क्रिश ३ (२०१३)

वर्तमानपत्रातलं समीक्षण वाचून चित्रपटाचा दर्जा ठरवू नये, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. बहुतांश वर्तमानपत्रांनी क्रिश ३ च्या दर्जाबद्दल शंका व्यक्त करून हा चित्रपट एखाद्या केबल वाहिनीवर दाखवला जाईपर्यंत प्रेक्षक वाट पाहातील याची व्यवस्था करून ठेवली आहे. तथापि अशा रिव्ह्यू वर विश्वास न ठेवता हा सिनेमा काल चित्रपटगृहात पाहिल्यानंतर अनेक दिवसांनंतर एक चांगला हिंदी चित्रपट पाहिल्याचं समाधान मिळालं आणि चांगला चित्रपट म्हणजे मसाला सिनेमा. डोक्याला रोजच्या रोज ताप घेऊन जगणार्‍या सामान्य माणसांना त्यातून सुटका मिळावी म्हणून निराळ्या दुनियेत घेऊन जाणारा एक विरंगुळा हवा असतो, तो या सिनेमाच्या निमित्ताने जरूर मिळेल. हाय व्हॅल्यूज आणि स्वत:चं स्टॅण्डर्ड बिन्डर्ड मेन्टेन करणार्‍यांना या चित्रपटातून काही मिळणार नाही. VFX च्या उच्च पातळीवर बनवलेला हा सिनेमा चित्रपटगृहातच पाहाण्यासारखा आहे.

चित्रपटाची कथा ऑलरेडी सर्वांना कळलेली आहेच. राकेश रोशनने क्रिश ३ च्या निमित्ताने धाडसी प्रयोग केला आहे, हे उघड दिसतंय. कोई मिल गया आणि क्रिश हे दोन साय-फाय पट पचवण्याची ताकद भारतीय प्रेक्षकामधे आहे. क्रिश ३ मधे त्याही पुढे जाऊन हॉलीवूड पटांमधे आजवर जे केवळ अमेरिकेतच घडताना दाखवलं आहे, ते मुंबईतदेखील घडताना दाखवलं आहे. भारतीय प्रेक्षकाची मानसिकता इतकी तयार झाली आहे, असं अजून वाटत नाही. आमच्याकडे वास्तवातले आतंकवादी हल्ले होणं स्विकारलं जातं पण सिनेमात एखादा सामान्य माणूस सुपर हिरो बनू शकतो हे पब्लिकला पटवून देण्यासाठी राकेश रोशनला क्रिश चे पुढचे भाग काढावे लागणं अनिवार्य आहे. तसे ते काढलेही जातील अशी अपेक्षा चित्रपटाच्या हाताळणीमुळे वाटते.

ज्या कुठल्या वृत्तपत्रात विवेक ओबेरॉयने ओव्हर अ‍ॅक्टींग केली आहे, असं लिहिलंय ते साफ चुकीचं आहे. हृतिकच्या अभिनयाबद्दल प्रश्नच नाही. चित्रपटातील इतर सर्व पात्रंदेखील त्यांना नेमून दिलेलं काम चोख बजावतात. कंगना राणावतला कंगना म्हणून चित्रपटात वेगळं करण्यासारखं काही नाही पण तिच्यासाठी हा एक निराळा रोल असेल हे मात्र नक्की. चित्रपटातील सर्व गाणी श्रवणीय आहेत पण ती हळूहळू पकड घेतील. एका रात्रीत लोकप्रिय होणारी ही गाणी नाहीत. चित्रपटाचं नाव क्रिश २ असं नसून ते क्रिश ३ का आहे, हे कळण्यासाठी दिग्दर्शकाने कोई मिल गया आणि क्रिश या चित्रपटांचा सारांश चित्रपटाच्या सुरूवातीलाच दाखवला आहे.

कोणताही चांगला/वाईट सिनेमा चित्रपटगृहात पाहताना काही न आवडणार्‍या गोष्टी म्हणजे उशीरा येणारे प्रेक्षक, राष्ट्रगीत सुरू झाल्यावर ते आपल्यासाठी नसतंच अशा आविर्भावात त्यांचं उभं राहून एकमेकांशी बोलणं, चित्रपटाच्या तिकीटासाठी पैसे खर्च केल्यानंतर सुद्धा चित्रपट सुरू असताना दर पाच-पाच सेकंदानी पर्स, खिशातून मोबाईल काढून मेसेज पाहात राहाणं आणि आपल्या फोनच्या उजेडामुळे मागच्या रांगेतील प्रेक्षाकांना चित्रपट पाहाण्यात व्यत्यय येतो आहे, हे त्यांच्या लक्षातच न येणं, चित्रपट सुरू झाल्यावरदेखील मोबाईल सायलेंटवर न ठेवता फोन आल्यावर तो अटेंड करून मोठ-मोठ्या आवाजात आपल्या धंद्याच्या नफा-नुकसानीची चर्चा करणं. असले वायझेड लोक चित्रपटाला सहन करण्यापेक्षा लहान मुलांचं लॉबीमधलं दुडूदुडू धावणं जास्त सुसह्य असतं. सिनेमाताला स्क्रॅप आयर्न मॅन, दोन VFX च्या त्रुटी आणि दोन शास्त्रीय त्रुटी वगळता हा संपूर्ण सिनेमा मला आवडला आहे.

Comments