शटर आयलन्ड (२०१०) - एक गढूळ वास्तव

सर्वसामान्य माणसांसाठी धोकादायक असलेल्या मनोरूग्णांना शटर आयलन्ड या ठिकाणी एका मनोरूग्णालयात ठेवलं आहे. या रूग्णालयातून रेचल सलॅन्डो नावाची मनोरूग्ण स्त्री सर्वांच्या डोळ्यात धूळ फेकून पळ काढते आणि तिचा शोध घेण्यासाठी टेड डॅनिअल्स आणि चक ऑले या दोन मार्शल्सना पाचारण करण्यात आलेलं असतं. खरंतर चारही बाजूंनी समुद्र आणि उंच कडेकपा-यांतून अनवाणी पळ काढणं कुठल्याही मनोरूग्णाला अशक्यच असतं, हे मनोरूग्णालयाचे सुरक्षा अधिकारीही बोलून दाखवतात. रेचल मात्र तिथून पळ काढण्यात यशस्वी होते.

शटर आयलन्डवर दाखल झाल्याक्षणापासूनच टेड डॅनिअल्सला तिथे काहीतरी गूढ घडत असल्याचा भास होत असतो. कदाचित त्याच्या दिवंगत पत्नीच्या मृत्यूला कारणीभूत असलेला ऍन्ड्र्यू लेडीस याच मनोरूग्णालयात दाखल असल्यामुळे असेल. रेचलच्या शोधासोबतच टेडीला ऍन्ड्र्यूला पहाण्याचीही उत्सुकता आहेच. आपल्या कामाला सुरूवात केल्यावर टेडला लक्षात येऊ लागतं की आपल्याला इथे काहीतरी गूढ घडतंय असं जे वाटतंय, ते खरं असावं. मनोरूग्णालयातील कर्मचारीच नव्हेत, तर पेशंट्ससुद्धा त्याच्यापासून काहीतरी लपवत आहेत, असं त्याला सारखं वाटत रहातं. डॉक्टर कॉली यांचं संशयस्पाद वागणंदेखील टेडीला अस्वस्थ करत रहातं. मदत मिळूनही न मिळाल्यासारखी असते, त्यातच निसर्गही रौद्र रूप धारण करतो. रेचलचा शोध घेणं हे एक मोठा गुंता सोडवायला घेण्यासारखं आहे, हे टेडला कळून चुकतं, पण तो या आव्हानाला तयार होतो. हळूहळू गुंता सोडवताना एक एक गाठ उकलत जाते आणि टेडला एका अनपेक्षित रहस्याची उकल होते.

बऱ्याचदा कथा वाचताना तयार झालेल्या वाचकाच्या कल्पनाविश्वाला चित्रपटातील प्रसंगांनी तडा जातो. चित्रपट पाहिल्यानंतर जर कथा वाचली तर दृश्य परिणामकारक वाटत नाहीत. पण डेनिस लेहानच्या कादंबरीतील कथानकाला दिग्दर्शक मार्टीन स्कॉर्सेसेने शंभर टक्के न्याय दिला आहे असं म्हणायला हरकत नाही. बहुधा कादंबरीतील प्रसंगांना चित्रपटात जसंच्या तसं चित्रीत केलं गेलं असावं म्हणून असेल. चित्रपटात एक दोन प्रसंग असे आहेत जिथे चित्रपटाच्या शेवटी शेवटी कळणारं रहस्य आत्ताच कळतंय की काय असं वाटून जातं पण त्या प्रसंगाना मार्टीन स्कॉर्सेसेने व्यवस्थित हाताळलं आहे. हाणामारिव्यतिक्तही एक उत्कृष्ट, खुर्चिला शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा आणि क्वचित प्रसंगी प्रेक्षकालाच गोंधळात पाडून त्याची गंमत पहाणारा चित्रपट म्हणून शटर आयलन्ड पहायला हरकत नाही.

चित्रपटाचा शेवट नीट कळला तर चित्रपट पुन्हा पहावा. चित्रपटातील आधी पाहिलेल्या घटनांचे योग्य अर्थ आपल्याला दुसऱ्या वेळेस नीट कळतात. ते तपशीलवार असूनही पहिल्या वेळेस कळत नाहीत, लक्षात येत नाहीत, हे दिग्दर्शकाचं कसब कि आपला कथेमध्ये रंगून जाण्याचा भाबडेपणा, कोणास ठाऊक?

Comments