कहानी (२०१२) - असत्यामागील सत्याची कहाणी
चित्रपटामधे रहस्य कायम टिकून रहावं, म्हणून पटकथेमधे काही विशेष प्रसंग टाकून प्रेक्षकांना चकवणं हा प्रकार नवीन नाही. आपण चकवले गेलो आहोत, हे प्रेक्षकाला व्यवस्थित समजतं असतं, तरीदेखील अचूक वेळेस होणार्या रहस्यभेदाच्या समाधानापोटी ही फसवणूक त्याने मान्य केलेली असते. मात्र चकवण्यासोबतच थेट फसवणं या तंत्राचा देखील वापर करून जेव्हा एखादा दिगदर्शक पटकथेला आकार देतो, तेव्हा प्रेक्षक या कथेशी शेवटपर्यंत एकरूप होईल आणि फसवणूक व चकवलं जाणं या दोन्हीमधला फरक समजून घेण्याची उसंत त्याला मिळणारच नाही, हा पुरेपूर आत्मविश्वास त्या दिग्दर्शकाने बाळगला असला पाहिजे. ’कहानी’पुरतं बोलायचं झालं तर दिग्दर्शक सुजोय घोष हेच ’कहानी’चे संहिताकार असल्यामुळे असा सार्थ आत्माविश्वास जर त्यांना आला असेल, तर त्यात काहीच नवल नाही. साध्या सरधोपट कथेला अनपेक्षित वळणे देत, प्रेक्षकाची मानसिकता लक्षात घेऊन अचूकपणे चकवत व फसवत त्याला चित्रपटाच्या अंतापर्यंत खुर्चीवर खिळवून ठेवण्याचं कसब सुजोय घोषनी साध्य केलं आहे.
आतापर्यंत चित्रपटाच्या जाहिरातींमुळे ’कहानी’ची जितकी कथा वाचली, पाहिली त्यातून प्रेक्षकाला इतकं कळलेलं आहे की विद्या बागची ही सात महिन्यांची गरोदर स्त्री लंडनहून कोलकत्याला येते, ती आपला पती अर्नब बागची याला शोधण्याकरता. पण कोलकत्यामधे मात्र अर्नब बागची नावाची व्यक्ती अस्तित्वात आहे, हे कुणीच मान्य करत नाही. ती प्रत्येकाकडे मदतीची याचना करत असते. या शोधकार्यादरम्यान तिला काही अनपेक्षित घटनांचा सामना करावा लागतो. पण कहानीची कथा केवळ इतकीच नसून, याहीपलिकडे काही रहस्य त्यात दडलेलं आहे. ते इथे उलगडण्यापेक्षा प्रेक्षकाने ते प्रत्यक्ष पाहिलं तर त्यातली मजा अनुभवता येईल.
चित्रपटाची ’हिरो’ अर्थातच विद्या बालन आहे. पण तिच्या सहकलाकारांची, दुय्यम कलाकारांची कामगिरीदेखील चांगली आहे, हे नाकारून चालणार नाही. ’द डर्टी पिक्चर’मुळे विद्याला अभिनयासाठी नावाजलं गेलं असलं तरी त्यातील अंगप्रदर्शनामुळे तिच्या अभिनयक्षमतेला एक प्रकारचा बेनिफिट ऑफ डाऊट मिळतो, असं मला वाटतं. ’डर्टी...’ ची हवा अजून विरलेली नसतानाच विद्या बालन अभिनित आणखी एक सर्वस्वी भिन्न विषयावर बेतलेला चित्रपट प्रदर्शित केल्यामुळे विद्याचा सहजसुंदर अभिनय चटकन लक्षात येतो. तिच्या आधीच्या चित्रपटांमधील व्यक्तीरेखा लक्षात घेऊन काही प्रसंग अशा प्रकारे चित्रीत केले गेले आहेत, ज्यामुळे ’कहानी’ची कहानी आणि ’विद्या’ आणखीच गूढ वाटू लागते.
चित्रपटात असलेली गाणी नेहमीच्या गाण्यांसारखी नाहीत. ’नो वन किल्ड जेसिका’मधील ’दिल्ली दिल्ली’ सारखं सुरूवातीलाच येणारं, कोलकत्याची महती सांगणारं ’आमी शोट्टी बोलची’ किंवा बच्चनसाहेबांच्या आवाजतलं ’अॅकला चालो रे’ ही गाणी निराळ्या धाटणीची तर आहेतच. पण चित्रपटात गाण्यांचा आणखी एक निराळा प्रयोग केला आहे - पंचमदांच्या सुरावटीत बद्ध झालेली काही जुन्या चित्रपटातील हिंदी व बंगाली गाणी या चित्रपटात वापरली गेली आहेत. ’विद्या’च्या ’अर्नब’ला शोधण्यासाठीच्या एकंदर प्रवासभर ही गाणी पार्श्वभूमीवर वाजत असतानाच आपल्याला या गाण्यांमधून ’विद्या’च्या मन:स्थितीचीदेखील कल्पना देतात.
अंगविक्षेपातून केलेले विनोद, अंगप्रदर्शन, रंगीबेरंगी गाणी, मारधाड या सर्व फिल्मी प्रथांना बाजूला ठेवून कथा, संवाद, अभिनय आणि दिग्दर्शन या गोष्टींसाठी चित्रपट पहातानाच मनोरंजनदेखील हवं असेल, तर ’कहानी’ निदान एकदा तरी पहायलाच हवा असा चित्रपट आहे.
Comments
Post a Comment