द ग्रीन माईल (१९९९) – अनंताचा प्रवास आणि अश्वत्थाम्याचं जगणं
मृत्यूची शिक्षा ठोठावलेले कैदी ज्या तुरूंगात ठेवले जातात, त्या तुरूंगातील एका रांगेचा पॉल एजकोम्ब हा अधिकारी आहे. हा काळ आहे १९३० सालचा, जेव्हा कैद्यांना मृत्यूदंड देण्यासाठी इलेक्ट्रीक खुर्चीचा वापर केला जात असे. तुरूंगातील जमिनीवर बसवलेल्या फरशांच्या हिरव्या रंगावरून ह्या तुरूंगाला ग्रीन माईल असं म्हटलं जात असे.
मृत्यूदंडासाठी आलेले कैदी काही दिवस त्या तुरूंगात राहत आणि त्यांच्या शिक्षेचा दिवस उगवला की ग्रीन माईलवरून चालत चालत आपल्या अनंताच्या प्रवासाला इलेक्ट्रीक खुर्चीच्या दिशेने निघून जात. या कैद्यांना पाहून पाहून पॉलची नजर इतकी निगरगट्ट झालीय की त्याचा दैव, नशीब या गोष्टींवर विश्वासच राहिलेला नाही. कैद्याच्या मृत्यूदंडाच्या एक दिवस अगोदर मृत्यूच्या शिक्षेची तालीम करणंही आता त्याच्या अंगवळणी पडलं आहे. पण एक दिवस एक कैदी त्याच्या तुरूंगात येतो आणि पॉलचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन साफ बदलून जातो.
जॉन कॉफी हा अवाढव्य शरीर असलेला एक काळा कैदी पॉलच्या तुरूंगात दाखल होतो. त्याला दोन लहान मुलींच्या बलात्कार व खून प्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा झालेली असते. खरं तर जॉनला पाहूनच तुरूंगातील सर्व अधिका-यांची छाती दडपलेली असते. त्याचं डोळ्यांच्या कक्षेत न मावणारं शरीर आणि त्याला झोपताना वाटणारी अंधाराची भिती याबद्दल तुरूंगातील अधिकारी आणि कैदी या सर्वांनाच कुतुहल असतं.
जॉनला दैवी शक्तीची देणगी लाभली आहे, याचा पॉलला शोध लागतो. त्याच्यासोबत बोलताना जॉन खूप हळव्या मनाचा आहे, हे त्याला उमगतं. ’जॉन खरंच अपराधी आहे का’, याबद्दल त्याच्या मनात शंका उत्पन्न होते. तो जॉनच्या वकिलाला भेटतो पण जॉन अपराधी आहे असंच वकिल सांगतो आणि त्या भेटीतून काहीच निष्पन्न होत नाही.
त्याच सुमारास पॉलच्या तुरूंगात एक उंदीर आपली हजेरी लावू लागतो. हा उंदीर इतर उंदीरांपेक्षा निराळाच असतो. तो चटकन माणसाळतो. तुरूंगातील डेल नावाचा एक कैदी या उंदराला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळू लागतो आणि त्या उंदाराला नाव देतो, मिस्टर जिंगल्स. जॉनप्रमाणेच पॉलला या मि. जिंगल्सचंही कौतुक वाटतं पण तसं तो दाखवत नाही.
एकीकडे तुरूंग अधिका-याचा कर्तव्यकठोरपणा तर एकीकडे जॉनमुळे आलेला दैवी शक्तीचा अनुभव या दोन्ही मधून पॉल कर्तव्य कठोरपणाची निवड करतो. आपल्या वरिष्ठ अधिका-याच्या पत्नीचा कॅन्सर बरा करण्यासाठी पॉल जॉनचा उपयोग करून घेतो. या घटनेनंतर घडणा-या प्रसंगांतून जॉन संपूर्णपणे निर्दोष आहे, हे पॉलला कळूनही तो जॉनच्या सुटकेसाठी कोणतेच प्रयत्न करत नाही. अखेर जॉनला मृत्यूदंडाची शिक्षा भोगावी लागते. त्याला मरणाचं दु:ख नसतं. जगात फक्त स्वार्थी आणि मतलबी माणसं का भरलेली आहेत, हे त्याचं दु:ख असतं. पॉल जॉनच्या मृत्यूनंतर इतर कुठल्याही कैद्याच्या मृत्यूदंडाला हजर राहू शकत नाही.
मृत्यूला कवटाळण्यापूर्वी जॉन आपल्या दैवी शक्तीने पॉलला एक देणगी देतो. त्या देणगीला वरदान म्हणावं की शाप हेच पॉलला कळत नाही. जॉनच्या मृत्यूनंतर पॉलला मि. जिंगल्स सापडतो. तो त्याला आयुष्यभर आपल्या मुलाप्रमाणे सांभाळतो. पॉलला मिळालेल्या देणगीचा मि. जिंगल्स हा एकमेव साक्षिदार उरतो.
२००० सालचा गोल्डन ग्लोब अवॉर्ड विजेता मायकल क्लार्क डंकन याने या चित्रपटात जॉन कॉफीची भूमिका केली आहे. अवाढव्य शरिराचा पण मन मनाने हळवा असलेला जॉन कॉफी मायकलने तंतोतंत उभा केला आहे. पॉल एजकोम्ब या तुरूंग अधिका-याचा कर्तव्यकठोरपणा टॉम हॅन्क्सने आपल्या अभिनयातून प्रभावीपणे दाखवला आहे. पर्सी वेटमोर ह्या घमेंडी आणि उद्धट पोलिस अधिका-याच्या भूमिकेत डग हचिन्सनने प्राण ओतला आहे. तो पडद्यावर दिसला की त्याच्याबद्दल चीड निर्माण व्हावी इतका सुंदर अभिनय त्याने केला आहे. स्टिफन किंगच्या कांदंबरीवरून बनविलेल्या या चित्रपटाचा दिग्दर्शक व पटकथालेखक आहे फ्रॅन्क डॅराबॉन्ट.
चित्रपटातील हिंसक दृश्ये अंगावर काटा आणणारी आहेत. संवाद आणि आक्षेपार्ह दृश्यांचा यात भरणा असला तरी एक निराळा अनुभव म्हणून ग्रीन माइलचा शेवट मनाला स्पर्शून जातो.
Comments
Post a Comment