बॉईज डोन्ट क्राय (१९९९) - तिच्यातल्या 'त्या'ची घुसमट

स्त्रीने पुरूषाची भूमिका साकारलेले चित्रपट कमी नाहीत. शी’ज द मॅन' या चित्रपटातील अमॅन्डा बायन्सने साकारलेला सबॅस्टीअन आणि त्याच चित्रपटातील कल्पनेवर आधारीत भारतीय हिंदी चित्रपट 'दिल बोले हडीप्पा' मधील रानी मुखर्जीने साकारलेला वीर ही अगदी ताजी उदाहरणं आहेत. मात्र भारतीय चित्रपटातील स्त्री भूमिका करताना काही निवडक अपवाद वगळता पुरूष कलाकार जो बिभत्सपणा दाखवतात किंवा स्त्री कलाकार पुरूषाची भूमिका करताना जे काही केविलवाणे प्रकार करतात, त्याच्या तुलनेत हिलरी स्वॅन्क ने साकारलेला ब्रॅन्डन कितीतरी प्रभावी वाटतो. ज्यांना हिलरी स्वॅन्क माहिती नसेल त्यांना तर ब्रॅन्डन हे पात्र मुळात स्त्री आहे, हे जोपर्यंत चित्रपटात त्याचा उल्लेख होत नाही, तो पर्यंत कळणारच नाही.

जन्माने स्त्री असलेल्या परंतू मनाने पुरुष असलेल्या टीना ब्रॅन्डनची ही कथा. ब्रॅन्डन वृत्तीने पुरूष असल्याने त्याला स्त्रीयांमधे रस असतो. पण आपण स्त्रीसारखं दिसत राहिलो, तर कुठलीच स्त्री आपल्याकडे आकर्षित होणार नाही, हे ब्रॅन्डनच्या लक्षात येत म्हणून ब्रॅन्डन पुरूषासारखा रहायला लागतो. पुरूषासारखं वागणं, बोलणं, दिसणं शिवाय त्यात आणखी खरेपणा उतरावा म्हणून आपल्या मुळच्या स्त्रीगुणधर्मांनी बनलेल्या शरीरात ब्रॅन्डन काही आवश्यक ते तात्पुरते बदल करून घेतो. ब्रॅन्डन इतका देखणा रूबाबदार पुरूष असतो की तो मूळचा स्त्री आहे, हे कुणालाही सांगून न कळावं.

त्याच्या देखणेपणावर भाळून एक तरूणी त्याला वशही होते. तिला तिच्या घरी सुखरूप सोडून ब्रॅन्डन घरी येत असताना त्या तरूणीवर आसक्त असलेले दोन-तीन तरूण ब्रॅन्डनचा पाठलाग करतात. ब्रॅन्डन कसाबसा जीव वाचवून आपल्या भावाच्या, लूनीच्या ट्रेलरमधे लपतो. पण लूनीला ब्रॅन्डनचं पुरूषी बनणं आवडत नसतं. शिवाय ब्रॅन्डन कायद्याच्या कचाट्यात अडकल्याने त्याला त्याचे आईवडिलही विचारत नसतात. लूनी ब्रॅन्डला आपल्या घरातून निघून जायला सांगतो. ब्रॅन्डन तिथून निघून जातो. पुढे त्याची भेट कॅन्डीसशी होते. तिला एका पुरूषाच्या त्रासापासून वाचवण्याच्या नादात ब्रॅन्डन मार खातो पण कॅन्डीसचा एक मित्र, जॉन त्याला मदत करतो. जॉनसोबत ओळख झाल्यावर ब्रॅन्डनला कॅन्डीसच्या घरी रहाण्याची संधी मिळते.

पुढे ब्रॅन्डन कॅन्डीस आणि जॉनमुळे कॅन्डीसच्या बहीणीला लॅनाला भेटतो. ब्रॅन्डनला लॅना आवडते. तिच्यासोबत ओळख वाढवण्याचा ब्रॅन्डन निश्चय करतो. शस्त्रक्रिया करून घेऊन आपण शारिरीकदृष्ट्याही पुरूषासारखं दिसावं, असा ब्रॅन्डनचा बेत असतो. नवे मित्र आणि त्यांच्यासोबत सुरू असलेल्या आपल्या नव्या आयुष्यावर ब्रॅन्डन खूश असतो पण लवकरच त्याला जॉन आणि टॉमच्या आक्रस्ताळेपणाची कल्पना येते. पण आतापर्यंत ब्रॅन्डन आणि लॅनाच्या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालेलं असतं. जेव्हा प्रेमातून अभावितपणे त्यांच्यात जवळीक निर्माण होते, तेव्हा ब्रॅन्डन लॅनाला त्याच्या शरीरातील स्त्रीत्वाचे बारकावे दुर्लक्षित करायला लावण्यात यशस्वी होतो. लॅना आणि ब्रॅन्डन एकमेकांचे सर्वस्व होऊन जातात. मात्र जॉनला लॅना हवी असते त्यामुळे तिची ब्रॅन्डशी वाढत चाललेली सलगी त्याला डोळ्यात खुपू लागते. कायद्याचा ससेमिरा चुकवण्यासाठी ब्रॅन्डन एक उचापत करतो आणि त्यात तो चांगलाच अडकतो. त्याला तुरूंगात टाकले जाते. याच दरम्यान लॅनाला तो मुळचा स्त्री आहे, हे समजतं. ब्रॅन्डन स्त्री आहे, हे जॉन आणि टॉमला देखील कळतं आणि इथेच टीनाच्या शरीरातील ब्रॅन्डनच्या मनावर आघात करण्याचा प्रयत्न होतो.

हिलरी स्वॅन्कच्या चाहत्यांनी हा चित्रपट नक्कीच पाहिला असेल. तिचा 'मिलियन डॉलर बेबी' ज्यांना आवडला आहे, त्यांना हा चित्रपट देखील आवडेल. चित्रपटात वास्तववादी व आक्षेपार्ह दृश्यांचा भरणा असला तरी ती अवाजवी न वाटता कथेच्या अनुषंगाने येतात. आक्षेपार्ह दृश्य कोणत्या प्रसंगात असावीत व नसावीत हे अचूकपणे ठरवणं, हे दिग्दर्शिका किम्बर्ली पिअर्सचं कसब म्हटलं पाहिजे. हिलरी स्वॅन्कने जितक्या तन्मयतेने ब्रॅन्डची व्यक्तिरेखा साकारली आहे, ते पाहिलं तर तिला ब्रॅन्डच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या ऑस्कर पुरस्काराव्यतिरिक्त इतर अनेक ठिकाणी अभिनयाची पारितोषिकं न मिळती तरच नवल होतं. हिलरी स्वॅन्कच्या जोडीने लंडन फिल्म फेस्टीव्हलचा त्या वर्षीचा सत्यजित रे पुरस्कार या चित्रपटाची दिग्दर्शिका किंबर्ली पिअर्स हिला मिळाला आहे. सत्यघटनांवर आधारित या चित्रपटाची पटकथा, चित्रपट दिग्दर्शिका किम्बर्ली पिअर्सनेच लिहिली आहे. संपूर्ण चित्रपटात खटकत रहाणारी एकमेव गोष्ट म्हणजे हिलरी स्वॅन्कचा आवाज. 'ब्रॅन्डनचा' आवाज पुरूषी नाही, हे जाणवत रहातं.

कायद्याने आता समलिंगी विवाहांना मान्यता मिळाली असली तरी पुरूषाचं बायकी वागणं असो कि स्त्रीचं पुरुषी वागणं असो, दोन्हीही चर्चेचा विषय ठरतात. पुरूषातील स्त्री असो वा स्त्रीमधील पुरूष, समाजाच्या रूढी परंपरांच्या त्रिमितीबाहेरचं हे सत्य स्विकारताना या दोन्ही प्रकारच्या व्यक्तींची जाणूनबुजून टिंगल उडवली जाते, अपमान केला जातो. त्याहीपलिकडे जाऊन यांच्या शरीराचे लचके तोडताना ती व्यक्ती देहाने नसेल पण मनाने स्त्रीच आहे किंवा पुरूषी वागत असेल पण शरीर तर स्त्रीचं आहे, अशी हिडीस मनोवृत्ती बाळगूनच पुढचे क्रूर बेत आखले जातात. जोगवा चित्रपटातील किशोर कदम यांनी साकारलेला यमन्यासुद्धा आपली व्यथा मांडताना, त्याच्या पुरूषाच्या देहात जबरीने बाई कोंबून मग तिच्या कसे अत्याचार केले गेले याचं विदारक वर्णन करतो. असे चित्रपट मनोरंजनापेक्षा वास्तवतावादी भाष्य जास्त करतात. मात्र अशा चित्रपटांतून वास्तव जाणून घेऊन, त्यातील समस्यांवर सामंजस्याने विचार करण्यापेक्षा, वास्तवातील किरकोळ कमजोर बाजूही आपल्या दृष्टीने कशी फायद्याची ठरेल यावरच ऐंशी टक्के समाज विचार करत असतो, ही गोष्ट अंगावर काटा आणणारी आहे.

Comments