शेर शिवराज

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील वास्तविक घटनांवर आधारित सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये पहिल्या पाचांत ‘शेर शिवराज’चं नाव नक्की घेतलं जाईल. मला हा चित्रपट अतिशय आवडला. ‘फर्जंद’मध्ये ज्या उणीवा जाणवल्या होत्या, त्या ह्या चित्रपटात जाणवत नाहीत. त्या नंतरचे त्यांचे दोन चित्रपट मला पाहता आलेले नाहीत.

सिनेमॅटिक लिबर्टी किंवा लूप होल्सबद्दल चर्चा करायला नको. काही गोष्टी अतिशय उशीरा लक्षात येतात. पुढील चित्रपटांमध्ये त्या उणीवाही दूर केलेल्या असतील ह्याची खात्री आहे. एकाच गोष्टीची खंत आहे कि हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याची इच्छा अपूर्ण राहिली.

ज्या ऐतिहासिक घटनेचा शेवट लोकांना फार पूर्वीपासून माहित आहे, त्या ऐतिहासिक घटनेतील थरार प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्यासाठी अडीच तासांचा चित्रपट एक सेकंदही कंटाळवाणा न वाटेल अश्या प्रकारे दिग्दर्शित करणे, कोणत्या संवादांनंतर प्रेक्षकांमध्ये उत्साहाची लाट पसरून त्यांनी चित्रपटगृह डोक्यावर घेतल्यामुळे पुढे सरकलेलं कथानक त्यांच्याकडून चुकवलं जाऊ शकतं हे ओळखून दोन प्रसंगांमध्ये ठेवलेल्या अल्पविरामामध्ये पात्रांचे लूक्स, कॅमेऱ्याची गती आणि पार्श्वसंगीताने ती जागा नीट भरुन काढली आहे, हे निश्चितपणे कौतुकास्पद आहे. लांजेकरांनी लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि निर्माता म्हणून त्यांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे.  मला क्रेडिट्ससुद्धा खूप आवडले.

आई तुळजा भवानीच्या मंदिरातील प्रसंग बटबटीत नसतानाही अंगावर काटा आणतो. पात्रांच्या वेशभूषाही चोख वाटल्या. मृणाल कुलकर्णींचे जिजाबाईंच्या भूमिकेतील संवाद प्रत्यक्ष जिजाऊच बोलत असाव्यात इतके खरे. एकटीने चित्रपट पहात असतानाही खानाच्या भेटीचा प्रसंग पाहताना जो भावनांचा कल्लोळ दाटतो त्यावरुन चित्रपटगृहात काय घडलं असेल ह्याचा अंदाज बांधता येतो. खरंच, महाराजांच्या आणि त्यांच्यासाठी जीवावर उदार झालेल्या मावळ्यांच्या आयुष्यातील प्रसंगावर असे वीरश्रीयुक्त चित्रपट अधिकाधिक निर्माण झाले पाहिजेत. चित्रपट पाहूनच आपण सगळं शिकतो असं नाही पण तरुण पिढीचं व्यक्तिमत्त्व योग्य रित्या घडविण्यासाठी चित्रपट माध्यमाची मदत होणार असेल तर त्यापेक्षा चांगलं काही नाही. 

Comments