निंजा अस्सासिन (२००९) - किल बिलशी नातं सांगणारी हिंसा

अनाथालयात रवानगी झाल्यावर त्याला एक मारेकरी बनण्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिलं जातं. त्याच्यासारखी अनेक मुलं त्या अनाथालयात निंजा बनण्याचं प्रशिक्षण घेत असतात. त्यांना आपला भाऊ नि आश्रयकर्त्याला वडील समजायचं असतं, हे त्याला शिकवलं जातं. मारेक-याला हृदय नसतं, त्याने फक्त जीव घ्यायचा असतो हे त्याच्या मनावर बिंबवलं जातं. त्यासाठी खडतर परिश्रम आणि अपार वेदना यांना तो सामोरा जातो.

पण मारेक-याला हृदय नसतं, हे काही त्याला शिकता येत नाही. तारूण्याच्या उंबरठ्यावर त्याचाचसारखी निंजा बनण्याचं प्रशिक्षण घेणारी "ती" त्याच्याही नकळत त्याच्या हृदयात आपलं स्थान निर्माण करते. मोठेपणी तो एक मारेकरी होतोही पण हृदयात जागा निर्माण करून गेलेल्या तिला तो विसरू शकत नाही. तिच्याचसारख्या आणखी एका तरूणीशी त्याची पुन्हा गाठभेठ होते पण अगदी निराळ्या परिस्थितीत. आपल्याच भावांशी आणि आश्रयकर्त्याशी वैर पत्करल्याची किंमत मोजणं त्याला भाग असतं.

किल बिल च्या दुस-या भागात ज्या प्रकारचा हिंसाचार दाखवला आहे, अगदी तसाच हिंसाचार या संपूर्ण चित्रपटात ठायी ठायी भरलेला आहे. मात्र ’पुढे काय’ची उत्कंठा या चित्रपटाने शेवट पर्यंत पकडून ठेवलेली आहे. कराटे किंवा कुंग फू सारख्या हातापायांचा वापर करून लढल्या जाणा-या युद्धाच्या डावपेचांपेक्षा निंजांच्या क्रूर युद्धनितीवर व ते कोणकोणती शस्त्रास्त्रे वापरतात यावर चित्रपटात भर दिला आहे. चित्रपटातील काही दृश्यदेखील अवास्तव वाटतात. पण एकूणच मारधाडपटाच्या श्रेणीतील व युद्धकलेवर आधारीत हा चित्रपट असल्याने त्यांच्याकडे चित्रपटाच्या अनुषंगाने दुर्लक्ष करता येऊ शकतं.

अभिनयाच्या दृष्टीने हा चित्रपट पाहिला तर हाती काहीच लागणार नाही. चित्रपट शंभर टक्के मारधाडपट असल्याने अभिनय करावा इतका वाव प्रत्यक्ष नायकालाही मिळालेला नाही. मिकाचं काम करणारी निओमी हॅरीस तेवढी जमेल त्या दृश्यात अभिनय करते. ब-याच मारधाडपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या जेम्स मॅकटिग यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. मारधाडपटांच्या दिग्दर्शनाचा त्यांचा दांडगा अनुभव या संपूर्ण चित्रपटभर दिसत रहातो. ज्यांना प्रचंड हिंसा असलेले चित्रपट पहायला आवडतात, त्यांना हा चित्रपट नक्कीच आवडेल.

Comments