द जनरल्स डॉटर (१९९९) - शोध खर्‍या सत्याचा

सैन्यामधे सार्जंट असलेला पॉल ब्रेनर हा एक सी.आय.डी. एजन्ट सुद्धा आहे. योगायोगाने त्याची ज्या सुंदर कॅप्टन तरूणीशी ओळख होते, तिचा खून झाला असल्याची बातमी त्याला कळते. तिच्या खुनाच्या तपासणीचं काम हातात घेतल्यावर त्याला आणखी एक सत्य कळतं की ही मृत तरूणी नुसतीच कॅप्टन नसून सैन्यातील जनरल कॅम्प्बेल यांची मुलगी एलिझाबेथ कॅम्पबेल आहे. आपल्या मुलीच्या मृत्यूमुळे व्यथित झालेले जनरल कॅम्पबेल पॉलला आपल्या मुलीचा खुनी शोधून काढण्याचं आवाहन करतात. पॉलच्या जोडीला सॅरा सनहिल नावाची एक रेप स्पेशालिस्टही काम करत असते. खुनाचा तपास करताना मात्र पॉलच्या समोर काही अशा गोष्टी उघड होतात की ज्यामुळे त्याला एलिझाबेथ कॅम्पबेलच्या चारित्र्याविषयी आणि मानसिक संतुलनाविषयी शंका उत्पन्न होऊ लागतात. तो शोध पुढे सुरूच ठेवतो. अखेर पॉल आणि सॅरा या दोघांच्याही समोर येतं ते असतं एलिझाबेथच्या खुनामागचं रक्त गोठवणारं, विदारक सत्य!

तीन चतुर्थांश चित्रपटात रहस्यावरची पकड सुंदर आहे. मग मात्र आपल्याला रहस्य काय आहे हे कळू लागतंच. शेवटी एलिझाबेथचा खून कुणी केला हे कळल्यावर आपल्याला विशेष आश्चर्य न वाटता केवळ एक सिनेमॅटीक तडजोड वाटते. दिग्दर्शक सायमन वेस्टच्या इतर चित्रपटांमधे रहस्यांसोबतच अ‍ॅक्शनचा मसाला पुरेपुर भरलेला असतो, मात्र या चित्रपटात हाणामारीचे प्रसंग विशेष नाहीत. पटकथाकार ख्रिस्टोफर बर्टोलिनीचा हा बहुधा पहिलाच प्रयत्न असावा. संवाद चुरचुरीत आहेत पण काही वेळा बाळबोध वाटतात. चित्रपटाचं नाव जनरल्स डॉटर असलं तरी हिरो म्हणजे जॉन ट्राव्होल्टाला सर्वाधिक काम आहे असंच म्हटलं पाहिजे. लेस्ली स्टीफॅन्सन कॅ. एलिझाबेथ कॅम्पबेल आणि जनरलच्या भूमिकेत जेम्स क्रॉमवेल फीट बसले आहेत. जेम्स वूड, मेडलिन स्टो आणि टिमथी हटन असे कलाकार चित्रपटात असूनही त्यांच्या भूमिकांची लांबी मात्र अत्यंत कमी आहे.

कितीही लपवून ठेवलं तरी सत्य हे कधी ना कधी तरी उजेडात येतंच, असं आपण नेहमी म्हणतो. पण मुळात सत्य लपवून ठेवलं का जातं? कारण काही लोकांचा त्यातून स्वार्थ साधला जाणार असतो किंवा असं म्हणणं जास्त श्रेयस्कर होईल की अन्याय, मग तो कोणावरही झालेला का असेना, जगजाहीर करून स्वत:चं नुकसान करून घेण्यापेक्षा, सत्य लपवून ठेवल्याने मिळणारा फायदा काही लोकांना अधिक मोलाचा वाटतो. नेल्सन डी’मिल यांच्या ’द जनरल्स डॉटर’ या कादंबरीवर आधारित या चित्रपटाचं कथानक असंच काहीसं आहे.

Comments