भयपट... तुम्ही दचकणार की घाबरणार?
भूत, भूतबाधा, मांत्रिक यासारखे विषय हाताळणार्या चित्रपटांमधे दोन प्रकार असतात. या दोन प्रकारांमधे एक सूक्ष्मसा फरक असतो. काही चित्रपट प्रेक्षकांना नुसतेच दचकवण्यासाठी बनवलेले असतात. ज्यात असत्यावर सत्याचा विजय असा शेवट असतो किंवा दानव श्रेष्ठ आहे असा चित्रपटाचा शेवट प्रेक्षकांना बधिर करायला लावणारा असतो. अशाच चित्रपटांची निर्मिती बहुसंख्यवेळा होते, ज्यात भूत प्रेक्षकांच्या मनोरंजनाकरता तयार केलं गेलेलं असतं. चित्रपट संपल्यानंतरही प्रेक्षकाला भिती वाटत रहाते पण ती भुताच्या रूपामुळे वाटणारी भिती असते. रामसे बंधूंचे भूतपट बहुतेकांनी पाहिले असतील. यात प्रेक्षकाला दचकवण्यासाठी जे जे प्रकार करणं शक्य होतं, ते सर्व प्रकार दिग्दर्शकाने केलेले दिसतील. हे चित्रपट सुमार कथानक असूनही सर्वांना आवडले. मात्र त्यातील काही विशिष्ट चित्रपटच नाव आणि कथानकानिशी प्रेक्षकांच्या लक्षात राहिले आहेत. याचं पहिलं कारण म्हणजे एकतर ’भूत’ या कल्पनेसोबत चित्रपट "कसेही करून चालावेत" म्हणून आवश्यक तो मालमसाला यात भरभरून असायचा, दुसरं म्हणजे भूताचा आणि प्रेक्षकाचा काही परस्परसंबंध असू शकतो ही कल्पनाच या चित...