द नंबर ट्वेन्टी थ्री (२००७) - कल्पनेपलिकडचं भीषण सत्य

सत्य समजून घेतल्यानंतरची घालमेल आणि अज्ञानातील सुख याची तुलना केली तर अज्ञानातील सुखाचीच अपेक्षा प्रत्येकजण करेल. पण जे माहित नाही, ते माहित करून घेणं हा मानवी स्वभाव आहे. त्या स्वभावधर्मानुसार वागल्यानंतर जे काही आपल्यासमोर येतं, त्याची तुलना केवळ वास्तव व अनभिज्ञता या दोन पारड्यांमधे करता येत नाही. घडून गेलेले वास्तव हे सत्य होतं व आपण त्यापासून अनभिज्ञ होतो ही वस्तूस्थिती स्विकारून समोर आलेली परिस्थिती नैतिक व अनैतिकतेच्या कसावर पारखून पहावी लागते. ही एक मोठी कसोटी आहे. या कसोटीवर पूर्ण उतरण्यासाठी आवश्यक असलेलं मनोबळ ज्याच्याकडे असतं, केवळ तोच सत्य जाणून घेण्यामागची उत्सुकता व अज्ञानातील सुख याची तुलना केल्यानंतर त्यातून सत्य स्विकारू शकतो.

वॉल्टर स्पॅरो हा भटक्या कुत्र्यांना पकडणारा एक अधिकारी आहे. एके दिवशी एका कुत्र्याला पकडण्याच्या नादात, तो कुत्रा वॉल्टरच्या हाताला चावतो आणि पळून जातो. त्याच दिवशी वॉल्टरचा वाढदिवसही असतो. वाढदिवसाची भेट म्हणून वॉल्टरची पत्नी अगाथा, त्याला एक पुस्तक भेट देते. या पुस्तकाचं नाव आहे ’द नंबर ट्वेन्टी थ्री’.

या पुस्तकाच्या लेखकाने तेवीस क्रमांक व त्याच्याशी निगडीत असलेल्या कथानायकाच्या आयुष्यातील घटनांच्या योगायोगांविषयी लिहिलं आहे. कथानायकाचं अवघं जीवन ’तेवीस’ या क्रमांकाने व्यापलेलं आहे. वॉल्टरला सुरूवातीच्या काही पानांतच ही कथा खूप आवडायला लागते. पुस्तकातील कथा वाचता वाचता वॉल्टर त्यात इतका गुंग होऊन जातो की तेवीस क्रमांकांचं आपल्या आयुष्यात घडणा-या घटनांशीही काहीतरी नातं आहे, असं त्याला वाटू लागतं. एका विशिष्ट प्रकरणापाशी येऊन ही कहाणी अर्धवटच संपते. वॉल्टरला कहाणीचा शेवट जाणून घेण्याची खूप उस्तुकता लागून रहाते. त्या हव्यासापायी तो आपल्या पत्नी आणि मुलाला विश्वासात घेऊन कथालेखकाचा शोध घेण्यासाठी निघतो. वॉल्टर चावून पळालेला तो कुत्रा वॉल्टरला ब-याच ठिकाणी दिसत रहातो. शोधाच्या सुरूवातीच्या काळातच त्यला हे समजतं की ह्या पुस्तकाच्या लेखकाचं हे पहिलं आणि शेवटचं पुस्तक आहे.

जिम कॅरी हा लवचिक चेहे-याचा अभिनेता आहे. त्याच्या भूमिकांना विनोदी बाज असला तरी त्याची प्रत्येक भूमिका निराळी होती. आवाजाइतक्याच प्रभावीपणे चेहे-याचा लवचिकपणाचाही वापर करणा-या अभिनेत्यांमधे जिम कॅरीची गणना होईल. ’द नंबर ट्वेन्टी थ्री’ या चित्रपटात जिम कॅरीने गंभीर व निराळ्या पठडीची भूमिका रंगवली आहे. चित्रपटाच्या सुरूवातीला एक-दोन विनोद आहेत पण ते जिम कॅरी चित्रपटात आहे म्हणून येत नाहीत, तर कथानकाची गरज म्हणून येतात.

संपूर्ण चित्रपटभर हिरवट काळसर फ्रेम वापरली आहे, जिच्यामुळे गूढ वातावरणाचा भास होत रहातो. चित्रपटाच्या पार्श्वसंगीतापेक्षाही प्रभावीपणे चित्रीत केलेले प्रसंग कथानकात गुंतवून ठेवतात. सत्य हे आपल्या कल्पनेपेक्षा निराळं व भीषण असू शकतं ह्याचा प्रत्यय देणारा ’द नंबर ट्वेन्टी थ्री’ आपल्याला वास्तवाचा स्वीकार करायला भाग पाडतो.

Comments