ट्वेन्टी वन (२००८) - मोजूनमापून जुगार

बेन कॅम्पबेल हा अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता असलेला विद्यार्थी आहे. बोस्टनला रहाणा-या या विद्यार्थ्याचं स्वप्न आहे की स्वत:च्या बळावर हार्वर्ड स्कूल ऑफ मेडिकल सायन्सची शिष्यवृत्ती मिळवून डॉक्टर व्हायचं. ३ मिलियन डॉलर्सची आवश्यकता असते. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या बेनला साहजिकच हे शक्य नसतं. इतके पैसे गोळा करता करता आपल्याला चार-पाच वर्षं तरी सहज लागतीलच ही चिंता सतत त्याचं मन खात असते.

बेन त्याच्या इतर दोन मित्रांसमवेत एक छोटं स्वयंचलीत चाक तयार करण्याच्या प्रोजेक्टवरही काम करत असतो पण या गोष्टीचाही उपयोग त्याला शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी होत नाही. पैसे कसे मिळवावेत याचा विचार करतच बेन गणिताच्या वर्गात बसलेला असतो. आपल्या कुशाग्र बुद्धीच्या जोरावर दिलेल्या व्यावहारीक उत्तराने तो प्राचार्य मिकी रोसा यांचं मन जिंकतो. पण प्राचार्य मिकी यांना बेनच्या बुद्धीमत्तेचा वापर वेगळ्याच कारणासाठी करायचा असतो.

एके दिवशी बेन लायब्ररीमधे आपला अभ्यास करत असताना, त्याला एक मुलगा आपल्या मागोमाग यायला सांगतो. बेन त्याच्या मागोमाग जिथे पोहोचतो तिथे प्राचार्य मिकी रोसा हे काही खास व्यक्तींबरोबर उपस्थित असतात. प्राचार्यांकडून बेनला कळतं की जर व्यवस्थित डोकं वापरलं तर जुगार खेळताना नेमकं कोणत्या पानावर पैसे लावून जिंकावं, हे आपण स्वत:च ठरवू शकतो. एकदा का पत्ते ओळखण्याचं कौशल्य आत्मसात केलं की दर आठवड्याच्या सुटीला लास वेगासला जायचं आणि मोठी बाजी मारून पैसे मिळवायचे असा मिकिचा बेत असतो. या कामी प्राचार्य मिकी त्याला आपल्या टीममधे सामील करून घेण्यास उत्सुक असतात. मिकीचं हे खरं रूप पाहून बेन हडबडतो. मिकीची ऑफर धुडकावून लावतो. पण जर डॉक्टर व्हायचं असेल, तर आपल्याला याच मार्गाने झटपट पैसे मिळू शकतात, हे त्याला लक्षात आल्यावर तो होकार देतो. मिकी त्याला पत्ते कसे ओळखायचे हे शिकवतो. लवकरच बेन या कौशल्यात पारंगत होतो. मिकीच्या टीममधील इतर मुलं-मुली त्याचे चांगले मित्र होतात. जिलशी तर त्याचे विशेष संबंध जुळतात.

दर आठवड्याच्या सुटीला लास वेगासला जाऊन पैसे मिळवणं हा तर बेनचा छंदच बनतो. त्याच्या अपेक्षेपेक्षाही जास्त पैसे त्याने मिळवलेले असतात पण त्याला अशा प्रकारे जुगार जिंकण्याची चटक लागते. जिलसोबत मस्त आयुष्य जगताना तो आपल्याला काय करायचं होतं हेही विसरून जातो. एक दिवस असा उगवतो जेव्हा बेन जुगार खेळताना प्रा. मिकीने दिलेला सल्ला विसरतो. ’जुगार हा भावनेने नाही डोक्याने खेळायचा असतो’. बेन हा सल्ला विसरतो. मिकी आणि बेनमधे वाद होतात. परिणामी मिकी त्याला आपल्या टीममधून बाहेर काढतो आणि त्यानंतर बेनला आपला आयुष्यातील सर्वात मोठा जुगार खेळावा लागतो.

मदिरा, मदनिका आणि माया यांच्या मोहजालातून बाहेर पडणं तसं कठीणच. जितकं जवळून यांना पहावं तितका मोहाचा पाश घट्टच आवळला जातो. यातून जो बाहेर पडला तो निभावला नाहीतर अंताच्या दिशेने त्याची वाटचाल केव्हा सुरू होते, हे त्याला कळतंही नाही. पण बाहेर पडणंही वाटतं तितकं सोपं नसतं. भावनाहीन होऊन जो यात स्वत:ला गुरफटून घेऊ शकतो, त्यालाच मोहाचे हे पाश तोडून मोकळा श्वास घेणं शक्य असतं. कुठे थांबायचं हे ज्याला माहित असेल, त्याला असा मोजून मापून जुगार खेळणं अशक्य नाही पण त्याचवेळी आपल्या अशा खेळाकडे कुणाचं लक्ष तर नाही ना, हेही पहाणं तितकंच महत्त्वाचं असतं.

Comments