गॉडसेन्ड (२००४)

शाळेमधे अजूनही परिक्षा किंवा निबंधस्पर्धांमधे निबंध लिहीण्यासाठी एक दोन विषय हटकून देतात - ’विज्ञान शाप की वरदान?’ किंवा ’आधुनिक तंत्रज्ञान - शाप की वरदान?’ मला सारखं असं वाटायचं की ज्या प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात देता येतं, त्यासाठी एक हजार शब्दांचा निबंध का लिहावा? विज्ञान किंवा तंत्रज्ञान जी व्यक्ती हाताळणार आहे, त्या व्यक्तीच्या मनोवृत्तीवर हे अवलंबून नाही का? उदाहरणादाखल साधी टूथपिक घ्या. ज्या गोष्टीचा उपयोग मनुष्य दात स्वच्छ राखण्यासाठी करतो, तीच वरकरणी निरूपद्रवी दिसणारी टूथपिकसुद्धा वेळ आली तर शस्त्रासारखी वापरता येतेच ना! म्हणून काय टूथपिकला आपण तोफ म्हणतो का? हां, आता काही गोष्टींची निर्मिती विध्वंसक कार्यासाठीच केली जाते, तो भाग निराळा. पण या काही विशिष्ट गोष्टी जरी विज्ञान किंवा आधुनिक तंत्रज्ञान वापरून बनवल्या असल्या तरी केवळ विध्वंसक गोष्टींची निर्मिती म्हणजेच विज्ञान किंवा आधुनिक तंत्रज्ञान का

पॉल आणि जेसी या सुखी जोडप्याच्या संसारवेलीवर फुललेलं फूल म्हणजे त्यांचा आठ वर्षांचा मुलगा अ‍ॅडम. आईवडिलांचा लाडका अ‍ॅडम स्वभावत:च गोड आहे. पॉल, जेसी आणि अ‍ॅडम हे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेलं असं सुखी त्रिकोणी कुटुंब आहे. पण बहुधा नियतीला त्यांचं हे सुख पहावत नाही. अ‍ॅडमच्या आठव्या वाढदिवसानंतर एका अपघातात अ‍ॅडम मृत्यू पावतो. या दुर्घटनेनंतर जेसी पूर्णत: कोलमडून जाते. पॉल वरकरणी दाखवत नसला तरी त्याची अवस्था जेसीपेक्षा वेगळी नसते. आता हेच दु:ख उरी बाळगून आयुष्य कंठायचं असं या दोघांनीही ठरवलेलं असतं. पण डॉ. रिचर्ड वेल्स या दोघांना भेटतात आणि संपूर्ण परिस्थिती पालटून जाते.

डॉ. वेल्सच्या म्हणण्यानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ते मृत अ‍ॅडमच्या पेशींपासून हुबेहूब तसाच दिसणारा मुलगा नैसर्गिकरित्या या जगात आणू शकणार आहेत. सुरूवातीला पॉल आणि जेसीला याच्यावर विश्वास बसत नाही पण अ‍ॅडमला पुन्हा या जगात आणण्याची जेसीची ओढ त्यांना डॉ. वेल्सचं म्हणणं मान्य करण्यास भाग पाडते. ठरवलेल्या पद्धतीनुसार, अगदी नैसर्गिकरित्या जेसी एका मुलाला जन्म देते. त्याचं नाव अ‍ॅडमच ठेवलं जातं आणि शेवटी या अ‍ॅडमच्या आयुष्यात तो दिवस येतो, जिथे पूर्वीच्या अ‍ॅडमने त्याचं आयुष्य गमावलेलं असतं - त्याचा आठवा वाढदिवस! अ‍ॅडमला भास होऊ लागतात, भितीदायक स्वप्नं पडू लागतात. अ‍ॅडमचं वागणं हळूहळू बदलायला लागतं. पॉल, जेसी आणि अ‍ॅडम या तिघांचं आयुष्य या घटनेने ढवळून जातं. पण अ‍ॅडममधल्या बदलामागचं सत्य नेमकं कुणाला ठाऊक असतं?

सिनेमात उल्लेख केलेल्या वैज्ञानिक गोष्टींवर केवळ सिनेमापुरतादेखील विश्वास न ठेवल्याने या चित्रपटाला प्रेक्षक व समीक्षकांकडून फार चांगले गुण मिळालेले नाहीत. सुरूवातीपासून पकड घेतलेलं कथानक शेवटाला मात्र थोडं भरकटलेलं वाटणं ही गोष्टदेखील चित्रपटाला कमी गुण मिळण्यास कारणीभूत आहे. पण रॉबर्ट डी निरोचा अभिनय आणि सुपरमॅन, स्पायडरमॅन किंवा एक्समेनपट पहाणार्‍यांना हा रहस्यपट निश्चित आवडेल. विज्ञानात कितीही विध्वंसक सोध लागले तरीही ते शापाऐवजी वरदानामध्ये रूपांतरीत करता येऊ शकणं पण जर तसं करता येऊ शकत नसेल तर असे शोध जगापुढे न येऊ देणं हीच सारासार विवेकशक्ती असते.

Comments