द टाईम ट्रॅव्हलर्स वाईफ (२००९) - इथे काळाची मर्यादा नाही
तुम्ही तारूण्याच्या उंबरठ्यावर आहात आणि अचानक एक गोड लहान मुलगा तुम्हाला येऊन सांगू लागला की भविष्यात मीच तुझा नवरा होणार आहे, तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही कॉलेजच्या मित्रमैत्रीणींबरोबर हुल्लड करताहात आणि एक लहानशी मुलगी येऊन तुम्हाला ’बाबा’ अशी हाक मारेल, तर कशी अवस्था होईल तुमची? तुमचा जीवनसाथी, तुम्हाला आवडो अथवा न आवडो, सतत प्रवासच करत असेल आणि सहजीवनाऐवजी तुमच्या नशीबात एकटेपणाच जास्त आला तर?
वयाच्या सहाव्या वर्षी हेन्री आपल्या आईबरोबर प्रवास करत असताना एका जबर अपघातात सापडतो. त्यातून तो वाचतो खरा पण त्याच्या नशीबी असं जगावेगळं आयुष्य जगण्याची वेळ येते. त्याच्या आयुष्यातील कुठल्याही काळात प्रवास करणं त्याला शक्य असतं. मात्र या देणगीसोबतच दोन कठीण समस्याही येतात. एक म्हणजे कुठल्या काळात प्रवास करावा, हे त्याला ठरवता येत नाही. स्वत:ला नको असतानादेखील हेन्री ला हा प्रवास करणं भाग पडतं. दुसरी कठीण समस्या म्हणजे कुठल्याही काळात प्रवास करताना हेन्री ला अंगावरच्या कपडयांनीशी प्रवास करता येत नाही. प्रत्येक वेळी प्रवास करताना तो ज्या काळातून आला आहे, त्याच काळात त्याला आपले कपडे सोडून यावे लागतात. त्यामुळे दर वेळी चोरी करून, हिसकावून त्याला कपडे मिळवावे लागतात.
अशा विलक्षण माणसाची पत्नी होण्याचं भाग्य की दुर्भाग्य क्लेअरच्या भाळी लिहून ठेवलेलं असतं. हेन्रीसारख्या पुरूषासोबत संसार करण्याची कल्पना तिला खूप आवडते पण लग्नानंतर अनपेक्षित क्षणी हेन्रीचं गायब होणं, तिला तीव्रतेने जाणवू लागतं. तशातच ती आई होणार असल्याचं तिला कळतं आणि तिची चिंता अधिकच वाढते. दरम्यान एका आनंदाच्या प्रसंगी हेन्री, ती आणि त्यांचं कुटुंब आपल्या डोळ्यांदेखत हेन्रीला वेदनांनी कळवळताना पहातात. हेन्री तारूण्यातच मृत्यू पावणार आहे, हे क्लेअरला कळल्यावर तर ती आणखीनच अस्वस्थ होते. काहीही झालं तरी हेन्रीच्या मुलाला मी जन्म देणारच या जिद्दीला ती पेटते. कदाचित होणा-या मुलालाही आपल्यासारखाच विकार असला, तर या भितीने हेन्री तिला मूल दत्तक घेण्याविषयी सुचवतो पण क्लेअर ऐकत नाही. शेवटी जे नियतीच्या मनात असतं, तेच होणार हे हेन्रीला कळून चुकतं.
चित्रपटाचं नाव ’द टाईम ट्रॅव्हलर्स वाईफ’ असं असलं तरी हेन्रीचं निरनिराळ्या काळात प्रवास करणं आणि भविष्यातील व भूतकाळातील घटनांची माहिती मिळवणं, ते करताना त्याला आलेल्या समस्या यांवरच चित्रपटात जास्त लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. क्लेअरशी लग्न झाल्यानंतर तिच्या दृष्टीने समस्या असलेल्या गोष्टी फार उशिराने चित्रपटात येतात. मात्र क्लेअर आणि हेन्रीचे संबंध या चित्रपटात सुरेख रंगवले आहेत. एरिक बाना या अभिनेत्याचा चेहेरा हेन्रीच्या भूमिकेसाठी अतिशय योग्य वाटतो. चित्रपट जरी काळाच्या प्रवासासंबंधी असला तरी यात स्पेशल इफेक्ट फारसे नाहीत. हेन्री गायब होतानाच्या प्रसंगात स्पेशल इफेक्टचा आवश्यक तेव्हढा वापर केलेला आहे. मात्र हेन्री एका काळातून दुस-या काळात प्रवास करताना त्याच्या वयात होणारा बदल चांगला दाखवला आहे.
ऑड्री निफेंग्गर यांच्या ’द टाईम ट्रॅव्हलर्स वाईफ’ याच नावाच्या कांदबरीवर हा चित्रपट आधारित आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन रॉबर्ट श्वेन्टक यांनी केलं आहे, तर चित्रपटाची पटकथा ब्रूस जोएल रुबीन यांनी लिहिली आहे. ज्यांनी या चित्रपटाचं संकलन केलं, त्या टॉम नोबल यांची कामगिरी जास्त महत्त्वाची होती. निरनिराळ्या काळात प्रवास करणारा हेन्री पहाताना कुठेही आपली गफलत न होता, चित्रपट व्यवस्थित समजतो. मायकल डाना यांनी दिलेलं पार्श्वसंगीत चित्रपटाला साजेसं आहे. हेन्रीच्या गायब होतानाच्या प्रसंगात दिलेलं संगीत उत्तम.
ट्रॉय, म्युनिक, लकी यू सारख्या चित्रपटांमधून काम केलेल्या एरिक बाना याने हेन्रीची भूमिका नेहमीच्याच पद्धतीने समरसून केली आहे. त्याचा चेहेरा हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. तर हल्लीच्याच ’शरलॉक होम्स’ या रॉबर्ट डाऊनिंग (ज्यू) व ज्यूड लॉ अभिनित चित्रपटात दिसलेल्या रेचल मॅकअॅडम्स हिने हेन्रीच्या पत्नीची म्हणजे क्लेअरची भूमिका साकारली आहे. इतर सहकलाकारांची कामेही ठीक आहेत.
टाईम ट्रॅव्हलर म्हणजे एका काळातून दुस-या काळात प्रवास करणारा. हा प्रवास जसा भविष्यकाळात असू शकतो, तसाच तो भूतकाळातदेखील होऊ शकतो. मात्र भविष्य किंवा भूतकाळ बदलण्याची शक्ति यामुळे मिळत नाही. आपल्या जीवनात घडलेल्या आणि घडणा-या घटनांचे आपण साक्षिदार असावं इतकीच नियतीची इच्छा असते. अगदी आपलं मरणही आपल्या डोळ्यांसमोर दिसतं पण आपण काहीच करू न शकत नाही. हे सर्व स्वत:पुरतं असेल तर ठीक असतं पण आपल्या जीवलगांचीसुद्धा यात ससेहोलपट होते, तेव्हा हे सर्व आपल्याच बाबतीत का घडलं, असा प्रश्न मनात आल्यावाचून रहात नाही.
टाईम ट्रॅव्हलर्स वाईफ ह्या कादंबरीसोबतच आता ह्या कथेचं ऑडिओबुक देखील उपलब्ध आहे
Comments
Post a Comment