Shyam Singha Roy

कितीही सिनेमे येऊ देत, हिट होऊ देत पण आपल्या क्रशचा सिनेमा त्याच वेळेस रिलीज झाला असेल तर तो आधी पाहिल्याशिवाय बाकी सिनेमे पहायचे नसतात. शास्त्र असतं ते. ✋‍

‘शाम सिंग रॉय’ पाहिला. आवडला. आवडण्यासारखाच होता तो. आपले दोन आवडते कलाकार एकाच सिनेमात बघायला मिळणं... भाग्य असतं ते.

श्यामची व्यक्तिरेखा अतिशय आवडली. उगाच भावनावेशात केलेलं, वासनांध, लेचंपेचं, रडकं प्रेम नाही त्याचं. ‘स्त्री ही कुणाची दासी नसते’ असं तो रोझीला केवळ पटवण्यासाठी सांगत नाही. वेळ आल्यावर तो समजालाही ते दाखवून देतो. आपलं प्रेम तो ज्या रुपात प्रथम पहातो त्याच रुपात तो ते शेवटच्या क्षणापर्यंत जपतो.

स्वातंत्र्योत्तर काळातील अस्पृश्यता, देवदासींचं धर्माच्या नावाखाली शोषण करणारा ढोंगी महंत, श्यामचं बंड, त्याचं लेखन, त्याचा स्विकार आणि निषेध ह्या पार्श्वभूमीवर श्याम आणि रोझीमधलं प्रेम फुलत जातं.

अनेक घटना ज्या ठळकपणे समोर येतील असं वाटतं त्या येत नाहीत. काही प्रसंगांचा शेवट लौकीकार्थाने जसा व्हायला हवा तसा न होता, श्यामच्या प्रेमकहाणीत जसा व्हायला हवा तसा होतो. काही प्रसंगांचा शेवट पटतही नाही पण चित्रपटाचा शेवट मात्र हवा तसाच घडतो.

प. बंगालमध्ये घडणारी कथा असल्यामुळे तेलगु संवांदांमध्ये मोजके बंगाली संवाद असणं अपरिहार्य आहे.

प्रणवालय आणि श्रीविन्नेला ही दोन गाणी मधूर आहेत. रोझी आणि श्याममधले प्रेमप्रसंग, संवाद अप्रतिम!

साई पल्लवी मेक-अप मध्येसुद्धा छान दिसते. तिचं नृत्य, अभिनय दोन्ही लाजवाबच! सहकलाकारांचा अभिनयही उत्तम आहे.

नानीची तर मी ‘मख्खी’पासूनच फॅन आहे. ह्या चित्रपटात पिळदार मिशा असलेला, स्पष्टवक्ता, तरूण वर्गाचा प्रतिनिधी, अनिष्ट प्रथांना न जुमनणारा, माणसाला माणूस समजणारा आणि आपल्या लेखणीच्या साहाय्याने जनजागृती करणारा, स्वाभिमानी श्याम सिंग रॉय त्याने साकारला आहे. तो साकारण्यात नानीने काहीही कमतरता ठेवलेली नाही.

चित्रपटाच्या पहिल्या अर्ध्या तासातली कथा १५ मिनिटांवर आणून उरलेली १५ मिनिटं ‘श्याम’ला दिली असती तर हा सिनेमा आणखी प्रभावी होऊ शकला असता. एडिटिंगमधल्या त्रुटीही काही ठिकाणी जाणवतात. तरीही एक प्रेमकथा म्हणून हा चित्रपट निश्चितच छान आहे.

#ShyamSinghaRoy

Comments