पापाराझ्झी (२००४) - खाजगी आयुष्याची अखेर

चित्रपट कलाकारांचे नखरे, त्यांचे पत्रकारांशी, फोटोग्राफर्सशी उडणारे खटके, प्रसंगी होणारी धक्काबुक्की याची सचित्र आणि रसभरीत वर्णनं आपण नेहमीच ऐकतो. चित्रपटासृष्टीसारख्या क्षेत्रात राहूनसुद्धा हे चित्रपट कलाकार प्रसिद्धीमाध्यमांशी फटकून का वागतात? असं नेमकं काय होतं की या कलाकारांचे पत्रकार व फोटोग्राफर्सशी उडणारे खटके इतक्या विकोपाला जातात की प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत जातं? हे प्रकार केवळ चित्रपट कलाकारांच्या बाबतीतच घडतात असं नाही. काही बडी प्रस्थंदेखील अशाप्रकारच्या वादाच्या भोवर्‍यात सापडतात. आपल्यासमोर जे सत्य असतं ते एका फोटोच्या रूपात असतं. हा फोटो क्लिक करण्याआधी नेमकं काय झालं हे आपल्याला माहित नसतं आणि फोटो इतका बोलका असतो की सत्य माहित करून घेण्याची विचारशक्ती आपण गमावून बसतो. ज्याच्या बाबतीत हा प्रकार घडत असतो, ती सिलेब्रिटी व्यक्ती किती मन:स्ताप सहन करत असेल, याची आपण कल्पनाही केलेली नसते. कारण त्यांचं आयुष्य हे आपल्या दृष्टीने खाजगी नसतंच.

या चित्रपटाची कथा याच विषयावर बेतलेली आहे. बो लॅरॅमी हा एक उदयोन्मुख अभिनेता एका अ‍ॅक्शनपटाचा हिरो आहे. त्याच्या खाजगी आयुष्यात वारंवार डोकावून फोटो काढणार्‍या फोटोग्राफर्सची मजल इतपर्यंत जाते की बोला आपली पत्नी व मुलगा यांना गमवावं लागतंय की काय अशी वेळ येते. चित्रपटाचा पुर्वार्ध वेगवान आहे. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा आहे. पण उत्तरार्ध तितकाच संथ आणि अतिशयोक्ती ताणणारा आहे. चित्रपटाचा विषय वेगळा असूनही वेगळया पद्धतीने हाताळला गेलेला नाही. उत्तरार्धातील रिव्हेंज फार्म्युला बर्‍याच चित्रपटांमधून पाहिलेला असल्यामुळे गुळगुळीत वाटतो आणि त्याच्या चित्रपटाच्या पूर्वाधाशी अजिबात संबंध नाही असं वारंवार वाटत रहातं. मात्र चित्रपटाच्या पूर्वार्धापर्यंत जे काही घडतं, ते पापाराझींच्या मनोवृत्तीचं यथार्थ दर्शन घडवतं.

हल्लीच इंग्लंडच्या राणच्या नातवाचा - प्रिन्स विलियमचा विवाह झाला. ती बातमी वाचताना माझ्या डोळ्यांसमोर एकच चेहेरा वारंवार तरळत होता - लेडी डायना! प्रिन्स चार्ल्स आणि लेडी डायनाचा हा मोठा मुलगा. लेडी डायना आज जर हयात असती, तर डचेस म्हणून नाही पण प्रिन्सची आई म्हणून तरी त्या लग्नात ती नक्कीच दिसली असती. आज तिच्या नसण्याचं कारण म्हणजे पापाराझ्झी. राजकुमारीच्या पदाचा त्याग करून एक "नॉर्मल" आयुष्य जगू पहणार्‍या त्या सुंदर स्त्रीला पापाराझ्झींनी कधीच एकटं सोडलं नाही. लेडी डायनाची वेगवान कारही त्यांचा ससेमिरा चुकवू शकली नाही आणि या पाठलागाचं पर्यवसान कार अपघातात झालं. एक सुंदर चेहेरा कायमचा काळाच्या पडद्याआड निघून गेला.

Comments