4DX - बोगस थरार

सिनेमातील वातावरणाची प्रसंगानुरूप अनुभूति प्रेक्षकाला देणे म्हणजे 4DX. ही अनुभूति अर्थातच शंभर टक्के नसते. नाहीतर सिनेमात गोळ्या झाडल्या गेल्या की आपल्याही आजूबाजूने गोळ्या सुटताना दिसतील. तर तेवढ्या गंभीर पातळीवर अद्याप तरी अनुभव दिला जात नाही पण एका सुरक्षित पातळीपर्यंत प्रेक्षकाला सिनेमातील प्रसंगाच्या वातावरणाशी एकरूप करण्यासाठी जे तंत्रज्ञान वापरलं जातं (त्यात फ्लॅश लाईट्स, धूर, वास, वारा, पाण्याचे शिंतोडे, साखळ्या आपटल्याचे आवाज आणि हो... त्या हलत्या-डुलत्या आणि थरथरत्या खुर्च्याही आल्या) त्याला 4DX म्हणतात.

पण हा अनुभव प्रत्येक थिएटरमध्ये निराळा असावा. कारण गुगलवर 4DX ची थोडीफार माहिती काढून गेल्यावर सिनेपॉलिसमध्ये मिशन इम्पॉसिबल बघताना जाणवलं की काहीतरी कमी आहे. आजूबाजूचे प्रेक्षक, पडद्याजवळच्या दरवाजावरचा EXIT चा बोर्ड हे सगळं उजेडात व्यवस्थित दिसत असताना 4DX नावाखाली जे काही सादर केलं गेलं ते तब्बल पावणेतीन तास सहन करणं हेच एक मिशन इम्पॉसिबल झालं आणि पडद्यावरचा मिशन इम्पॉसिबल साहसपट न होता, विनोदीपट होऊन गेला.

हलणाऱ्या खुर्च्या असतात हे ठिक आहे पण प्रेक्षकाच्या शरीराला हबके कोणत्या प्रसंगी बसले पाहिजेत ह्याचं काही तारतम्य हवं. कुलूप लावणं, दार बंद करणं असल्या फुटकळ गोष्टींमध्ये प्रेक्षकाला हबक्यांमधून कसला रोमांच मिळणार? रोज बस-ट्रेनचे धक्के पचवत प्रवास करणाऱ्या मध्यमवर्गीयाला गाडीच्या पाठलागाचाा रोमांचित अनुभव देण्याच्या नावाखाली तुम्ही बस-लोकलचे धक्केच देणार असाल तर तो मध्यमवर्गीय तोच सिनेमा आणखी सहा-सात महिन्यांनी बस-लोकलमधून प्रवास करताना OTT वर देखील पाहू शकतो.

साहसदृश्यांमध्ये खुर्च्यांचा महत्त्वाचा भाग असायला हवा खरं तर पण इथेच नेमकं 4DX गंडतं. MI मध्ये आक्षेपार्ह दृश्य नसल्यामुळे सहकुटुंब बघण्यालायक सिनेमा असला तरी सहकुटुंब हसतखेळत आनंद घ्यावा असा तो ‘हम आपके है कौन’ पठडीतला सिनेमा नाही. साहसदृश्यांमध्ये प्रेक्षकाला पडद्यावर काय स्टंट दाखवला जाणार आहे ह्याची उत्सुकता जास्त असते. तो बहूचर्चित स्टंट त्याला श्वास रोखून बघायचा असतो. अश्या वेळेस घरात चित्रपट पहात असताना कोणीतरी चेष्टा म्हणून आपली खुर्ची गदागदा हलवावी तशी ती थिएटरमधली 4DX खुर्ची हलू लागते आणि पडद्यावर लक्ष केंद्रित होईपर्यंत तो स्टंट संपूनही गेलेला असतो.

जर आपल्याकडे सर्वत्र 4DX ची सिस्टीम अश्याच प्रकारची असेल तर प्रचंड सुधारणेची गरज आहे. बॉम्बस्फोटानंतरच्या धुरळ्यासाठी धूर सोडणे, कार्सच्या टकरांमध्ये पायाजवळ उंदराची शेपटी वळवळावी तशी रबरी नळी वळवळवणे, गोळ्यांच्या फायरींगसाठी हॅलोजन लाईट्सचे फ्लॅश मारून डोळे दिपवणे आणि खुर्च्यांच्या मागे लावलेल्या साखळ्या ज्या खुर्च्या हलू-डोलू लागल्या की आपलं खुर्चीच्या पाठीवर आपटण्याचं इमाने इतबारे बजावतात हे सगळे प्रकार DIY 4DX म्हणून खपतील पण प्रेक्षकाला पैसा वसूल अनुभव द्यायच्या असेल तर भरपूर बदल आणि त्यासोबत फक्त स्क्रिनवरच आपलं लक्ष केंद्रित करू शकेल असा काळा गॉगल प्रेक्षकाला देणं मस्ट आहे.

असा गंडलेल्या 4DX चा अनुभव घेताना Golden Eye ह्या बॉन्डपटामधील स्टंटची आठवण झाली. तो स्टंट नक्कीच पियर्स ब्रॉस्ननने केलेला नसावा, त्यात बरेच कट्सदेखील आहेत पण तरीही 4DX शिवाय तो श्वास रोखून धरायला लावण्याइतका सक्षम होता. Game of Thrones मध्ये भरपूर VFX चा वापर असूनदेखील सहाव्या सिझनच्या शेवटी ड्रॅगन्स उडत असताना आपणसुद्धा त्या ड्रॅगन्ससोबत समुद्राच्या लाटांवरून उडत आहोत असा भास आपण घरात ती मालिका पहात असतानाही होतो. त्यामुळेच टॉम क्रूजने वयाच्या ६०व्या वर्षी स्वत: केलेला स्टंट, त्याचा वेडेपणा मोठ्या पडद्यावर पहाण्याची खूप उत्सुकता होती पण 4DX ने त्या उत्सुकतेवर बोळा फिरवला.

Comments