माय बिग फॅट ग्रीक वेडींग (२००२) - ज्याचा शेवट गोड
म्हटलं तर काहीच नाही, म्हटलं तर बरंच काही असलेला हा चित्रपट एकत्र कुटुंबपद्धतीमधे असणारे रूसवे फुगवे पण तरीही एकमेकांशी असणारी बांधिलकी यांचं सुरेख चित्र दाखवतो. एका ठिकाणी कुटुंबाचा रूढीवादीपणा आपल्याला हैराण करतो तर जेव्हा त्याच्यामागे आपल्याच जीवलगाचं भलं चिंतीलेलं दिसतं तेव्हा तो रूढीवादीपणा आवडून जातो. ग्रीक कुटुंबातील टॉला आता ३० वर्षांची झालीये पण तिच्या स्थूल बांध्यामुळे तिचं लग्न जमत नाही. पण आपलं लग्न न जमणं ही एकच समस्या टॉलाकडे नाहीये. टॉलाची मुख्य समस्या आहे ती आपल्या वडीलांचं ग्रीक संस्कृतीच्या प्रभावाखालचं अतिरेकी वागणं. अमेरिकेत राहूनही आपल्या मुलांची ग्रीक संस्कृतीची बांधिलकी रहावी म्हणून त्यांनी टॉलाला ग्रीक शिकायला पाठवलं. ग्रीक स्त्री म्हणजे कितीही शिकली तरी दोन-तीन मुलांना जन्म देऊन नव-याचं घर सांभाळणारी, थोडक्यात चूल आणि मूल परंपरेमधली स्त्री असा ते आजही विचार करतात. ग्रीक रीतीरिवाज, परंपरा ते सहजासहजी सोडायला तयार नाहीत. टॉलाला ते वारंवार या गोष्टीची जाणीव करून देत रहातात. तिला तिच्या मनाप्रमाणे आजपर्यंत काहीही करता आलेलं नाही. लग्न करून असंच वागायलादेखील टॉलाच...