दिल बेचारा (२०२०)
दिल बेचारा रिलीज झाल्याक्षणी सुशांतचे फॅन्स तो पाहाणार हे अटळ होतं. ह्या सिनेमाचे मी अनेक रिव्ह्यूज वाचले. बऱ्याच जणांनी सिनेमाला १०/१० रेटिंग दिलंय, ते सुशांतच्या प्रेमाखातर. मीदेखील IMDB वर 10/10 रेटिंग दिलंय, त्याचं कारण सुशांत आणि रेहमानच्या संगीताबद्दल असलेला आदर हेच आहे.
'द फॉल्ट इन अवर स्टार्स' ह्या हॉलीवूड चित्रपटावरून निर्माण केलेला बॉलीवूडचा 'दिल बेचारा' एका दृष्यापासून अर्धवट, गोंधळलेला आणि घाईघाईत संपवल्यासारखा वाटतो. एका चित्रपटाची कॉपी करूनच हिंदी चित्रपट बनवायचा असेल तर किमान मूळ पाश्चिमात्य चित्रपटाच्या कथेचा गाभा, दृश्यांमधील आशय समजून घेऊन तो बाज भारतीय (हिंदी) चित्रपटात आणणं आवश्यक होतं, ते झालेलं नाही. उलट, नको त्या प्रसंगाची मूळ चित्रपटामधून नक्कल घेऊन ती चुकीच्या ठिकाणी हिंदी चित्रपटात वापरलेली आहे. जे प्रसंग पाश्चिमात्य आणि भारतीय अश्या दोन्ही सिनेमात शोभू शकले असते, आजच्या काळानुसार योग्यदेखील दिसले असते असे प्रसंग वगळून चित्रपटाला इंडियन लूक देण्याचा नादात सिनेमात स्वत:च्या कथानकाची जोड देऊन मूळ कथानकाचा अर्थच बदलला गेला आहे.
ही कथा किझ्झी बासूची आहे. इतर कोणत्याही कॅन्सर रुग्णाप्रमाणेच तीदेखील सततच्या गोळ्या, वेदना, एकटेपणा ह्याला कंटाळलेली आहे. क्षणाक्षणाला मरणाच्या दिशेने सरकणाऱ्या किझ्झीला आपल्या आयुष्याचा कंटाळा येण्यासोबतच एका गोष्टीची भिती वाटते कि आपल्या मृत्यूनंतर आपले आईवडील नैराश्याने ग्रस्त झाले तर? त्या भितीवर मात करण्यासाठी, एकटेपणा वाटून घेण्यासाठी ती मृत लोकांच्या नातेवाईकांसोबत शोकसभांना जाऊन बसते. पण किझ्झीच्या आयुष्यात आलेला कॅन्सर झालेला मॅनी किझ्झीला जगणं शिकवतो. किझ्झी आणि आपला मित्र जे.पी. चा शेवटाच निरोप घेण्याआधी मॅनी किझ्झीची शेवटची इच्छा पूर्ण करतो. जाणारा जातो पण त्याच्या मागे त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांची अवस्था खूप वाईट होते. मात्र मॅनीचं प्रेम किझ्झीला मॅनीची उणीव मान्य करून जगायला शिकवतं.
दिल बेचारा मला दोनदा पहावा लागला. त्याचसोबत मूळ इंग्लिश चित्रपट 'द फॉल्ट इन अवर स्टार्स' सुद्धा पहावा लागला. दोन्ही चित्रपटांची तुलना करण्यापेक्षा दिल बेचारामध्ये दिसत असलेला तुटकपणा मूळ चित्रपटामधून जसाच्या तसा उचललाय का हे पहायचं होतं. सैफ अली खानचं पात्र पहिल्या खेपेस विसंगत वाटलं तसं दुसऱ्यांदा सिनेमा पाहताना वाटलं नाही. पण त्यानंतर इंग्लिश सिनेमा पाहताना एक गोष्ट जाणवली कि दिल बेचारामध्ये पॅरीसच्या ट्रीपच्या शेवटच्या टप्प्यापासून चित्रपट अधांतरी होत चालला आहे, तसं 'द फॉल्ट इन...' मध्ये जाणवत नाही. एकामागून एक घटना आपसूक येतात. दिल बेचाराचं एडिटिंग ह्याला कारणीभूत असण्याची शक्यता जास्त वाटते.
चित्रपट कसाही असला तरी सुशांत सिंग राजपूतने मॅनीच्या व्यक्तीरेखेमध्ये नि:संशयपणे उत्तम अभिनय केला आहे हे खरं आहे. मात्र त्यामुळे चित्रपटाचा दर्जा सुमार आहे ही परिस्थिती बदलता येत नाही. ह्या विधानामुळे मला सुशांतच्या फॅन्सचा रोष पत्करावा लागेल ह्याची पूर्ण कल्पना असूनही मी हे लिहितेय कारण सुशांत आता आपल्यात नाही ही परिस्थिती मान्य केल्यानंतर त्याच्याकरता सहानुभूती मिळवण्यासाठी खोटं बोलावंसं वाटत नाही.
संजना सांघी ही "हिरोची हिरोईन" होऊ शकणार नाही पण अभिनेत्री होऊ शकेल इतपत चांगला अभिनय ती करते. सुशांत आणि संजना सोडल्यास मुख्य कलाकार म्हणावेत असे फारच थोडे लोक आहेत चित्रपटात आणि आपल्या भूमीकेची लांबी कमी-जास्त असल्याचा परिणाम त्यांनी अभिनयावर होऊ दिलेला नाही. ए.आर. रहमानचं संगीत आवडलं. त्यातही दिल बेचारा हे शीर्षक गीत, तारे गिन आणि खुल के जीने का मजा ही तीन गाणी श्रवणीय. तारे गिनचं संगीत उत्तमच. फक्त पॅरिस ट्रिपच्या वेळेस आफरिदा हे अरबी धून असलेलं गाणं का वाजवलं ते कळलं नाही.
एका टेकमध्ये पूर्ण गाण्यावर नृत्य करणं ही सोपी गोष्ट नाही पण सुशांतने त्याच्या शेवटच्या सिनेमामधून तेही सहज करून दाखवलंय. सुशांतसाठी किमान एकदा तरी पहावा असा हा चित्रपट नक्कीच आहे. दिग्दर्शक म्हणून पदार्पण करताना मुकेश छाब्रांनी कॉपी करण्यासाठी योग्य हॉलीवूड चित्रपट निवडला असला तरी त्या चित्रपटातलं मर्म आणि दिल बेचाराच्या कथानकामधील अर्थ ह्यात बरीच गफलत केली आहे. पण पहिला प्रयत्न म्हणून ह्याकडे दुर्लक्ष करतानाच हा चित्रपट सुशांतचा शेवटचा सिनेमा असल्याने तो मूळ चित्रपटापेक्षाही सरस असायला हवा होता असं राहून राहून वाटतंच.
सुरेख विश्लेषण
ReplyDeleteधन्यवाद.
Delete