गे-पर्र-ई (१९६२) - स्वप्न आणि सत्य यातील तफावत
चित्रपट पाहून आपणही नटी बनू शकतो, असा समज बाळगून दररोज कित्येक तरूणी आपलं छोटंमोठं गाव, नातेवाईक यांना सोडून मायानगरीत दाखल होतात. त्यातील कित्येकजणींना आपलं स्वप्न पहिल्याच प्रयत्नात विसरून वास्तवाचे चटके सहन करत आयुष्य कंठावं लागतं. स्वत:च्या हट्टापायी घरी सोडलेलं म्हणून आईवडीलांना तोंड दाखवायची हिम्मत नाही आणि जे हवं ते करायचं सोडून, पोट भरण्यासाठी तिसरंच काहीतरी करावं लागतंय अशी दुरावस्था असलेल्या मुली शहरात कमी नाहीत. त्यातून एखादी मुलगी स्वाभिमानाने आपल्या अटींवरच या मायानगरीत तग धरून रहायचं म्हणत असेल, तर तिला काय सहन करावं लागेल, याची कल्पनाच न केलेली बरी. अशाच परिस्थितीशी साम्य असलेला प्राण्यांचा अॅनिमेशनपट म्हणजे गे पर्र-ई.
म्युझेट नावाची फ्रान्समधील एका छोट्या गावात रहाणारी एक मांजरी. दिसायला खूप आकर्षक आणि चंचल पण तितकीच भोळी. जॉन टॉम नावाच्या बोक्याचं तिच्यावर मनापासून प्रेम आहे. तो तिच्यासाठी गाणी गातो पण आपलं प्रेम त्याने कधी तिच्यासमोर मोकळेपणी व्यक्त केलेलं नाही. जॉन टॉमचा मित्र रॉबस्पिअरला जॉनचं म्युझेटच्या मागे मागे फिरणं अजिबात आवडत नाही पण केवळ मित्रप्रेमाखातर तो त्याला मदत करत करतो.
एके दिवशी म्युझेट आपल्या मालकिणीकडे आलेल्या पाहुणीचं बोलणं ऐकते. ही पाहुणी आलेली असते पॅरीसहून. पाहुणी पॅरीस शहराचं जे रंगीबेरंगी वर्णन करते, त्याने म्युझेट अगदी भारावून जाते. आपल्यासारख्या सौंदर्यवतीसाठी पॅरीस हेच योग्य शहर आहे असं तिला वाटतं. जॉन टॉमच्या प्रेमाला धुडकावून म्युझेट पॅरीस शहरी जाते. त्यानंतर जे घडतं ते आपण थोड्याफार फरकाने काही हिंदी चित्रपटांतून पाहिलं आहे.
गे पर्र-ई या चित्रपटाच्या नावामधे चित्रपटाची कथा आहे. गे म्हणजे आनंद तर फ्रान्समधे पॅरीसचा उच्चा ’पारी’ असा केला जातो. म्हणून मांजर ज्या प्रकारे गुरगुरते तो 'पर्रर्र' असा आवाज आणि 'पारी' हे पॅरीस नावाचं उच्चारण यांचा मेळ घालून पर्र-ई हा शब्द तयार केला गेला आहे.
अॅनिमेशनपटातील व्यक्तीरेखांना चित्रपट कलाकारांचा आवाज वापरण्याची परंपरा जुनीच आहे. सुप्रसिध्द सिनेतारका व गायिका ज्युडी गारलॅन्ड हिने म्युझेटचा आवाज दिला आहे. तर रॉबर्ट गॉउलेट या अभिनेता व गायकाने जॉन टॉमला आवाज दिला आहे. चित्रपट आहे १९६२ सालचा, मात्र कथा ज्याप्रकारे कथेचं सादरीकरण केलं आहे, त्यामुळे अॅनिमेशनमधील त्रुटी आपोआपच दुर्लक्षिल्या जातात.
Comments
Post a Comment