भयपट... तुम्ही दचकणार की घाबरणार?

भूत, भूतबाधा, मांत्रिक यासारखे विषय हाताळणार्‍या चित्रपटांमधे दोन प्रकार असतात. या दोन प्रकारांमधे एक सूक्ष्मसा फरक असतो. काही चित्रपट प्रेक्षकांना नुसतेच दचकवण्यासाठी बनवलेले असतात. ज्यात असत्यावर सत्याचा विजय असा शेवट असतो किंवा दानव श्रेष्ठ आहे असा चित्रपटाचा शेवट प्रेक्षकांना बधिर करायला लावणारा असतो. अशाच चित्रपटांची निर्मिती बहुसंख्यवेळा होते, ज्यात भूत प्रेक्षकांच्या मनोरंजनाकरता तयार केलं गेलेलं असतं. चित्रपट संपल्यानंतरही प्रेक्षकाला भिती वाटत रहाते पण ती भुताच्या रूपामुळे वाटणारी भिती असते. रामसे बंधूंचे भूतपट बहुतेकांनी पाहिले असतील. यात प्रेक्षकाला दचकवण्यासाठी जे जे प्रकार करणं शक्य होतं, ते सर्व प्रकार दिग्दर्शकाने केलेले दिसतील. हे चित्रपट सुमार कथानक असूनही सर्वांना आवडले. मात्र त्यातील काही विशिष्ट चित्रपटच नाव आणि कथानकानिशी प्रेक्षकांच्या लक्षात राहिले आहेत. याचं पहिलं कारण म्हणजे एकतर ’भूत’ या कल्पनेसोबत चित्रपट "कसेही करून चालावेत" म्हणून आवश्यक तो मालमसाला यात भरभरून असायचा, दुसरं म्हणजे भूताचा आणि प्रेक्षकाचा काही परस्परसंबंध असू शकतो ही कल्पनाच या चित्रपटांमधे नसायची. तिसरं म्हणजे सरतेशेवटी भूत हे नष्टच होतं हे प्रेक्षकांनी गृहीत धरलेलं असायचं. मुळात "घाबरायला आवडतं" म्हणून प्रेक्षक जे चित्रपट पहात असतो, ते खरे त्याला नुसतं दचकवत असतात. ईमेलमधे आलेला एखादा छान व्हिडीओ पहाताना मधेच एक हिडीस आकृती आरडा-आओरडा किंकाळ्यांसकट स्क्रीनवर येते तेव्हा खरं तर आपण प्रचंड दचकलेलो असतो. पण तोच prank व्हिडीओ पुन्हा पहाताना आपण घाबरतो का?

याउलट काही चित्रपट प्रेक्षकांना दचकवतात आणि घाबरवतातही! या चित्रपटांमधे भूत असतं, दानव असतो; यांच्या अचानक घडणार्‍या हालचालींमुळे प्रेक्षक दचकतोसुद्धा. पण यांच्यापेक्षाही प्रेक्षक सर्वात जास्त कशाला घाबरतो, तर तो स्वत:ला! अशा चित्रपटांचं कथानक चित्रपटगृहाबाहेर पडल्यावरही प्रेक्षकाच्या मनात रेंगाळत रहातं. कारण कुठे ना कुठे तरी हे कथानक प्रेक्षकाला स्वत:च्या आयुष्यात घडलेल्या अतर्क्य घटनांकडे निराळ्या दृष्टीकोनातून पहायला लावणारं असतं. भूताचा आणि आपला परस्परसंबंध येतो आहे, ही जाणीव जेव्हा प्रेक्षकाच्या मनात खोल रूजत जाते तेव्हा भूताच्या रूपापेक्षाही, प्रेक्षकाला भूत या संकल्पनेची भिती जास्त वाटू लागते. चित्रपटातील प्रसंग कदाचित आपल्या बाबतीत घडू शकतील अशी त्याला शंका येऊ लागते. त्या चित्रपटांच्या नावापेक्षाही प्रेक्षकाला दीर्घकाळ लक्षात रहातं ते कथानक! अशा चित्रपटांमधे भूत असूनही त्यांना भूतपट म्हणण्यापेक्षा भयपट म्हणणं जास्त योग्य ठरेल, असं मला वाटतं. कारण त्यांचं कथानक मनुष्याच्या अपराधी भावनेतून निर्माण झालेल्या भूताबद्दल व भयाबद्दल जास्त भाष्य करत असतं. त्यातून जर या दुसर्‍या प्रकारातील चित्रपट "सत्य घटनांवर आधारित आहेत", असं सुरूवातीलाच सांगितलं गेलं, तर त्यांच्यामधलं "भूत" हे अधिक परिणामकारक ठरतं.

वरील दोन्ही प्रकारच्या चित्रपटांची पटकथा दिग्दर्शकाने कशा प्रकारे हाताळली आहे, यावर चित्रपटाचं यश किंवा चालणं न चालणं अवलंबून असतं. जराशी चूक इकडे तिकडे आणि भयपटाचा विनोदपट व्हायला वेळ लागत नाही. आपल्याकडे बनलेल्या "वास्तूशास्त्र" या रामगोपाल वर्माच्या चित्रपटाला प्रेक्षकांनी विनोदपट म्हणून स्विकारलं, हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. कारण चित्रपटात भूत उगवण्यासाठी आवश्यक असलेलं पार्श्वभूमीचं बीजच कथानकात नव्हतं. पण त्याच रामगोपाल वर्माचा ’रात’ आणि रातच्या कथानकात सुधारणा करून बनवलेला ’भूत’ हे दोन्ही चित्रपट मात्र प्रेक्षक अजूनही विसरू शकत नाहीत. भयपटामधेही माफक विनोदनिर्मिती करून भयपटाचा विनोदीपट होऊ न देता, चित्रपटाचा मूळ उद्देश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं आणि मुख्य म्हणजे प्रेक्षकांना त्या संकल्पनेचा सकारात्मक पद्धतीने स्विकार करायला भाग पाडणं, यात दिग्दर्शकाचं खरं कसब दिसून येतं असं मला वाटतं. याबाबतीत देखील भारतीय चित्रपटांपेक्षा हॉलीवूडचे चित्रपट सरस ठरतात. अगदी तद्दन रामसे छाप भूतपट असला तरी!

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला ’डेव्हिल’ हा चित्रपट प्रेक्षकाच्या मनातील अपराधी भावनेवर लक्ष केंद्रित करून बनवण्यात आलेला चित्रपट आहे. तुम्ही कितीही धार्मिक, देवभोळे असा पण जर तुमच्या हातून काही पाप घडलं असेल, तर त्याचं प्रायाश्चित्त तुम्हाला घ्यावंच लागेल आणि जर त्याची तयारी नसेल, तर सैतानाशी तुमची गाठ केव्हाही, कुठेही पडू शकते. तर या वर्षी प्रदर्शित झालेला ’द राईट’ देवभोळे नसलेल्या किंवा नास्तिक प्रेक्षकालाही एक नवीनच साक्षात्कार देतो - चुझिंग नॉट टू बिलिव्ह इन द डेव्हिल, वोन्ट प्रोटेक्ट यू फ्रॉम हिम. (सैतानावर विश्वास ठेवला नाही म्हणजे तुम्ही स्वत:ला सैतानापासून वाचवू शकता असं नाही).

Comments