सिंडरेला मॅन (२००५) - परिकथा वाटावी अशी एका बॉक्सरची सत्यकथा!

जेम्स जे. ब्रॅडॉक, एक प्रतिथयश बॉक्सर. आपल्या बॉक्सिंगच्या कौशल्यावर त्याने खूप नाव कमावलंय. त्याच्या आयुष्यात कशाचीही कमतरता नाहीये. सुंदर पत्नी, गोजिरवाणी मुलं, पैसा, प्रसिद्धी. जे जे माणसाला आपल्या आयुष्यात असावं असं वाटतं, ती प्रत्येक गोष्ट आहे जेम्सकडे. १९२८ सालचा सर्वोत्कृष्ट मुष्टीयोद्धा आहे तो. पण जर सगळं आहे तसंच सुरळीत चालू राहिलं असतं, तर दैव कशाला म्हटलं असतं बरं!

१९२९ ते १९३३, ग्रेट डिप्रेशनचा काळ! दुस-या महायुद्धाची चाहूल लागत होती. जागतिक अर्थव्यवस्था पूर्णत: कोलमडून गेलेली. जेम्सचं पूर्वीचं वैभव, दिमाख पार धुळीला मिळालंय. पण फक्त जेम्सच नाही तर त्याच्यासारख्या कित्येकांनी स्टॉक मार्केट मधे गुंतवलेले आपले पैसे गमावल्याने त्यांच्यावर ही वेळ आलीय. कित्येकजण बेकार झालेत. कित्येकजण आपलं घर, कुटुंब सोडून परागंदा झालेत. कित्येकजण काम मागत फिरतायंत. कित्येकांनी निदान आपल्या मुलांना तरी दोन वेळ पोटभर जेवता यावं म्हणून काही सधन घरांमधे आश्रयासाठी पाठवलंय. पण जेम्स मात्र आपल्या मोठ्या मुलाला वचन देतो की काहीही झालं तरी तो आपल्या मुलांना स्वत:पासून वेगळं करणार नाही.

अधूनमधून मिळणा-या बॉक्सिंगच्या कामावर जेम्सला थोडीफार मिळकत होते पण त्याच्या कुटुंबाला पुरी पडावी इतकी ती रक्कम नसते. दूध, वीज धान्य यांची थकबाकी वाढतच असते. त्यातच फाईटच्या वेळेस जेम्सचा उजवा हात तीन ठिकाणी मोडतो. त्याचा हात प्लॅस्टरमधे जखडला जातो. जेम्सला त्या बॉक्सिंगचे पैसे तर मिळत नाहीतच, उलट आता तो मुष्टीयुद्ध खेळण्याचा लायकीचा राहिलेला नाही, असा शेरा मारून त्याला बॉक्सर्सच्या यादीतून बाहेर काढले जाते. शेवटी ती वेळ येतेच जेव्हा जेम्सची पत्नी मेई आपल्या तीनही मुलांना तिच्या नातेवाईकांकडे पाठवते. दूध, वीज, धान्य यांच्या उधा-या आणि थकबाकी चुकवून आपल्या मुलांना घरी आणता यावं, म्हणून आपल्या जुन्या सहका-यांकडे, मुष्टीयुद्धाच्या आयोजकांकडे, जेम्स अक्षरश: हात पसरून पैशाची भिक मागतो आणि आपल्या मुलांना घरी आणतो.

जेम्सचा मॅनेजर जो गुल्ड याला जेम्सची ही अवस्था पहावत नाही. तो त्याच्यासाठी पुन्हा एकदा बॉक्सिंगची ऑफर घेऊन येतो आणि या बॉकिसंगमधे जेम्सचा सामना असतो जगातील दुस-या क्रमांकाच्या हेवीवेट प्रतिस्पर्धी जॉन कॉर्न ग्रिफिन याच्याशी. जेम्सला केवळ सुदैवाने ही फाईट मिळालेली असते. मिळालेल्या संधीचं जेम्स सोनं करतो. तो ती फाईट जिंकतो आणि त्यानंतर बॉक्सिंगचं क्षेत्र त्याला पुन्हा खुलं होतं. त्याच्या पत्नीला मात्र जेम्सने हया क्षेत्रात पुन्हा जावं हे आवडलेलं नसतं.

या फाईटनंतर जेम्सला कामाच्या ठिकाणीही लोक ओळखू लागतात. प्रतिकूल परिस्थितीशी सामना करून पुन्हा आपलं आयुष्य सावरणारा बॉक्सर म्हणून त्याला ’सिंडरेला मॅन’ अशी उपाधी मिळते. पण इतक्यावरच सगळं आटोपत नाही. पुढे एका मुष्टीयुद्धात जेम्सचा सामना होतो तो मॅक्स ब्रिअरशी.

मॅक्स ब्रिअर, ज्याच्या फटक्यांची चर्चा केली जाते. त्याचा नॉक आऊट पंच म्हणजे केवळ बॉक्सिंग रिंगच्या बाहेर जाणं नव्हे, तर या जगाचा निरोप घेणं. अश्या ह्या मॅक्स ब्रिअर सोबत जेम्सला आपली फाईट लढावी लागते. जेम्सने बॉक्सिंग खेळण्यासाठी त्याची पत्नी त्याला विरोध करते पण जेस्म ऐकत नाही आणि बॉक्सिंगसाठी तयार होतो.

डॉ. जो डी ब्युकॅम्प यांच्या ’सिंडरेला मॅन’ या सत्यकथेवर आधारित कादंबरीवरून बनवलेला हा चित्रपट आहे. ग्रेट डिप्रेशनच्या काळातील वास्तव किती भयानक होतं याचं समर्पक चित्रण या चित्रपटात पहायला मिळेल. पती-पत्नीच्या नात्यामधील अतूट प्रेम, विश्वास, काळजी या विविध पैलूंचं दर्शन घडवण्यासाठी चित्रपटात अनेक प्रसंग उभे केलेले आहेत. आपल्या मुलांना परत आणण्यासाठी जेम्स आपल्या सहका-यांसमोर हात पसरून पैसे मागतो, तो प्रसंग खूप हृदयद्रावक आहे.

ग्लॅडिएटर चित्रपटात शिर्षक भूमिका साकारणा-या रसेल क्रो याने या चित्रपटातंही शिर्षक भूमिका म्हणजेच जेस्म ब्रॅडॉकची भूमिका साकारली आहे. आर्थिक विवंचनेमुळे चेहे-यावर येणारा ताण, पैसे मागतानाची अगतिकता आणि लाचारी, या भावना रसेलने इतक्या सुंदर दाखवल्या आहेत की डोळ्यातून पाणी न आलं तरच नवल! जेम्सला या चित्रपटातील अभिनयासाठी त्या वर्षीचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार व २००६ सालचा समिक्षक गौरव पुरस्कार यासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

जेम्सचा मॅनेजर म्हणून पॉल गिमटी ने आवश्यक असा अभिनय केला आहे. सर्वोत्कृष्ट सह अभिनेता म्हणून पॉलला या चित्रपटासाठी बरेच पुरस्कार मिळाले आहेत.

जेम्सची पत्नी म्हणून रिनी झेलवेगर शोभून दिसते. चढत्या काळात जेम्सचं कौतुक करणारी आणि पडत्या काळात जेम्सला सावरून घेणारी, प्रोत्साहन देणारी मेईची भूमिका रिनीने उत्तम वठवली आहे. क्रेग बायर्को याला मॅक्स ब्रिअरच्या भूमिकेसाठी फार प्रसंग वाट्याला आलेले नाहीत पण मिळालेया प्रसंगांमधे त्याने उन्मत्त आणि माजोरडा बॉक्सर छान साकारला आहे.

ब्युटीफुल माईंड या चित्रपटाचे दिग्दर्शक रॉन हॉवर्ड यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट दिग्दर्शक म्हणून रॉन हॉवर्ड यांना सिल्व्हर रिबन पुरस्कारही मिळाला आहे.

ही एक सत्यकथा आहे, तरीही जेम्स जे. ब्रॅडॉक या बॉक्सरच्या आयुष्यात जे घड्लं, ते एका परिकथेपेक्षा कमी नाही म्हणून त्याला सिंडरेला मॅन ही उपाधी मिळाली आहे. जेम्स जे. ब्रॅडॉकबद्दल अधिक माहिती हवी असल्यास येथे टिचकी द्या.

Comments