सॉल्ट (२०१०) - अळणी गुप्तहेरकथा
स्त्री गुप्तहेरांचा छळ होणं किंवा दुस-या देशासाठी काम करत असल्याचा (डबल एजंट) आरोप त्यांच्यावर येणं या गोष्टी आता ऐकायला काही नवीन वाटत नाहीत. काही तर सत्यकथा आहेत. मात्र त्या प्रत्येक कथेत त्या स्त्री गुप्तहेराचा एक सामान्य स्त्री ते कसलेली गुप्तहेर असा जो प्रवास आहे तो आपल्याला प्रभावित करतो. माताहारी हे त्याचं उत्तम उदाहरण.
एव्हलीन सॉल्ट नावाची सी.आय.ए. एजंट आपलं काम चोखपणे बजावत असते. एका शास्त्रज्ञासोबत लग्न करून ती आनंदी आयुष्य जगत असतानाच तिच्यावर ती रशियन गुप्तहेर असल्याचा आळ येतो. रशियाच्या अध्यक्षांना मारण्याची कामगिरी सॉल्टवर सोपवलेली आहे, असं सी.आय.ए. ला कळतं. सॉल्ट तो आरोप नाकारून पळ काढते व आपल्या पतीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करते. मात्र सॉल्टच्या प्रत्येक कृतीने तिच्यावरील संशय वाढतच जातो. एका क्षणी सी.आय.ए. तिच्याजवळ पोहोचतेही मात्र त्याआधीच सॉल्टने आपलं काम चोख बजावलेलं असतं. पुढे सॉल्टच्या पतीची तिच्या डोळ्यांदेखत हत्या करण्यात येते पण त्यानंतरही सॉल्ट आपलं उद्दिष्ट लक्षात ठेवून पुढची कामगिरी पार पाडते.
अॅंजेलिना जोली या चित्रपटात मेक अपमुळे थोडी वेगळी दिसत असली तरी तिची भूमिका मात्र निराळी वाटत नाही. टोम्ब रेडर सारख्या भूमिका तिला शोभून दिसतात मात्र तीच मारधाड इथे करताना अॅंजेलिना सी.आय.ए. एजंट व एका शास्त्रज्ञाची पत्नी म्हणून प्रचंड थोराड दिसते. ही तिच्या स्टाईलची मारामारी नाही. हा तिचा चित्रपट नाही असं वारंवार वाटत रहातं.
दिग्दर्शक फिलीप नॉएसने त्याच्या नेहमीच्या स्टाईने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. मात्र चित्रपटाच्या पहिल्या अर्ध्या भागातच सॉल्ट काय करणार याचा अंदाज येतो आणि पुढच्या चित्रपटाबद्दल कल्पना येते. मारधाडीचे प्रसंगही उत्तम आहेत. पण अॅंजेलिना जोलीसारख्या अभिनेत्रीला जसे मारधाडीचे प्रसंग मिळायला हवे होते, तसे ते वाटत नाही. चित्रपटाचा शेवटही नेहमीच्या पठडीतला आहे. नायिका स्पाय आहे म्हणजे ती काहीही करू शकते असा समज करून देऊन दृश्य चित्रीत केली आहेत. पण गैरसमज करून देणे म्हणजे सिनेमॅटीक लिबर्टी नव्हे. स्पाय नायिका काहीही करू शकेल असा समज करून द्यायचा होता, तर त्यासाठी चित्रपटात अगदी सुरूवातीला नायिकेची पार्श्वभूमी म्हणून जी दृश्य आलेली आहेत ती पुरेशी वाटत नाहीत.
गुप्तहेर म्हटला म्हणजे तो निरनिराळ्या करामती करून दाखवत स्वत:ची सुटका करून घेतोच, ही प्रत्येक गुप्तहेर असलेल्या चित्रपटातील सामान्य गोष्ट झाली आहे. याव्यतिरिक्त गुप्तहेरांना पकडल्यावर त्यांना कोणत्या प्रकारच्या प्रलोभनांना व दबावाला बळी पाडण्याचा प्रयत्न होतो, याचं जुजबी चित्रणही दाखवायला हवं. अपेक्षित प्रसंगाने शेवट होणा-या सॉल्टमधे चित्रपटाच्या रेसिपीसाठी आवश्यक असलेलं मीठच नाही त्यामुळे तो एक अळणी गुप्तहेरपट वाटतो.
Comments
Post a Comment