व्हेन इन रोम (२०१०) – प्रेमात पडल्यावाचून रहाता येईल...?

न्यू यॉर्कसारख्या मोठ्या शहरात काम करणारी बेथ आपल्या कामाशी इतकी एकरूप झालेली आहे की प्रेमासारखी गोष्ट तिच्या आयुष्यात आली. आपल्या बॉयफ्रेंडबरोबरचे संबंध तोडताना ती हे स्पष्टपणे सांगते की जेव्हा तिला तिच्या कामापेक्षाही जास्त महत्त्वाचा वाटेल असा कुणीतरी भेटेल, तेव्हा ती नक्की विवाहबद्ध होईल.

बेथदेखील खऱ्या प्रेमासाठी आसुसलेली असते पण हे प्रेम आपल्याला कधीच मिळणार नाही, असं तिला वारंवार वाटतं. बहिणीच्या लग्नासाठी म्हणून ती रोमला जाते आणि नवरदेवाचा भाऊ निक तिला आवडतो पण त्याला दुस-याच एका स्त्रीच्या बाहुपाशात ती पहाते आणि तिला वाटतं की जगात खरं प्रेम अस्तित्वातच नसावं. शॅम्पेनच्या तिरिमिरीत बेथ फाउंटन ऑफ लव्ह मधे पाय सोडून बसते. या फाउंटनकडे न पहाता कॉईन टाकून जर प्रेमाची इच्छा केली तर ती फलद्रूप होते, अशी या फाउंटनची महती आहे.

वारंवार प्रेमात अयशस्वी होणारी बेथ आपल्यासारख्याच प्रेमाची खोटी आस बाळगणा-या काही वेड्यांना मुक्त करायचं ठरवते आणि त्या फाउंटन ऑफ लव्ह मधील काही कॉईन्स चोरते. तिला वाटतं की ज्यांचे कॉईन्स तिने चोरलेत, ते लोक आता प्रेमभंगापासून वाचतील पण प्रत्यक्षात भलतंच घडतं!

गोस्ट रायडरसारखा ऍक्शन थ्रिलरपट आणि सायमन बर्चसारख्या हळुवार नातेसंबंधांवर आधारित चित्रपटाचं दिग्दर्शन करणा-या मार्क स्टिव्हन जॉन्सन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट मुळातच एक प्रेमकथा आहे पण जॉन्सननी बेथ आणि निक यांचे प्रसंग खूप चांगल्या रितिने सादर केले आहेत. चित्रपटाच्या सुरूवातीला काहिशा रुक्ष व संथ वाटणा-या बेथमधे निक भेटल्यानंतर हळूहळू होत जाणारा बदल पहाण्याजोगा आहे. बेथच्या चुकांमधून पावलापावलावर घडत जाणारे विनोद बघताना कंटाळा येत नाही.

When in Rome, do as the Romans do (जसा देश, तसा वेष) ह्या उक्तीनुसार रोमॅंटीक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरातच प्रेमाचा शोध घेण्यासाठी कुणी गेलं, तर प्रेमात पडल्यावाचून राहील का? खऱ्या प्रेमाची आस बाळगून रोममधे गेलेल्या बेथला निक आवडतो पण निकला बेथ खरोखरंच आवडते का, बेथने चोरलेल्या कॉईन्समुळे तिला कोणत्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पहा – व्हेन इन रोम.

Comments