विंटर्स बोन (२०१०) - त्यांच्या साम्राज्यात ती...

परिस्थितीची अगतिकता एखाद्या स्त्रीला कुठल्या सीमेवर नेऊन पोहोचवेल हे काही सांगता येत नाही. आपल्याला झेपणार नाही असा धोका स्वत:हून पत्करणं हे ज्या व्यक्तीच्या नशीबी येतं त्या स्त्रीलाच त्या परिस्थितीची अगतिकता माहित असते. आणि जर अशा अगतिक अवस्थेमधील असलेली स्त्री ही अल्पवयीन असेल तर...?

२०१० साली दोन चित्रपट प्रदर्शित झाले - ट्रू ग्रट आणि विंटर्स बोन. या दोन्ही चित्रपटांमधील एकमेव समांतर धागा म्हणजे अल्पवयीन मुलगी आणि तिचा पिता यांच्याशी संबंधित कथानक. ट्रू ग्रट मधील मॅटीला आपल्या पित्याच्या खुनाचा बदला घ्यायचा आहे. आपल्या वयाला न शोभतील असे युक्तीवाद करून, ती चुणचुणीत मुलगी पित्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी एका भाडोत्री मारेकर्‍याची मदत घेते. त्याच्या सोबतच्या प्रवासात तिला अनेक अडचणींचा व संकटांचा सामना करावा लागतो.

"विंटर्स बोन" मधील री ला मात्र आपले वडील जिवंत आहेत की मेले आहेत हे सुद्धा माहित नाही. पण आपलं घर- डोक्यावरचं छप्पर वाचवण्यासाठी तिला काहीही करून त्यांना शोधावं लागणार आहे. त्यासाठी ती आपली मैत्रीण, नातेवाईक, वडीलांचे मित्र, शत्रू या सर्वांची मदत मागते पण तिच्या पदरात येते ती मारहाण आणि अपमान.

ऑस्कर चित्रपट महोत्सवात विंटर्स बोन पेक्षाही ट्रू ग्रटची चर्चा अधिक झाली. मात्र या दोन्ही चित्रपटांमधे ट्रू ग्रट पेक्षाही विंटर्स बोन मला जास्त भावला. कुठल्याही प्रकारचा फिल्मी बाज न आणता सरळ साध्या पद्धतीने सांगितलेली री ची कहाणी मनाला स्पर्शून जाते. चित्रपटातल्या हिंसक व थरारक प्रसंगातही पार्श्वसंगीत किंवा संवादांचा अनाठायी वापर टाळला गेला आहे. या गोष्टींमुळे विंटर्स बोन वास्तवाच्या अधिक जवळ जातो. कथानकातील जमेची बाजू म्हणजे चित्रपटाची नायिका सतरा वर्षांची आहे व अठरा विश्वे दारिद्र्य वावरत असलेल्या घरातील कर्ती स्त्री दाखवली आहे. वडीलांना शोधून काढण्यामागची तिची अगतिकता दाखवताना कुठेही तिला बिचारी दाखवण्याचा प्रयत्न झालेला नाही. आपल्या कुटुंबाचा सांभाळ करता यावा म्हणून जास्त पैसे मिळतील या आशेने री सैन्यात दाखल होण्याचा विचार करते, तो प्रसंग री वर गुदरत असलेल्या परिस्थितीचं यथायोग्य वर्णन करतो.

ट्रू ग्रट मधे असलेल्या केवळ चटपटीत संवादाचाच अभाव विंटर्स बोन मधे जाणवतो असं नाही पण मोठमोठी लोकेशन्स, नाट्यमय प्रसंग यांचाही अभाव विंटस बोन मधे आहे. पण तरिदेखील वास्तवाचं विदारक वर्णन करणारा चित्रपट म्हणून विंटर्स बोन जास्त प्रभावी वाटतो.

Comments