रान बाजार

रानबाजार वेबसिरीज पाहिली. ह्या सिरीजला मराठी क्राईम थ्रिलरमध्ये सर्वात वरचं स्थान मिळायला हवं.

मालिकेच्या एकेका भागातून अलगदपणे रहस्य उलगडत जातं आणि तो प्रवास कंटाळवाणा नाही हे विशेष. ह्या मालिकेचा दुसरा सिझन येईल असं काहीजण म्हणत होते पण तसं वाटत नाही. ह्या कथेचा अंत तिथेच व्हायला हवा. अर्थात्‌ हे माझं मत झालं. 

अभिनय सर्वांचाच आवडला. रोल लहान असो कि मोठा, सर्वांनीच समरसून काम केलं आहे. प्राजक्ता माळी सुरुवातीचे दोन एपिसोड तिच्या हास्यजत्रेतील प्रतिमेमुळे गोड, गुप्पू मुलगी वाटत राहाते पण नंतर ‘रत्ना’ अपील होते. तेजस्वीनी पंडित सुंदर आणि नाजूक दिसते.

ही मालिका खूप बोल्ड आहे, शिव्यांचा भडिमार आहे असं बरंच ऐकलं होतं पण स्वत: मालिका पाहिल्यानंतर कळलं कि जितकं आवश्यक आहे तितकंच दाखवलं आहे. डोळ्यांना डिस्टर्ब करेल, मेंदूला झिणझिण्या आणेल असं काहीही दाखवलेलं नाही. सेक्स वर्कर्स, पोलिस, राजकारणी आपल्या खासगी आयुष्यात जसे बोलतील, वागतील तसंच दाखवलं आहे पण त्यातही मर्यादा राखलेली आहे.

राजकारण्यांच्या गाडीवर, पोलिसांच्या व्हॅनवर आणि वेश्येच्या दरवाज्यावरच्या दिव्याचा रंग लालच असतो. त्या प्रत्येक दिव्याचं समाजातलं स्थान मात्र निरनिराळं असतं पण जेव्हा रानबाजार हा शब्द उच्चारला जातो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर फक्त फसवणुकीमुळे, जबरदस्तीने किंवा नाईलाज म्हणून धंद्यासाठी बसलेल्या वेश्याच येतात पण ह्या मालिकेमध्ये रानबाजार नेमका कोणी मांडला आहे, हे मालिकेच्या टीजर्समधून फार चपखलपणे मांडलं होतं . ते रहस्य जाणून घेण्यासाठी सर्व भाग नीट पाहाणं गरजेचं आहे.

Comments