Varathan (2018)
चित्रपट: Varathan (2018) वरदन -Outsider
उपलब्ध: Disney Hotstar
URL: येथे क्लिक करा.
मूळ चित्रपट: Straw Dogs (1971)
सारांश: अबिन नोकरी गमावल्यामुळे आणि प्रिया गर्भपातामुळे दुबईतलं वास्तव्य सोडून केरळमध्ये प्रियाच्या आजोळी काही महिने बदल म्हणून राहायचं ठरवतात. पण त्या ठिकाणी गेल्यावर ते एका निराळ्याच संकटात सापडतात. प्रिया वारंवार अबिनला संकटाची जाणीव करु देऊ पाहाते पण अबिन कधी त्याच्या शांत स्वभावामुळे तर कधी परिस्थितीमुळे दुर्लक्ष करत राहातो. त्याचा थंड प्रतिसाद पाहून प्रियाचा त्रागा होतो. सतत कात्रीत पकडणाऱ्या त्या अडचणीवर तिला एक कायमचा उपाय हवा असतो. पण तो मिळण्याची आशा मात्र तिने सोडलेली असते. मग प्रिया त्याच संकटाला वारंवार तोंड देत राहाते का? अबिनची प्रतिक्रिया काय असते? ह्या प्रश्नांची उत्तरं जाणूण घेण्यासाठी वरदन पहावा लागेल.
चित्रपटाची सुरुवातीची २० मिनिटं अबिन-प्रियाचं आयुष्य, गाणं आणि त्यांच्या केरळपर्यंतच्या प्रवासाच्या चित्रीकरणामुळे कंटाळवाणी वाटतात. पण २० व्या मिनिटानंतर चढत्या क्रमाने थरार सुरु होतो आणि तो शेवटपर्यंत कायम राहातो.
मानवी वृत्तीची हिणकस बाजू पाहताना एक प्रेक्षक म्हणून आपल्यालाही परिस्थितीची आणि कधीकधी अबिनच्या भेकडपणाची चीड येत राहाते. साध्या, क्षुल्लक वाटणाऱ्या बाबी असतात त्यांच्याकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर आपला विनाश अटळ असतो.
चित्रपटाची पहिली २० मिनिटं जितकी संथ आहेत तितकीच शेवटची २५ मिनिटं उत्कंठावर्धक, खुर्चीला खिळवून ठेवणारी आहेत. ही २५ मिनिटं सकदाचित अतिशयोक्तीने भरलेली वाटू शकतील पण चित्रपटाच्या लांबीचा, कथेचा आणि पात्रांच्या पार्श्वभूमीचा विचार केला तर अभिव्यक्तीचा ह्यापेक्षा निराळा मार्ग प्रेक्षक म्हणून आपल्यालाही पटला नसता हे माझं वैयक्तिक मत आहे.
चित्रीकरण, पार्श्वसंगीत, संकलन, अभिनय आणि दिग्दर्शन ह्या सगळ्याच बाबतीत हा चित्रपट खूप उजवा आहे. प्रियाची भूमिका साकारणाऱ्या ऐश्वर्या लक्ष्मीच्या चेहऱ्याचे कमीत कमी मेक अप केल्यामुळे दिसणारे मूळ फीचर्स वापरुन तिचा उदास, त्रस्त आणि भयभीत मूड अतिशय प्रभावीपणे चित्रित केला गेला आहे. सहकलाकारांचीही कामे उत्तम आहेत. त्यांचा अभिनय आपल्याला आपण प्रेक्षक आहोत हे विसरून श्वास रोखून धरायला, मुठी वळायला लावतो.
फाहद फासिलचा अभिनय लाजवाब आहे असं म्हटलं तर ते फारच अपूरं वाटतं पण आणखी लिहायचं म्हटलं तर कुठे थांबावं हा प्रश्न आहे. त्याचा कोणताही सिनेमा निवडा आणि बघा. चित्रपट कसाही असो, ह्याचा अभिनय लक्षात राहातो. दोन एकसारख्या भूमिका दिल्या तर त्यातही तो आपलं वेगळेपण दाखवू शकेल.
मूळ हॉलीवूडपट मी पाहिलेला नाही त्यामुळे तुलना करण अशक्य आहे पण हा चित्रपट दोन तासांनंतरही आपला पिच्छा सोडणार नाही एवढं नक्की.
चित्रपट हॉटस्टारवर नि:शुल्क उपलब्ध आहे. इंग्लिश सबटायल्सवर पहावा लागेल.
Comments
Post a Comment