नटरंग उभा, ललकारी नभा, स्वरताल जाहले दंग! (२००९)

’एका कलाकाराच्या आयुष्याचा तमाशा’, या चार शब्दांमधे नटरंगची कथा सामावलेली आहे. आयुष्यभर कलेसाठी दिलेलं योगदान म्हणून एखाद्या ज्येष्ठवयीन कलाकाराला जेव्हा ’जीवनगौरव पुरस्कार’ सारखा सन्मान लाभतो, तेव्हा तिथे टाळ्या वाजवणारे असंख्य हात उपस्थित असतात. त्यातल्या कित्येक हातांना त्या कलाकाराचं नेमकं योगदान किती आणि काय, हेही ठाऊक नसतं. कलेसाठी केलेल्या खडतर तपश्चर्येचा साक्षिदार असतो, तो त्या पुरस्काराचा मानकरी कलाकार आणि ज्यांनी त्याची तपश्चर्या अगदी जवळून पाहिली आहे, असे त्याचे सोबती.

कागलगावचा गुणवंत वृत्तीने मल्ल पण हाडाचा कलाकार आहे. व्यायाम करून आपल्या शरीराचा मर्दानी बाज राखणारा हा गुणा, मनाने मात्र कवी आहे, उत्तम अभिनेता आहे. दिवसभर दुस-याच्या शेतावर राबून, आपल्या कुटुंबासाठी मजूरी करताना, संध्याकाळी मात्र फडावरची घुमणारी ढोलकी त्याला साद घालीत असते. गुणाला कलेचं अभिजात अंग आहे. तो उत्तम कवनं करू शकतो, त्यामुळे त्याच्यासाठी लावणी म्हणजे नुसती फडावर नाचणारी बाई नाही. तमाशा म्हणजे त्याच्यासाठी गीत, नृत्य, संगीत आणि सौंदर्य याची रेलचेल असलेला असा दरबार आहे.

पण नुसती कला पाहून नि कलाकार असून पोट भरत नाही. रोजच्या मिळणा-या मजूरीमधे दोन वेळेची भाकरी मिळायची पंचाईत होत असतानाच, रोजची मजूरीही हातातून हिसकावली जातेय असं लक्षात आल्यावर गुणाच्या आतील कलावंत त्याला कलेतूनच उपजिविका भागविण्याचा नवा मार्ग सुचवतो. तो आणि त्याचे काही सोबती मिळकतीसाठी तमाशा काढायचं ठरवतात. उत्साहात सर्व गडी सामानाची जमवाजमव करून तालमीही सुरू करतात. पण तमाशा म्हटला म्हणजे तो बाईशिवाय सुरूही होत नाही आणि बाईशिवाय संपतही नाही. मोठ्या मुश्किलीने बाई मिळून जेव्हा तमाशाला आकार देण्याची वेळ येते, तेव्हा नाच्याच्या कामासाठी कुणी तयार होत नाही. हो, नाही करता करता शेवटी गुणावरच नाच्या बनण्याची वेळ येते आणि सुरू होतो, एका कलाकाराच्या आयुष्याचा तमाशा.

अतुल कुलकर्णींसारख्या गुणी अभिनेत्याने गुणाची भुमिका साकारून तिचं सोनं केलं आहे. मध्यंतरापूर्वीचा मर्दानी तोरा असलेला गुणा आणि मध्यंतरानंतर केवळ कलेच्या आसक्तीपायी आपला मर्दानी बाज उतरवून लचकत मुरकत चालणारा तमाशातील नाच्या, अतुल कुलकर्णींनी अतिशय प्रभावीपणे साकारला आहे. मल्ल आणि नाच्या यांच्यातील फरक १०१ टक्के जाणवतो.

तमाशातील नाच्या म्हणजे सर्वांच्या चेष्टेचा विषय. पण नाच्या म्हणजे बाईसारखे हावभाव करणारा, गर्र्कन टाळी वाजवून हाताचा पंजा पुढे करणारा आणि तमाशा सुरू असताना, ’आत्ता गं’ म्हणणारा तृतीयपंथी नव्हे. एका मर्दाने स्त्रीसारखे हावभाव करून, जणू आपण स्त्रीच आहोत, असं भासवणं म्हणजे तोंडच्या गप्पा नाहीत. त्यासाठी गुणाला खूप मोठं बलिदान द्यावं लागतं. ती व्यथा आणि वेदना अतुल कुलकर्णींच्या चेहे-यावरील रेषेरेषेत दिसते.

अतुल कुलकर्णींप्रमाणेच अभिनयासाठी उल्लेख करावा लागेल, तो किशोर कदम यांचा. फडाच्या व्यवस्थापकाचा व्यवहारीपणा आणि व्यावसायिकपणा किशोर कदम यांनी अचूकपणे आपल्या अभिनयातून दाखवला आहे. हाडाचा कलावंत आणि पोटाचा कलावंत यांच्यात शेवटी हाडाचा कलावंतच तग धरून रहातो, हे दाखवण्यासाठी चित्रपटात जे प्रसंग आले आहेत, ते पहाताना तमासगीर कोणकोणत्या अग्निदिव्यातून जात असतील, गेले असतील याची कल्पना येते.

अप्सरा आली आणि आता वाजले की बारा या गाण्यांमधील शब्द न् शब्द अलंकार लेवून नटला आहे. विशेषत: अप्सरा आली हे गाणं, ’ही लावणी आहे की अप्सरेचं स्तुतीगान” असा प्रश्न पडावा इतपत सुंदर झालेलं आहे. चित्रपटातील संवाद सुंदर आहेत मात्र पात्रांच्या संवादफेकीमधे किंचित शहरीपणा जाणवतो.

चित्रपटाचे गीत व संवाद लेखक गुरू ठाकूर यांनी या चित्रपटात एक छोटीशी पण लक्षात राहण्याजोगी भूमिका साकारली आहे. सोनाली कुलकर्णी व प्रिया बेर्डे यांच्या भूमिका तशा लहानच आहेत पण दोघींनीही आपापली बाजू व्यवस्थित सांभाळली आहे. सोनालीचं नृत्यकौशल्य डोळ्यात भरणारं आहे. इतर सहकलाकारांची कामही चोख झाली आहेत. पाहुणी कलाकार असलेल्या अमृता खानविलकरचं ’आता वाजले की बारा’ हे एक धमाल आणि श्रवणीय लावणीनृत्य आहे.

अजय-अतुल या संगीतकार जोडीबद्दल काय म्हणावं? नेहमीप्रमाणेच दणकेबाज आणि थोडं वेगळ्या बाजाचं संगीत त्यांनी या चित्रपटाला दिलं आहे. आहे. अजय-अतुल यांच्या संगीतातच अशी जादू आहे की आपण हातातलं काम थांबवून त्यांचं संगीत ऐकावं.

बेला शेंडे यांनी सर्वच गाणी उत्कृष्ट गायली आहेत पण ’आता वाजले की बारा’ ह्या गाण्यामुळे त्यांच्यातील गायिकेने खूप मोठी जबाबदारी पेलून ती पारही पाडून दाखवली आहे. अप्सरा आली हे गाणं ऐकताना आपल्याला वेगळ्याच काळात गेल्याचा भास होतो. तर ’खेळ मांडला’ ह्या गाण्यात अजय गोगावले यांनी जो आर्त स्वर लावला आहे, त्यामुळे ते जास्त लक्षात रहातं. ’कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी’ ही गवळण शब्दांप्रमाणे नटखट आहे. चित्रपटातील तीनही कटाव ऐकताना छान वाटतं आणि ऐकताना बोटांचा ठेका आपसूक धरला जातो.

ज्याला ’टीम वर्क’ म्हणता येईल, असा हा चित्रपट आहे. संपूर्ण मराठी बाजाचा, मराठी रंगाचा. तमाशाप्रधान असूनही तमाशाकडे वेगळ्या दृष्टीने पहायला लावणारा हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात मानाचं पान मिळवणार हे नक्की.

रसिक होऊ दे दंग चढू दे, रंग असा खेळाला<
साता जन्माची देवा पुण्याई लागू दे आज पणाला
हात जोडतो, आज आम्हाला, दान तुझा दे संग
नटरंग उभा, ललकारी नभा, स्वरताल जाहले दंग

Comments