'गैर' (२००९) पहाण्यात काहीच गैर नाही

मराठी रहस्यप्रधान चित्रपटांबद्दल अपेक्षा उंचावणारा चित्रपट म्हणजे ’गैर’. मराठीतही असा सस्पेन्स थ्रिलर असू शकतो यावर विश्वासच बसत नाही. उत्कृष्ट कथेला तितक्याच ताकदीच्या दिग्दर्शनाची व निर्मितीची जोड असेल तर मराठी चित्रपटात काय घडू शकतं हे तुम्ही गैर मधे पहाच! चित्रपट पहात असताना, ’अरे हे काय दाखवलंय, असं का.... असं का नाही, हे पटत नाही’, असे बरेच प्रश्‍न तुमच्या मनात येतील पण.... त्या सर्व प्रश्नांना चित्रपटाच्या अखेरपर्यंत थोपवून धरा.

सतीश राजवाडे हे उत्तम दिग्दर्शक आहेत, हे त्यांनी यापूर्वीच सिद्ध केलेलं आहे. गैर चित्रपटातील त्यांच्या खास ’टच’ मुळे चित्रपटाला सुंदर गती लाभली आहे. उत्सुकता शेवटपर्यंत ताणून ठेवण्यात 'गैर' यशस्वी ठरला आहे. चित्रपटात निर्माते संजय घोडावत यांच्या दिमाखदार कार्स वापरल्या असल्या तरी त्यांचं कुठेही अवाजवी प्रदर्शन नाही. अगदी चॉपरचा वापरही मोजकाच पण नेमक्या वेळेस केलेला आहे. तरीही चित्रपटाला ग्लॅमरस व फ्रेश लूक देण्यात निर्माता व दिग्दर्शक दोघेही यशस्वी ठरले आहेत. सतीश राजवाड्यांना तरूण पिढीची ’नॅक’ सापडली आहे.

या चित्रपटात गाणी आहेत पण ती आवश्यक तिथेच येतात. प्रसंगानुसार संगीतबद्ध केलेली गाणी आपल्याला चित्रपटात गुंतवून ठेवतात. संदिप कुलकर्णी व अमृता खानविलकरवर चित्रीत केलेलं चित्रपटातील सर्वात पहिलं गाणं वातावरणातील गूढपणा आणखीनच गडद करतं. त्यात बराचसा सहभाग ’हरिहरन’ यांच्या आवाजाचा आहे. संदिप कुलकर्णी हे उत्तम अभिनेता म्हणून ओळखले जात असले, तरी त्यांना नाचगाणं करताना कुणी पाहिलं असेल असं वाटत नाही. त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणि देहबोलीला अनुसरून त्यांना दिलेल्या नृत्याच्या ’स्टेप्स’ नृत्यदिग्दर्शकाचा अनुभव व कसब दर्शवतात. अभिनयाचं म्हणाल तर, सर्वच कलाकारांनी आपापलं काम चोख केलं आहे. शेवट नीट पाहिलात तर हे वाक्य जास्त पटेल.

हिंदी चित्रपट निर्मात्यांनी गैर पाहिल्यानंतर आपला मोहरा मराठी चित्रपटांच्या दिशेने वळवला तर त्याचं नवल वाटायला नको. मुंबई पोलिसांनी संजय घोडावत यांनी निर्मित केलेला ’जेल’ पाहिलाच आहे. त्यांचीच निर्मिती असलेला ’गैर’ही अवश्य पहावा. आणखीही बरंच काही लिहायचं होतं पण लिहीता लिहीता रहस्यभेद नको व्हायला. इतकंच सांगेन, गैर पहाण्यात काहीच गैर नाही.

Comments