थ्री इडियट्स (२००९) – ऑल इज वेल

थ्री इडियट्स म्हणजे कोपरखळ्या मारत विनोदाच्या अंगाने आपल्याला वास्तवाचं दर्शन घडवणारा चित्रपट! चित्रपटात इंजिनिअरिंगची पार्श्वभूमी केवळ कथानकासाठी वापरली आहे. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना येणा-या अडचणी हल्ली सर्वच क्षेत्रातील विद्यार्थ्यांना भेडसावत आहेत. डेडलाईन्स, व्यवसायिक स्पर्धांसारखी आव्हानं, आणि कौटुंबिक जबाबदा-या यांचा ताळमेळ बसवताना माणसातील जिवनेच्छा पार कोमेजून जाते. त्यातच जर करिअर म्हणून निवडलेलं क्षेत्र आपल्यावर लादलं गेलेलं असेल, तर होणारी मनाची घुसमट कुणाला सांगता न येण्यासारखी!

राजू रस्तोगी, फरहान कुरेशी आणि रणछोडदास श्यामलदास चांचड उर्फ रॅंचो या इंजिनिअरींग कॉलेजमधे शिकणा-या तीन मित्रांची ही कथा. हे तिघे एकमेकांचे घट्ट मित्र असतात. पण शेवटच्या वर्षी इंजिनिअरिंगची डिग्री मिळाल्यावर रॅंचो कुणाचाही निरोप तडकाफडकी निघून जातो. तो कुठे जातो, काय करतो हे कुणालाच कळत नाही. हवेत विरल्यासारखा तो पाच वर्षे गायब असतोआणि एक दिवस असा उगवतो, जेव्हा राजू आणि फरहान रॅंचोला शोधण्यासाठी आपली कामं सोडून धावतात. रॅंचोला शोधण्याच्या प्रवासात या तीन मित्रांची कथा आपल्यासमोर तुकडयातुकड्याने उलगडत जाते.

राजू रस्तोगीला मेकॅनिकल इंजिनिअर व्हायचं आहे पण कौटुंबिक जबाबदा-या पार पाडण्यासाठी आपलं इंजिनिअरिंगचं करिअर पुरं पडेल ना, याबद्दल शंका घेऊन त्याचं ना धड अभ्यासात लक्ष लागतंय, ना धड घरात. त्याचा आत्मविश्वासही कमी कमी होत चाललाय.

फरहानला मुळात इंजिनिअरच बनायचं नाहिये. तो आहे एक उत्तम फोटोग्राफर! वन्यजीवांचं छायाचित्रं काढणं त्याला मनापासून आवडतं पण त्याला काय आवडतं या पेक्षा त्याने काय करायला हवं हे ठरवणारे त्याचे अब्बाजान त्याला इंजिनिअरिंगला पाठवतात त्यामुळे तो अक्षरश: दिवस ढकलतो आहे.

रॅंचोची गोष्टच निराळी. त्याला यंत्रामधे रस आहे. पण तो यंत्रच नाही, तर प्रत्येक गोष्टीचा निराळ्या अंगाने विचार करतो. शिकवण्याची सोपी पद्धत अवगत असताना उगाचच प्रत्येक गोष्ट कठीण आणि रटाळ पद्धतीने का शिकायची, हा त्याचा रास्त सवाल आहे.

रॅंचोच्या ह्या पवित्र्यामुळे शिक्षकवर्ग त्याच्यावर कायम राग ठेवून असतो. रॅंचोच्या वागण्यामुळे इंजिनिअरिंग कॉलेजचे डायरेक्टर विरू सहस्त्रबुद्धे उर्फ व्हायरस आणि रॅंचो यांच्यामधे खुन्नस निर्माण होते. पण कुठेतरी त्यांना रॅंचोचे प्रश्न, वागणं विचार करायला लावतं. रॅंचो आणि त्याच्या मित्रांच्या हातात इंजिनिअरिंगची डिग्री पडताना तर त्यांनी रॅंचोचं वेगळेपणं मनापासून मान्य केलेलं असतं.

असा हा जगावेगळा रॅंचो, इंजिनिअरिंग कॉलेज सोडून जाताना आपल्या प्रेयसीचाही निरोप घेत नाही. रॅंचोचा शोध घेता घेता, राजू आणि फरहानला रॅंचोच्या गायब होण्यामागचं रहस्य कळतं आणि मग ते आपल्या मित्राला शोधायचंच असा निर्धार करून पुढच्या प्रवासाला सुरूवात करतात.

रॅंचोच्या भूमिकेत आमिर खानने पुन्हा एकदा धमाल केली आहे. त्याला माधवन आणि शर्मन जोशीची उत्तम साथ लाभली आहे. मुळातच या तीनही अभिनेत्यांचे चेहरे ’चॉकलेटी’ आहेत त्यामुळे इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी म्हणून ते त्या भूमिकांमधे एकदम फिट्ट बसले आहेत. फक्त आमिर खानचा मेक-अप, विशेषत: त्याला तरूण दाखवण्यासाठी काळ्या केलेल्या डोळ्यांच्या कडा आणि गडद केलेल्या भुवया खोट्या वाटतात. पण आमिर खानने आपल्या अभिनयातून इंजिनिअरिंग कॉलेजचा तरूण साकारण्यात कुठेही कमतरता सोडलेली नाही. तो डोळ्यांनी बोलणारा अभिनेता आहे. ब-याच प्रसंगांमधे दिग्दर्शक राजकुमार हिरानीने या गोष्टीचा सुंदर वापर करून घेतला आहे. आमिर, माधवन आणि शर्मन या तीन अभिनेत्यांसोबत विरू सहस्त्रबुद्धे उर्फ व्हायरस म्हणुन बमन इराणी यांनी खुन्नस ठेवणारा डायरेक्टर मस्त साकारला आहे. करिना कपूरचा वावर सुखद आहे. चतुर रामलिंगम उर्फ सायलेन्सरची भूमिका करणा-या ओमी वैद्यने आपल्या अभिनयातून रॅंचोवर असणारी खुन्नस छान दाखवली आहे.

सध्या चित्रपटात दाखवलेल्या रॅगिंगच्या व आत्महत्येच्या दृश्यावरून वाद सुरू आहेत. मात्र चित्रपटात ज्या प्रकारे रॅंचो रॅगींग करणा-याला धडा शिकवतो, ते पहाण्यासारखं आहे. चित्रपटामधे आत्महत्येचा विचार करणा-या युवकांना पुन्हा विचार करायला लावणारे प्रसंग आणि गाणंही आहे.

चित्रपट शेवटी शेवटी परिकथेसारखा झाला असला, तरी पाहताना मजा येते. याही चित्रपटाची हाताळणी मुन्नाभाई १ व २ सारखी आहे, हे जाणवत रहातं. चांगल्या अभिनयाला, चांगलं दिग्दर्शन लाभलं की असे चित्रपट तयार होऊ शकतात. राजकुमार हिरानीने चित्रपटाचं दिग्दर्शन करताना प्रत्येकाच्या अभिनयाला वाव मिळेल, हे पाहिलं आहे. अगदी मिलिमीटरची भूमिका करणारा दुष्यंत वाघही भाव खाऊन जातो.

शंतनू मोइत्रा यांनी लक्षात राहील असं सुंदर संगीत दिलं आहे. स्वानंद किरकिरे यांच्या प्रत्येक गाण्यातील शब्द अर्थपूर्ण आहेत. झुबी-डुबी आणि आल इज वेल या गाण्यांसोबतच लक्षात ठेवण्यासारखं गाणं म्हणजे गिव्ह मी सम सनशाईन, जे आजच्या शिक्षणपद्धतीमुळे गोंधळलेल्या, बावरलेल्या आणि काहीसं रागावलेल्या विद्यार्थ्याची व्यथा सांगणारं आहे. बहती हवा सा था वो आणि जाने नहीं देंगे ही गाणीही श्रवणीय आहेत.

चित्रपटाचं बाह्यचित्रीकरण शिमला, लदाख आणि मनालीसारख्या निसर्गसौंदर्याने नटलेल्या ठिकाणी झालं आहे, त्यामुळे डोळ्यांना सुखावणारं निसर्गसौंदर्य आपल्याला या चित्रपटात पहायला मिळतं.

चेतन भगत यांच्या ’फाईव्ह पॉईन्ट समवन’ या कादंबरीवरून या चित्रपटाची कथा बेतलेली आहे. चित्रपटाच्या शेवटी दाखवल्या जाणा-या नामावलीत त्यांचा व कादंबरीचा उल्लेख आला आहे, मात्र चित्रपट सुरू होताना दाखवल्या जाणा-या श्रेयनामावलीमधे चेतन भगत यांचे नाव नाही. अभिजीत जोशी व राजकुमार हिरानी यांनी या चित्रपटाची सर्वात जमेची बाजू सांभाळली आहे, ते म्हणजे चित्रपटाचे संवाद. खुसखुशीत संवाद वाक्यावाक्याला हसवतात आणि त्याच वेळी आत कुठेतरी विचार करायलाही भाग पाडतात. चित्रपट मोठा आहे पण वाक्यावाक्याला पंच आणि विनोदनिर्मितीमुळे चित्रपटाची लांबी लक्षातच येत नाही. मात्र, मोना सिंगच्या डिलीव्हरीचा प्रसंग उगाचच लांबवल्यासारखा वाटतो.

’अंत भला तो सब भला’ या उक्तीनुसार चित्रपटातील जवळजवळ प्रत्येक प्रसंग सुखांताने संपतो. चित्रपटाचा शेवटही सुखद आहे, ही सिनेमॅटीक लिबर्टी झाली. वास्तवात प्रत्येकाला रॅंचोसारखा एक मित्र मिळू शकत नाही किंवा प्रत्येक व्यक्ती रॅंचोसारखं आयुष्यही जगू शकत नाही. मात्र आजच्या तरूणांचा प्रतिनिधी म्हणून जर रॅंचोची व्यक्तिरेखा गृहीत धरली तर चित्रपटात येणारा प्रत्येक प्रसंग आपल्याला एक संदेश देऊन जातो. तो संदेश समजून घेतला, तर आपली आत्ताची शिक्षणपद्धती आणि विचारपद्धती बदलण्याची गरज आपल्याला निश्चितच जाणवेल. आत्महत्येचा विचार करणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्यामधील विचारांची दरी दूर होण्यासाठी या चित्रपटाची निश्चितच मदत होऊ शकेल.

एकूणच थ्री इडियट्सला आल इज वेल असं म्हणून पहायला हरकत नाही.

Comments