रुद्र... कॉपी है और बहोत फर्क पडता है!
मूळ मालिकेच्या कथासूत्राला धक्का न लावता फ्रेम टू फ्रेम प्रसंग चित्रीत करण्याऐवजी त्यात स्वत:ची थोडी कल्पनाशक्ती वापरुन लेखक-दिग्दर्शक एक रंजक मालिका सादर करु शकतात. आजच्या स्मार्ट युगात त्याची गरजही आहे कारण तुमची मालिका एका अमूक मालिकेवर आधारलेली आहे हे तुमच्या प्रेक्षकांना कळलं कि ते ती मूळ मालिका पाहून तिच्याशी तुमच्या कलाकृतीची तुलना करणार हे अटळ आहे.
मूळ मालिकेच्या फ्रेममध्ये अडकलेल्या आपल्या प्रेक्षकाला बाहेर काढून त्याला आपल्या कलाकृतीशी बांधून ठेवण्यासाठी अधून-मधून आश्चर्याचे धक्के देणं भाग आहे. प्रेक्षक खुर्चीत सरसावून बसण्याऐवजी मूळ मालिकेतील प्रसंगाशी तुमच्या कलाकृतीची तुलना करु लागला आणि मूळ मालिकेमधील त्या प्रसंगाचं सादरीकरण प्रभावी असेल तर तुमच्या प्रेक्षकाच्या उत्साहाला उतरती कळा लागू शकते. मूळ कलाकृतीचा स्रोत माहितच नसलेल्या प्रेक्षकांना मात्र तुमची मालिका रंजक वाटू शकते. कदाचित मूळ मालिका जास्त भारतीय प्रेक्षकांनी पाहिली नसावी हा अंदाज घेऊन ‘रुद्र’मध्ये बदल केले नसावेत.
‘रुद्र’च्या प्रत्येक भागात एक नवीन कथा आहे. ह्या कथेसोबतच रुद्र आणि त्याच्या आसपासच्या त्याच्या माणसांची एक कथा समांतर सुरु राहाते. अजय देवगण रुद्र सादर करणार म्हटल्यावर उत्सुकतेने पहिला भाग पाहणाऱ्यांना दुसरा भाग पहाण्याची इच्छा होणार हे नक्की. मूळ मालिकेप्रमाणेच रुद्रदेखील किमान २ ते ३ सिझन चालू शकेल. पण रुद्रची जमेची बाजू तिच्या प्रत्येक भागामध्ये घडणारी एक नवीन कथा ही आहे. ह्या प्रत्येक नवीन कथेसोबत रुद्रच्या वैयक्तिक आयुष्याची कथाही पुढे सरकत जाते.
मालिकेमध्ये एक-दोन ठिकाणी अनावश्यकपणा टाळण्यासाठी आणि नाईलाज म्हणून जे बदल केले आहेत, ते वगळता फ्रेम टू फ्रेम मूळ मालिकेवरुन कॉपी केली आहे त्यामुळे ज्यांनी मूळ मालिका पाहिली आहे त्यांना क्वचित कंटाळा येऊ शकेल.
गहिरा अंधार दाखवण्यासाठी मालिका शूट करताना विशिष्ट फिल्टर वापरला असावा पण त्याचा वापर खूप जास्त वाटतो. मध्येच आपण गॉथम मालिका पाहतोय कि काय असा भास होतो. एका प्रसंगात तर सिगारेटचा धूरसुद्धा हिरवा दिसतो. वातावरणातील गढूळ, गूढपणा, उदासपणा ऐवजी पावसामुळे कायमस्वरुपी कंटाळवाणं ढगाळ वातावरण आहे असं वाटत राहातं. पण मुंबईतील काही ठिकाणांचा चांगला वापर करुन घेतला आहे. कॅमेऱ्याचे काही अॅंागल्ससुद्धा मस्त आहेत.
अजय देवगण अंडरप्ले करतानाच चांगला वाटतो. विशेषत: समोरचं पात्र आवेशात आरोळ्या ठोकत असताना अजयने आपल्या अंडरप्लेने मजा आणलेली आहे. आरडा-ओरडा करण्यासाठी त्याच्याकडे ‘गोलमाल’ सारखे सिनेमे असतात आणि तिथे तो चालूनही जातो. रुद्रमध्ये तोच खोटा वाटतो. पण ह्या आरडा-ओरड्यावरच ‘रुद्र’चे काही प्रसंग आधारलेले आहेत.
अतुल कुलकर्णींबद्दल प्रश्नच नाही. मूळ कथेतील व्यक्तिरेखेपेक्षाही जास्त बारकावे त्यांनी आपल्या अभिनयातून दाखवले आहेत. त्यांची भूमिका निराळी उठून दिसते. स्पॉयलर्स द्यायचे नाहीत म्हणून जास्त लिहू शकत नाही. पण त्यांची भूमिका मनापासून आवडली. पटकथा लेखक-दिग्दर्शक त्यांच्या भूमिकेसाठी पुढल्या सिझन्समध्ये काही करतील का?
इशा देओल इज ओके. राशी खन्नाचं काम चांगलं आहे. तिला उगीच मेक-अप जास्त केला आहे. हॉस्पिटलमधल्या डॉक्टरच्या साध्या वेशात ती जास्त कन्व्हिन्सिंग सोसिओपॅथ वाटते. अश्विनी काळसेकरांचंही काम छान आहे. विशेषत: रुद्रने विश्वासघात केला म्हणून त्रागा व्यक्त करतानाचा त्यांचा अभिनय खूपच आवडला.
आणखीही बरेच नावाजलेले कलाकार घेतल्यामुळे ‘रुद्र’ चर्चेत राहाणार. कथासूत्रामुळे मालिकादेखील चालणार पण फ्रेम टू फ्रेम कॉपीची खरंच गरज आहे का? तिकडे ब्रिज दाखवला तर इथे गेट वे.. ऐवजी गार्डन दाखवू शकत नाही का? नाहीतरी पाण्यात दोन्ही पात्रांपैकी कोणीही उडी मारणार नसतंच.
मालिकेमधील काही प्रसंगामधून भारतीय प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी शिकायला मिळू शकेल. पण ‘रुद्र’च्या प्रत्येक भागातील नवीन कथेसोबतच रुद्रचीही स्वत:ची एक कथा समांतर सुरु आहे त्यात काही निराळे प्रसंग किंवा निराळ्या प्रकारे चित्रीत केलेले प्रसंग नाही का दाखवता येणार?
मालिकेत रुद्र आणि काही पात्रांच्या तोंडी एक संवाद आहे, ‘... क्या फर्क पडता है?’
उसपर बस इतनाही कहेंगे - फ्रेम टू फ्रेम कॉपी न करनेसे बहुत फर्क पडता है ।
Comments
Post a Comment