बुलबुल (२०२०) - ज्ञात तरीही अज्ञात

रहस्यप्रधान चित्रपटांमध्ये रहस्यभेद होईपर्यंत प्रेक्षकाला कंटाळा येऊ न देणं ही दिग्दर्शकाची जबाबदारी असते. पण वेळेआधीच रहस्यभेद करून मग त्या रहस्याची कारणनिर्मिती हेच मूळ रहस्य आहे याची जाणीव न होऊ देता कथेचा शेवट पाहण्यासाठी प्रेक्षकाला खुर्चीवर खिळवून ठेवणं ह्यात दिगदर्शकाचं खर कसब पणाला लागतं.

अनेक चित्रपटांसाठी गीतकार म्हणून काम करणाऱ्या अन्विता दत्त ह्यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट पण त्यांच्या दिग्दर्शनात नवखेपणा जाणवत नाही. अनेक चित्रपटांच्या संवादलेखनाचा अनुभ थोडासा कामी आला असावा. गूढ कथासूत्रांची आवड असलेल्या अनुष्का शर्माने निर्माती म्हणून ह्या चित्रपटाची निवड केली नसती तरच नवल! एक गोष्ट सांगायला हवी कि बुलबुल हा भयपट (horror) नाही. तो एक अद्भुतपट (supernatural thriller) आहे. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धाचा काळ वापरल्यामुळे चित्रपटामधून येणारे प्रसंग अधिक समर्थनीय वाटतात.

चित्रपटात सर्वात जास्त अभिनय आवडला तो पाओली दामचा. लहानग्या बुलबुलशी बोलताना मत्सरासोबतच आलेला हळूवारपणा, तरूण बुलबुलशी बोलताना दाखवलेला खंवटपणा, जिथे आपली योग्यता विचारात घेतली जाणार नाही तिथे आलेला लाचारपणा, स्वत:ची असहायता व्यक्त करताना दाखवलेला छुप्या मत्सरासोबतचा बधीर कोडगेपणा ह्या बिनोदिनीच्या सर्वच भावना तिने अतिशय प्रभावीपणे दाखवल्या आहेत. राहूल बोसने जसं काम करायला हवं होतं तसंच केलं आहे. अविनाश तिवारीचा अभिनय अनेक प्रसंगांत तोकडा पडतो. तृप्ती दिमरीदेखील विशेष प्रभाव पाडत नाही. मात्र तिचं दिसणं, हसणं प्रत्येक प्रसंगात समर्पक, सूचक दिसेल ह्यासाठी रंगभूषेचा योग्य उपयोग केलेला आहे. तिला कमीत कमी संवाद देऊन बाकीची उणीव भरून काढलेली आहे. परमब्रत चटोपाध्यायला ह्या आधी 'कहानी' चित्रपटात पाहिलं होतं. तो कमी संवादांमध्ये बरंच बोलू जातो. संवादफेक उत्तम आहे त्याची.

चित्रपटामध्ये वापरलेल्या निळ्या-हिरव्या आणि लाल रंगाच्या छटा वातावरणाबदल अतिशय सुरेखपणे दाखवतात. परिसराची लांबून घेतलेली दृश्यं ह्यामुळे एकटेपणा, एकाकीपणा ठळकपणे जाणवतो. पार्श्वसंगीत त्यात गूढतेची भर घालतं.

प्रत्येक अतर्क्य गोष्टीच्या मागे आपल्याला माहित नसलेलं पण किमान एक तरी तार्किक कारण दडलेलं असतं. एकदा ते कारण कळल्यावर ते तसंच रहस्य ठेवायचं, कि ती समस्या आहे हे जाणून त्यावर उपाय शोधायचा कि त्या कारण निर्मितीमध्ये आपलाही सहभाग होता अशी जबाबदारी स्विकारून लांब व्हायचं, हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं.

हा चित्रपट नेटफ्लिक्स वर उपलब्ध आहे.

Comments