्हणजे शिकाऊ गेइशा म्हटलं जातं. वीस-बावीसाव्या वर्षी जेव्हा अनुभवांनी ती परिपक्व होते, तेव्हा तिला गेइशा ही उपाधि मिळते. मात्र, गेइशा म्हणजे केवळ शरिरविक्रय करणारी स्त्री नाही तर ती पुरूषाची जवळजवळ अर्धी पत्नी असल्यासारखीच असते. आपल्या वाक्चातुर्यावर, हावभावांवर व नृत्य-संगीतावर पुरुषाचं मन जिंकून घेण्याचं कसब तिला साधावं लागतं. परिस्थितीमुळे जरी मुली गेइशा बनत असल्या तरी गेइशा बनण्याचं तंत्र अवगत करणं हीदेखील एक कला आहे.

Comments