एक था टायगर (२०१२) - रेसिपी

पदार्थ - एक था लव्हर

मुख्य साहित्य:
१ पाकिट मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस स्मिथ सिनेमा
१ आख्खा सलमान (जून असावा)
१ आख्खी कतरिना (फार कोवळी नको)
संवाद चवीपुरते

फोडणीसाठी:
१/४ टेबलस्पून इंग्रजी ट्वेन्टी फोर सिरीजचे स्टंट्स
२ टेबलस्पून इराक किंवा टर्कीचं लोकेशन
४/५ प्रेमळ गाणी
१ टिस्पून क्यूबाचं लोकेशन

कृती:
१. सर्वप्रथम एका मोठ्या पातेल्यात सलमान व कतरिना व्यवस्थित ढवळून किमान ३ ते ४ वर्षे बाजूला ठेवून द्यावेत. म्हणजे ते चांगले मुरतात.
२. आता या मुरलेल्या मिश्रणात एक पाकिट मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस स्मिथ घालून व्यवस्थित ढवळून घ्यावे.
३. फोडणीसाठी ३ तास शिजण्यास मावेल एवढ्या मोठ्या कढईत ट्वेन्टी फोर सिरीजचे स्टंट्स गरम करावेत. त्यात इराक किंवा टर्कीचं लोकेशन टाकावे.
४. तडतड असा आवाज झाला की एक गाणं बाजूला काढून इतर सर्व गाणी यात टाकावीत व मिश्रण चांगलं परतून घ्यावं.
४. आता यात १ टिस्पून क्यूबाचं लोकेशन टाकावं व पुन्हा परतून घ्यावं.
५. सर्वात आधी मोठ्या पातेल्यात सलमान-कतरिनाचं जे मिश्रण ढवळून ठेवलं होतं, ते या कढईत ओतावं व नीट परतून घ्यावं आणि किमान तीन तास हा पदार्थ शिजवावा.
६. शेवटी चवीपुरते संवाद टाकावेत.
७. जे एक गाणं बाजूला काढून ठेवलं होतं, त्या गाण्याने ही डीश सजवावी व प्रेक्षकांना गरम-गरम वाढावी.

या पदार्थाला किंचीत रॉ व आय एस आय सारखा वास येतो, त्यामुळे तरूण वर्ग या डिशवर चटकन ताव मारेल. मात्र हा पदार्थ खास लहान मुलांसाठी बनवलेला आहे. सलमान आणि कतरिनाच्या मुरलेल्या मिश्रणामुळे या पदार्थात काही विशेषता नसूनदेखील हा पदार्थ चटकन संपवला जाईल.

टीप:
१. चिमूटभर असोका वापरायला हरकत नाही पण तो फक्त संतोष सिवनचाच असावा.
२. कतरिना या पदार्थाला गाणं सहन होत नाही त्यामुळे ढवळताना काळजी घ्यावी.
३. सजवण्यासाठी बाजूला काढलेलं गाणं जर माशाल्ला माशाल्ला असेल, तर आणखीनच छान.

Comments