द डर्टी पिक्चर (२०११) - क्लास की मासचा?

चित्रपटाची कथा आणि त्याची पार्श्वभूमी सांगावी लागू नये इतकी सर्वांना परिचित आहे, त्यामुळे त्यावर जास्त भाष्य न करता आपण चित्रपट कसा आहे ते पाहू. या सिनेमात विद्या बालनच्या तोंडी एक संवाद आहे - "फिल्में सिर्फ तीन चीजों की वजह से चलती हैं. एन्टरटेनमेन्ट, एन्टरटेनमेन्ट, एन्टरटेनमेन्ट! ...और मैं एन्टरटेनमेन्ट हूँ." या संवादाशी प्रामाणिक राहून एकता कपूरने संपूर्ण चित्रपटभर एन्टरटेनमेन्ट असेल, असं पाहिलं आहे. ज्या व्यक्तीच्या आयुष्यातील घटनांवर आधारित हा चित्रपट आहे, ती व्यक्ती काही ग्रेट होती असं नव्हे. मात्र अशा व्यक्तीरेखेवर आधारित चित्रपट जर बनवायचाच होता, तर ’तशी एन्टरटेनमेन्ट’ देणार्‍या त्या व्यक्तीला प्रत्यक्षात चित्रपटसृष्टीच्या एका वेगळ्या, फारशा न उल्लेखल्या गेलेल्या पैलूचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सतत कसा सामना करावा लागला, हे दाखवताना मात्र एकता कपूरने हात आखडता का घ्यावा याचं कारण समजत नाही.

दाक्षिणात्य व काही हिंदी चित्रपटांतून हॉट आयटम सॉंग्ज सादर करणार्‍या ८० च्या दशकातील विजयालक्ष्मी उर्फ सिल्क स्मिता या नटीच्या आयुष्यातील काही निवडक प्रसंगांसोबत रेश्मा उर्फ सिल्क या काल्पनिक व्यक्तिरेखेची सरमिसळ करून एका हॉट नायिकेची सुरूवात, उत्कर्ष, अपकर्ष व अंत या चित्रपटात दाखविण्यात आला आहे, या एका वाक्यात चित्रपटाची कथा संपते, इतर सगळी एन्टरटेनमेन्ट.

चित्रपटाच्या सर्वात दमदार बाजू म्हणजे रजत अरोराने लिहिलेले संवाद आणि अर्थातच अभिनेत्री विद्या बालनची ’सिल्क’. कधी द्वयर्थी व धीट तर कधी पांढरपेशा बुरखा वापरणार्‍या समाजाच्या तोंडात चपराक लगावणारे सणसणीत संवाद या चित्रपटात सतत ऐकायला मिळतील. पण संवाद जितके दमदार आहेत, पटकथादेखील तितकीच दमदार असती तर बहार आली असती. असो.

इश्कियां चित्रपटातील भूमिकेच्या दोन पावलं पुढे जाऊन विद्या बालनने सादर केलेली सिल्कची व्यक्तीरेखा तिच्याकडे ’अंगभूत’ गुणांइतकंच निश्चित काहीतरी वेगळं आहे, हे दाखवते. ठायी ठायी एन्टरटेनमेन्ट भरून असलेल्या आपल्या व्यक्तीरेखेतील अत्यंत बारिक-सारीक जागादेखील शोधून विद्याने तिथे आपला अभिनय पेरून ठेवला आहे. चित्रपटातली एन्टरटेनमेन्ट बाजूला ठेवून पाहिलं तर विद्याची ही मेहनत चटकन लक्षात येईल.

विद्या बालनचा मेक-अप आणि तिचे कॉस्च्यूम्स हा चित्रपटाला मिळालेला आणखी एक प्लस पॉइंट आहे. मुळात विद्या बालनचा चेहेरा गोड आणि सोज्वळ आहे. तिने इतर ठिकाणी साडी नेसून ’सिल्क’ दाखवण्याचा प्रयत्न केला, तर एका चांगल्या घरातील मुलगी वाममार्गाला लागल्यासारखं वाटेल. पण ’द डर्टी पिक्चर’ मधे रेश्मा ते सिल्कच्या प्रवासात तिच्या व्यक्तीमत्वात घडलेले बदल दाखवताना रंगभूषा आणि वेशभूषा या दोन्ही गोष्टींनी महत्वाची भूमिका बजावली आहे. विद्याच्या अभिनयाइतकंच क्रेडिट या दोन गोष्टींना मिळायला हवं.

चित्रपटातील गाण्यांमधे "उह ला ला" लोकप्रिय होणं साहजिकच आहे. जितेंद्राच्या ’मवाली’ चित्रपटातील ’उई अम्मा’ या गाण्याचीच चाल किंचित चढ्या स्वरात लावून व जितेंद्राच्याच हिम्मतवाला व तोहफा चित्रपटातील लोकप्रिय नृत्यातील दृश्यांची नक्कल करून हे गाणं बनवलं गेलं आहे. या गाण्यात सागर, मैने प्यार किया, सदमा या चित्रपटांमधील गाण्यांचीही झलक दिसून येते. भप्पीदांच्या आवाजासोबत श्रेया गोशालने लावलेला आवाज मला व्यक्तीश: आवडला आहे. ती बहुढंगी गायिका आहे, हे आता सिद्ध झालेलं आहेच तेव्हा तिच्याबद्दल अधिक सांगण्याची गरज नाही. हनिमूनकी रात व इश्क सुफियानासारखी गाणी टाळली असती तरी चाललं असतं. दोन नट्यांचा मुकाबला म्हणजे नृत्यच असं समीकरण चित्रपटसृष्टी केव्हा बदलणार?

चित्रपटातील मला सर्वात नावडलेली बाब म्हणजे इम्रान हाश्मी. तो चित्रपटातला कलासक्त दिग्दर्शक तर वाटत नाहीच पण संपूर्ण चित्रपटभर त्याच्या आवाजात जे निवेदन आहे, ते जास्त असह्य आहे. "औरत रेनबो की तरह होती है" सारखा संवाद देखील तो "मी माझ्या कुत्र्याला घेऊन चौपाटीवर फिरायला गेलो होतो", इतक्या फ्लॅट स्वरात म्हणतो तेव्हा या "नट"ची या चित्रपटासाठी कुणी निवड केली असेल, असा प्रश्न मनात आल्यावाचून रहात नाही.

मगाशी ’"चित्रपटाची पटकथादेखील तितकीच दमदार असती तर बहार आली असती", असं म्हणण्याचं कारण म्हणजे जी गोष्ट चित्रपटासाठी सर्वात जास्त स्पष्ट असायला हवी होती, नेमका तिथेच गोंधळ झाला आहे. मध्यंतरापर्यंत चित्रपटाने इतकी छान पकड घेतली आहे की क्लास इतक्याच आणि मासच्या प्रेक्षकानेदेखील मध्यंतर संपण्याची वाट पहावी. पण मध्यंतरानंतर चित्रपट सुरू होतो आणि हळूहळू त्याची प्रेक्षकावरची पकड निसटत जाते. चित्रपटातल्या प्रमुख व्यक्तीरेखेचा आरंभ आणि उत्कर्ष दाखवल्यानंतर तिचा अपकर्ष व अंत दाखवण्यात दिग्दर्शन आणि पटकथा या दोन्ही गोष्टी कमकुवत ठरल्या आहेत. "ज्या कारणामुळे आपण सिल्क बनलो, ते कारण आपण सोडू शकत नाही" असं ठणकावून सांगणारी सिल्क स्वत:चा अंत ज्या प्रकारे, ज्या कारणासाठी करून घेते, ते तर्कसंगत वाटत नाही. ही गोष्ट केवळ प्रमुख व्यक्तीरेखेच्याच बाबतीत झाली आहे असं नव्हे, तर चित्रपटातील आणखी दोन व्यक्तीरेखा अशाच प्रकारे सादर करण्यात आल्या आहेत.

हा चित्रपट चालणार हे नि:संशय आहे पण एकाच चित्रपटाकडून क्लास आणि मासच्या प्रेक्षकांची अपेक्षा निरनिराळी असते. चित्रपटात अंगप्रदर्शन आवश्यक आहे, असं दोन्ही प्रकारचे प्रेक्षक मानतात, पण चित्रपटातलं नेमकं काय पहायचं हे कळण्यावर प्रेक्षक क्लासचा की मासचा हे अवलंबून आहे.

Comments