Kalki 2898 AD

काल कल्कि पाहिला. चांगला आहे. प्रभासच्या प्रसंगामधला हसू न येणारा विनोद (कारण लहान मुलंसुद्धा हसत नव्हती) वगळता बाकी प्रभासही छान वाटला.

मी इथे ४-५ रिव्ह्यू वाचले ह्या सिनेमाचे. त्यात दीपिका ह्या सिनेमात काय करतेय हा प्रश्न विचारलेला दिसला. मला मृणाला ठाकूरला ह्या सिनेमात का घेतलं असेल असाही प्रश्न पडला होता. पण चित्रपट आकर्षक वाटावा म्हणून राजमौली आणि रामगोपाल वर्मादेखील कॅमिओ देणार असतील तर दीपिका का नको? तिच्या भूमिकेला निदान पार्श्वभूमी आहे. असो.

दिशा पटानीला विशेष जबाबदारी नसल्यामुळेच चित्रपटाला U/A प्रमाणपत्र मिळालं असावं असं मला वाटतं. लहान मुलं उडत्या गाड्या, मारामारी छान एन्जॉय करत होती.

बच्चनबद्दल काय बोलावं? आता वयानुसार अ‍ॅक्शन सीन्स त्यांनी स्वत: केलेले नसले तरी जिथे कॅमेरा त्यांच्यावर फोकस्ड आहे तिथे जो अभिनय त्यांनी केला आहे... ह्यांच्यासारखे कलाकार आता होणे नाही.

पंजाबी गाण्याचा, मुळात चित्रपटात गाणी घुसडण्याचाच मोह टाळला तर बरं आहे. ह्या चित्रपटाच्या ३/४ लांबीत केवळ मारामारीची दृश्यं आहेत. एक अतिशय बिनडोक वाटू शकेल असा प्रभास-दिशाचा प्रसंग गाण्यासकट सहन करावा लागतो. तरीही चित्रपट मोठ्या पडद्यावर बघण्यासारखाच आहे. बच्चनचे तरूण अश्वत्थामाचे CG खूप म्हणजे खूपच वाईट आणि बालीश वाटतात. त्यापेक्षा अभिषेक बच्चनला घेतलं असतं तर निदान ते संयुक्तिक वाटलं असतं.

आयर्न मॅन, गेम ऑफ थ्रोन्स, थ्री हन्ड्रेड अश्या अनेक चित्रपट+मालिकांची मस्त खिचडी स्टार वॉर्सच्या थाळीत सजवून वाढलेली आहे. पुढच्या भागांमध्ये कदाचित मेनू बदलेल पण थाळी बदलणार नाही.

ह्या सिनेमा मध्यबिंदू पकडला तर ह्याचे किमान २ प्रिक्वेल आणि २ सिक्वेल निघायला हवेत. अनेक दृश्यं आहेत ज्यांवर इथे लिहिणं किंवा प्रश्न उपस्थित करणं म्हणजे स्पॉयलर्स होईल त्यामुळे ही कल्कि ची पूर्ण मालिका येईपर्यंत थांबणं बरं.

इंग्लिश सब्‌टायटल्स अतिशय चुकीची आहेत. हिंदी भाषेतल्या आवृत्तीसोबत दाखवली नाहीत तर उत्तम!

पटकथा अतिशय विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक हाताळलेली आहे. आगामी भागांच्या कथाही इतक्याच काळजीने हाताळल्या तर हे प्रोजेक्ट K यशस्वी होऊ शकेल.

Comments