माय बिग फॅट ग्रीक वेडींग (२००२) - ज्याचा शेवट गोड

म्हटलं तर काहीच नाही, म्हटलं तर बरंच काही असलेला हा चित्रपट एकत्र कुटुंबपद्धतीमधे असणारे रूसवे फुगवे पण तरीही एकमेकांशी असणारी बांधिलकी यांचं सुरेख चित्र दाखवतो. एका ठिकाणी कुटुंबाचा रूढीवादीपणा आपल्याला हैराण करतो तर जेव्हा त्याच्यामागे आपल्याच जीवलगाचं भलं चिंतीलेलं दिसतं तेव्हा तो रूढीवादीपणा आवडून जातो.

ग्रीक कुटुंबातील टॉला आता ३० वर्षांची झालीये पण तिच्या स्थूल बांध्यामुळे तिचं लग्न जमत नाही. पण आपलं लग्न न जमणं ही एकच समस्या टॉलाकडे नाहीये. टॉलाची मुख्य समस्या आहे ती आपल्या वडीलांचं ग्रीक संस्कृतीच्या प्रभावाखालचं अतिरेकी वागणं. अमेरिकेत राहूनही आपल्या मुलांची ग्रीक संस्कृतीची बांधिलकी रहावी म्हणून त्यांनी टॉलाला ग्रीक शिकायला पाठवलं. ग्रीक स्त्री म्हणजे कितीही शिकली तरी दोन-तीन मुलांना जन्म देऊन नव-याचं घर सांभाळणारी, थोडक्यात चूल आणि मूल परंपरेमधली स्त्री असा ते आजही विचार करतात. ग्रीक रीतीरिवाज, परंपरा ते सहजासहजी सोडायला तयार नाहीत. टॉलाला ते वारंवार या गोष्टीची जाणीव करून देत रहातात. तिला तिच्या मनाप्रमाणे आजपर्यंत काहीही करता आलेलं नाही. लग्न करून असंच वागायलादेखील टॉलाची हरकत नाही पण तिचं लग्नच जमत नाहीये आणि तिच्या आयुष्याचा एक एक दिवस कुटुंबाच्या रेस्तरॉंमधे काम करण्यात निघून जातोय. आपलं आयुष्य आता असंच निरस, संथपणे निघून जाणार असं टॉलाला वाटत असतानाच टॉलाला तिच्या स्वप्नीचा राजकुमार भेटतो.

वस्तूस्थितीची जाणीव असलेली टॉला आपला राजकुमार समोर असूनही त्याला टाळू पहाते पण शेवटी तोही तिच्या प्रेमात पडतो आणि दोघे लग्न करायचा निर्णय घेतात. आपल्या वडीलांच्या वागण्याला टॉला कंटाळली तर आहे पण आपलं कुटुंब सोडून देण्याची कल्पनाही तिला सहन होत नाही. तिथेच कुटुंबाची मर्जी संपादन करूनच टॉलाशी लग्न करायचं, हे जेव्हा टॉलाचा प्रियकर तिला सांगतो, तेव्हा आजच्या काळात हरवलेली नाती गोती यांची आठवण होऊ लागते. इथपर्यंत सगळं ठिक ठिक आहे. पण हे तसंच ठिक रहात नाही. कारण टॉलाचे वडील टॉलाच्या प्रियकराला नापसंत करतात आणि तिथून पुढे टॉलाचं कुटुंब टॉलाच्या निर्णयावर काय प्रतिक्रिया देतं, टॉलाचा प्रियकर काय करतो यावर हा चित्रपट आहे.

टॉलाच्या वडीलांच्या अतिरेकी वागण्यामुळे होणारे विनोद आणि टॉलाची आई व काकू आपलं म्हणणं टॉलाच्या वडीलांच्या कसं गळी उतरवतात ते प्रसंग पहाण्यासारखे आहेत. ज्यांना लाईट कॉमेडी आणि फारशी गुंतागुंत नसलेले चित्रपट आवडतात त्यांना हा चित्रपट नक्की आवडेल.

Comments